Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 8 May, 2009

म.गो.तील वाद मिटल्याचा दावा

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातील केंद्रीय समिती व विधिमंडळ गटातील शिगेला पोहचलेला वाद संपुष्टात आल्याचा दावा दोन्ही गटांतर्फे करण्यात आला. पक्षाध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी ढवळीकरबंधुंनी धमकी दिल्याप्रकरणी पोलिस तक्रार दाखल करण्याचा आपला निर्णय मानवतावादी दृष्टिकोनातून मागे घेत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. माजी मगो नेत्यांना पक्षात फेरप्रवेश देण्याबाबतचा केंद्रीय समितीने घेतलेला निर्णय कायम राहणार असून केंद्रीय समितीचे पंधरा सदस्य व दोन विधिमंडळ गट नेते यांच्या एकमतानेच फेरप्रवेशाबाबत अंतिम निर्णय होईल, असाही "फॉर्मुला' काढण्यात आला. आमदार दीपक ढवळीकर, पक्षाध्यक्ष पांडुरंग राऊत व केंद्रीय समितीचे इतर नेते यांनी आज घाईगडबडीत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत खुलासा करून या वादावर पडदा पडल्याचे जाहीर केले.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.मुळात हा संपूर्ण वाद काही माजी नेत्यांच्या फेरप्रवेशाबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे सुरू झाल्याचे आमदार दीपक ढवळीकर म्हणाले. या वृत्तामुळे पक्ष पदाधिकाऱ्यांत गैरसमज पसरल्याने हा वाद चिघळत गेला,परंतु पक्षहितासाठी हा वाद योग्य नाही या विचाराने या वादावर अखेर समेट घडवून आणल्याची माहिती श्री.राऊत यांनी दिली.दरम्यान,एकीकडे समेट घडवून आणण्याची बोलणी सुरू असताना दुसरीकडे दीपक ढवळीकरांच्या काही समर्थकांकडून बैठक घेण्यात आली व त्यात मगो पक्षाच्या निधीचा गैरवापर केल्याचा आारोप पक्षाध्यक्ष श्री.राऊत यांच्यावर करण्यात आला.श्री.राऊत यांनी या विषयाची गंभीर दखल घेतली. दीपक ढवळीकर हे पक्षाचे खजिनदार होते व त्यांनी याबाबत खुलासा करावा,असे म्हणून श्री.राऊत यांनी भर पत्रकार परिषदेत श्री.दीपक ढवळीकर यांनी माफी मागावी अशी मागणी केली. या मागणीनंतर काही काळ पत्रकार परिषदेतच वातावरण गरम झाले.श्री.राऊत यांनी केलेल्या या मागणीमुळे ढवळीकर समर्थक नाराज बनले व त्यांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली असता दीपक ढवळीकर यांनी हस्तक्षेप करून अखेर असा कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे सांगितले.आरोप करणाऱ्यांनी आपले म्हणणे सिद्ध करून दाखवावे,अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
युवाशक्तीची बैठक
दरम्यान,आज मगोच्या युवाशक्तीने पक्षाच्या मुख्यालयाला भेट दिली असता तिथे पक्ष कार्यालयाला टाळे ठोकल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच येथील नजीकच्या हॉटेलात बैठक घेतली. ही बैठक सुदेश मळकर्णेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली व यावेळी प्रदीप बखले,जगदीश जोग व महेश पणशीकर हजर होते.ही कार्यकारिणी बैठक असल्याचे सांगून इथे तीन ठराव संमत करण्यात आले. त्यात पक्षाचा विश्वासघात करून गेलेल्यांना कोणत्याही पद्धतीत फेरप्रवेश देण्यात येऊ नये,केंद्रीय समिती बरखास्त करून ९० दिवसांच्या आत आमसभा बोलावून नवीन केंद्रीय समिती स्थापन करणे व गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या निधीचा पक्षाध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी गैरव्यवहार केल्याने त्याची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी श्री.राऊत यांनी निवडणूक आयोग व आयकर विभागाला पाठवलेल्या एका यादीत पक्षाकडून विविध उमेदवारांना दिलेल्या अर्थसाहाय्याची यादीच यावेळी जाहीर करण्यात आली. या यादीबाबत बनावट पद्धतीने सह्या घेण्यात आल्या असे सांगून जगदीश जोग,किशोर परवार,आनंद वेळीप आदी उमेदवारांनी आपल्याला पक्षाकडून एकही पैसा मिळाला नाही,असे सांगितले.

No comments: