Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 7 May, 2009

माओवाद्यांना वगळून नेपाळात नवे सरकार!

काठमांडू, दि. ६ - माओवाद्यांना वगळून नेपाळमध्ये २१ पक्षांचे नवे आघाडी सरकार सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी विविध पक्षांना राष्ट्राध्यक्ष डॉ. रामबरन यादव यांनी येत्या शनिवारपर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीत सदर पक्षांनी सरकार स्थापण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
नवे सरकार स्थापन करण्यासंदर्भात या २१ राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक काल येथे पार पडली. माओवाद्यांना मात्र या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले आहे. "सीपीएन' व "युएमएल' या मुख्य पक्षांनी याकामी महत्त्वाची भूमिका बजावली. नेपाळमधील संसद सदस्यांची संख्या ६०१ असून राष्ट्रीय मतैक्याचे सरकार स्थापन करू इच्छिणाऱ्या पक्षांचे संख्याबळ सुमारे २८० च्या आसपास आहे. माओवाद्यांना लष्करात स्थान देण्याच्या मुद्यावरून तीव्र मतभेद उफाळल्यानंतर प्रचंड यांच्या नेतृत्वाखाली नऊ महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या सरकारने राजीनामा दिला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून नेपाळचा प्रवास अराजकाच्या दिशेने सुरू झाला आहे.

No comments: