Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 3 May, 2009

विश्वजितविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू

सोमवारी शिक्कामोर्तब होणार
पणजी, दि. २ (प्रतिनिधी) - ऍड. आयरिश धमकी प्रकरणी आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला देऊनही त्याबाबत कोणतीही कारवाई न केलेल्या जुने गोवे पोलिसांना तात्काळ आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शर्मिला पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर पेच निर्माण झाला आहे. येत्या सोमवारी (दि. ४ रोजी) हे प्रकरण उच्च न्यायालयात सुनावणीस येणार असून त्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई यांनी दिली.
आधीच याप्रकरणी वेळकाढू धोरण अवलंबल्याने न्यायालयाच्या कात्रीत सापडलेल्या पोलिसांनी आता न्यायालयाचा अवमान होऊ नये यासाठी आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिगीस यांना "मोबाईल'वरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची पोलिस तक्रार जुने गोवे पोलिस स्थानकात करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी मंत्री राणे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करणार असल्याचे सांगून अचानक या प्रकरणाच्या तपासाची फाईलच बंद केली. ही गोष्ट ऍड. रॉड्रिगीस यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली असता न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली होती. याप्रकरणी दोन्ही बाजूचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतला असता न्यायालयाला आश्वासन देऊन त्याची पूर्तता न करणे ही गंभीर बाब असून त्याची त्वरित पूर्तता करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. गेल्या २३ सप्टेंबर ०८ रोजी सरकारी वकील विनी कुतिन्हो यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात युक्तिवाद करताना धमकी प्रकरणात आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करणार असल्याचे आश्वासन गोवा खंडपीठाला दिले होते. यावेळी न्यायालयात जुने गोवे पोलिस स्थानकाचे निरीक्षक गुरुदास गावडेही उपस्थित होते. तरीही, आरोपपत्र दाखल करण्यात हयगय करण्यात आल्याने व या प्रकरणाचा तपासच बंद करण्यात आल्याने ऍड. रॉड्रिगीस यांनी याला पुन्हा एकदा न्यायालयात आव्हान दिले. "डायरेक्टर ऑफ प्रोसिक्युशन'च्या सल्ल्यानंतर या प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला, अशी भूमिका न्यायालयाच्या कात्रीत सापडलेल्या निरीक्षक गावडे यांनी घेतली होती. त्यांच्या या वागणुकीमुळे श्री. गावडे यांच्या विरोधात अवमान याचिकाही सादर करून ऍड. रॉड्रिगीस यांनी त्यांनाही न्यायालयात खेचले आहे.
राजकीय दबावापोटी आरोग्यमंत्री विश्र्वजित राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या जुने गोवे पोलिसांना सुरुवातीस या प्रकरणात न्यायालयीन हस्तक्षेपाची चाहूल लागताच तब्बल २२ दिवसांनी तक्रार नोंद करून घेतली होती व नंतर या प्रकरणाची चौकशीच बंद करून आरोग्यमंत्री राणे यांना "क्लीन चीट'देण्याची तयारी केली होती.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी त्यांची पत्नी दीव्या राणे यांच्या मोबाइलवरून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी ३१ जुलै २००७ रोजी जुने गोवे पोलिसांकडे केली होती. यानंतर मंत्री राणे यांच्या विरोधात भा.दं.सं ५०६(२) कलमानुसार गुन्हा दाखल करून घेण्यात आला होता.

No comments: