Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 8 May, 2009

पाचव्या खुनाची महानंदकडून कबुली

नयन गावकरचा खून करून मानशीत टाकले
आणखी पाच प्रकरणी संशय
फोंडा, दि.७ (प्रतिनिधी) : फोंडा भागातील चार युवतींच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित आरोपी महानंद रामनाथ नाईक (तरवळे-शिरोडा) याने अखेर पाचव्या खुनाची कबुली दिली असून अमळाय पंचवाडी येथील कु. नयन गावकर हिचा गळा आवळून खून करून मृतदेह बोरी येथील पुलाजवळील मानशीत टाकल्याची कबुली दिली आहे. संशयित आरोपी महानंद नाईक याने केलेल्या खुनांची संख्या आता पाच झाली आहे. आणखी पाच युवतींच्या प्रकरणामध्ये महानंद नाईक संशयाच्या घेऱ्यात आहे.
युवतींच्या खून आणि बलात्कार प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या महानंद नाईक याची आणखी पाच प्रकरणात कसून तपासणी सुरू आहे. संशयित महानंद नाईक याने नरेंद्र गावकर हे नाव धारण करून कु. नयना हिच्याशी मैत्री केली होती. १९ मार्च २००८ पासून नयना बेपत्ता झाली. नरेंद्र गांवकर नामक इसमाशी नयना हिची मैत्री होती, असे कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीत म्हटले होते.
संशयित महानंद नाईक याने १९ मार्च २००८ रोजी नयन गावकर हिला मडगाव येथे नेले. मडगाव येथे काही तास फिरल्यानंतर फोंड्याला येण्यापूर्वी संशयित आरोपी महानंद नाईक याने नयना हिच्या भावाच्या मोबाईल फोनवर मडगावातील एका कॉईन बॉक्समधून फोन केला आणि आपण दोघे बेळगावला जात असल्याचे सांगितले. महानंद नाईक याने नयना हिला घेऊन बेळगावला न जाता बोरी गाठली. तेथे बोरी पुलाजवळ नयना हिचा इतर युवतींचा खून केलेल्या पद्धतीनुसार खून करून मृतदेह मानशीत टाकून दिला आणि तिच्या अंगावरील दागिने घेऊन घरी निघून गेला.
संशयित महानंद नाईक यांनी फोंडा पोलिसांनी ज्या कॉईन बॉक्सवरून नयना हिच्या भावाला फोन केला होता" ती' जागा पोलिसांना ७ मे ०९ रोजी सकाळी दाखवली आहे. तसेच ज्याठिकाणी नयना हिचा खून करण्यात आला. ती जागा सुध्दा दाखविली आहे. मडगावच्या ज्या आइस्क्रीम पार्लर मध्ये नयना गावकर हिच्या समवेत बसून "फालोडा' खाल्ला ती जागा सुध्दा महानंद याने पोलिसांना दाखविली आहे. याप्रकरणी महानंद नाईक यांच्या विरोधात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंजनी गावकर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निरंकाल येथे गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना महानंदच्या बाबत धक्कादायक माहिती मिळाली. साध्या, भोळ्या मुली त्याच्या आमिषाला बळी पडत होत्या. फोंडा भागातून बेपत्ता असलेल्या युवतींबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. संशयित महानंद नाईक यांच्या काही कर्मकहाण्यांची चर्चा लोकांत सुरू आहे. संशयित महानंद नाईक याच्या पत्नीची चौकशीची मागणी लोकांकडून केली जात आहे.
दरम्यान, महानंद नाईक यांच्या पत्नीची पोलिसांनी जबानी घेतली आहे. त्याची पत्नी ओल्ड गोवा येथे एला फार्ममध्ये कामाला आहे. त्याला दोन वर्षाची मुलगीही आहे. गोव्यात गाजत असलेल्या या युवतीच्या खून प्रकरणी उपअधीक्षक शेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सी.एल. पाटील तपास करीत आहेत.
-----------------------------------------------------------------
आणि त्या दोघी वाचल्या!
गवळवाडा निरंकाल येथील कु. सुमित्रा आणि कु. कल्पना या दोन युवतींनाही संशयित महानंद नाईक याने आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती उघड झाली आहे. महानंद याच्या आमिषाला या युवती बळी न पडल्याने वाचू शकल्या. महानंद नाईक मोठ्या चलाखीने युवतींना आपल्या जाळ्यात ओढत होता, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. गवळवाडा निरंकाल येथे महानंद नाईक याचा मोठ्या प्रमाणात वावर होता.

No comments: