Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 7 May, 2009

राऊत यांची सुदिनविरोधात पोलिस तक्रार ?


हा तर कॉंग्रेसचा डाव - ढवळीकर समर्थकांची टीका


पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - मगो पक्षातील केंद्रीय समिती व विधिमंडळ गटातील वाद आता अगदी शिगेला पोहचला आहे. एकीकडे केंद्रीय समितीने सर्व माजी नेत्यांना पक्षाचे दरवाजे उघड करण्याचा निर्णय घेतला असताना दुसरीकडे पक्षाच्या दोन्ही आमदारांनी मात्र या निर्णयास प्राणपणाने विरोध केला आहे. या तथाकथित माजी नेत्यांना पक्षात फेरप्रवेश दिल्यास कोणत्याही थराला जाऊ अशी धमकी मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिल्याचे कारण सांगून त्यांच्याविरोधात चक्क पोलिस तक्रार दाखल करण्याची तयारी पक्षाध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.
याप्रकरणी प्राप्त झालेल्या माहितीनुसार मगो पक्षाध्यक्ष पांडुरंग राऊत यांना गेल्या सोमवारी वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी निवासस्थानी दूरध्वनीवरून संपर्क साधला व २८ जणांची मगोतील फुटीरांची यादी तयार करून त्यांना कोणत्याही पद्धतीत मगो पक्षात फेरप्रवेश देण्यात येणार नसल्याचा ठराव घेण्याचा सल्ला दिला. यावेळी श्री.राऊत यांनी हा सल्ला पोरकटपणाचा कळस असल्याचे सांगून पक्षाच्या माजी नेत्यांना फेरप्रवेश देण्याचा निर्णय केंद्रीय समितीने घेतल्याची माहिती त्यांना दिली. याप्रकरणी खलप किंवा जल्मी मगो पक्षात येण्याबाबत पक्षाकडे कोणताही प्रस्ताव नसताना ढवळीकरबंधु एवढे अस्वस्थ का झाले आहेत,असा जाब विचारून कुणाला पक्षात घ्यावे व घेऊ नये याचा अंतिम निर्णय केंद्रीय समिती घेणार असल्याने नवा ठराव घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगितले. यानंतर सदर तथाकथित नेत्यांना पक्षात घेतल्यास आपण कोणत्याही थराला जाणार,अशी धमकी श्री.ढवळीकर यांनी दिल्याचे श्री.राऊत म्हणाले. दुसरीकडे पक्षाचे अन्य आमदार दीपक ढवळीकर यांच्या समर्थकांनी मगो युवाशक्ती असे नामाभिधान करून पक्षाच्या मुख्यालयात धिंगाणा घातल्याचेही ते म्हणाले. पक्षाची आमसभा बोलवा, तिथे आपले ५०० कार्यकर्ते आणू असेही ते वारंवार सांगत असल्याने याबाबत सावध भूमिका घेण्यासाठीच ही तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे श्री.राऊत म्हणाले.
फोंड्यातील कॉंग्रेस नेत्याचा डाव ?
दरम्यान, मगोच्या लोकप्रियतेमुळे बेचैन झालेल्या काही कॉंग्रेस नेत्यांकडून ढवळीकरबंधुंना शह देण्यासाठी व पर्यायाने मगो पक्षाचे खच्चीकरण करण्यासाठी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून हे नाटक सुरू असल्याचा आरोप ढवळीकर समर्थक गटाने केला आहे. या प्रकरणी फोंड्यातील एका बड्या कॉंग्रेस नेत्याचा हात असून भविष्यात आपली राजकीय कारकीर्द धोक्यात येण्याचे संकेत त्यांना मिळाल्याने त्यांच्याकडून हा डाव रचला जात असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.

No comments: