Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 5 May, 2009

नेपाळमध्ये अराजक

पंतप्रधान प्रचंड यांचा राजीनामा

काठमांडू, दि. ४ - नेपाळच्या सैन्यप्रमुखांना बरखास्त करण्याच्या मुद्यावरून पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष यांच्यात मतभेद निर्माण झाल्यानंतर देशातील राजकारणाने आता गंभीर वळण घेतले आहे. आज दूरचित्रवाणीवरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे, तर सैन्यप्रमुखांना बरखास्त करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाला माओवाद्यांनी पाठिंबा दर्शविला असून या मुद्यावर आम्ही न्यायालयात जाऊ अशी धमकी दिली आहे.
दरम्यान प्रचंडसमर्थक माओवादी व राष्ट्राध्यक्ष व सैन्यप्रमुख समर्थकांत अनेक ठिकाणी सुरू असलेल्या संघर्षाकडे बघता काठमांडूत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. नेपाळमधील या गंभीर राजकीय स्थितीकडे बघता भारत सरकारने नेपाळ-भारत सीमेवरील सुरक्षा जवानांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
राष्ट्राला उद्देशून केेलेल्या भाषणात पंतप्रधान प्रचंड यांनी राष्ट्राध्यक्षांवर आरोप केला आहे की, सेनाप्रमुखांना बरखास्त केले असताना त्यांना आपल्याच पदावर कायम राहण्याचा आदेश देणे बेकायदेशीर आहे. नेपाळमधील लोकशाहीच्या रक्षणासाठी तसेच शांततेसाठी आपण आपल्या पदाचा राजीनामा देत आहोत, असे प्रचंड यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. राष्ट्राध्यक्षांचा निर्णय हा लोकशाही व शांतताप्रक्रियेवर करण्यात आलेला हल्ला होय, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे. याआधी राष्ट्राध्यक्ष रामबरन यादव यांनी सेनाप्रमुख कटवाल यांना पदावर राहण्याचा आदेश दिला होता. सरकारी आदेशांची अवहेलना करण्याचा सेनाप्रमुखांवर आरोप करीत त्यांना काल पदावरून हटविण्यात आले होते. परंतु पंतप्रधानांच्या या आदेशानंतर काही तासातच राष्ट्राध्यक्ष यादव यांनी सेनाप्रमुखांना आपल्या पदावर कायम राहण्याचे आदेश दिले होते. सेनाप्रमुखांना लिहिलेल्या पत्रात राष्ट्राध्यक्ष यादव यांनी म्हटलेेेले आहे की, राष्ट्राध्यक्ष व सरसेनापती या नात्याने आपण पदावर कायम राहावे असा आदेश मी देत आहे. या पत्राच्या प्रती पंतप्रधान कार्यालय व सैन्याच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांना पाठविण्यात आल्या.
माओवादी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाला मंजुरी देण्यास राष्ट्राध्यक्ष यादव यांनी नकार दिल्यानंतर प्रचंड यांनी आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलाविली. या बैठकीत देशातील सध्याच्या स्थितीवर विचारविमर्श करण्यात आला व पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून भाषण करावे व स्थितीची माहिती द्यावी असा निर्णय घेण्यात आल्यानंतर पंतप्रधान प्रचंड यांनी दूरचित्रवाणीवरून राष्ट्राला संबोधून भाषण केले. नेपाळचे सेनाप्रमुख रुख्मांगद कटवाल यांना पदावरून हटविण्याच्या कारवाईला भारतासह अनेक देशांनी विरोध दर्शविला होता, हे येथे उल्लेखनीय. सेनाप्रमुख कटवाल यांना पदावरून बरखास्त करण्याच्या पंतप्रधान प्रचंड यांच्या निर्णयावर नाराज होत सत्तारूढ युतीतील एक प्रमुख पक्ष सीपीएन(युएमएल)ने सरकारला दिलेला पाठिंबा मागे घेण्याची घोषणा केली आहे. युतीतील इतर घटकपक्षही प्रचंड यांच्या निर्णयाचा विरोध करीत आहेत.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सेनाप्रमुख कटवाल यांनी सेनामुख्यालयात प्रमुख सैन्य अधिकाऱ्यांची बैठक आमंत्रित केली आहे, असे वृत्त रेडिओ नेपाळ एफएमने दिले आहे.
दरम्यान, नेपाळमध्ये निर्माण झालेला पेचप्रसंग तातडीने सुटावा आणि तेेथे शांतता निर्माण व्हावी, अशी आशा भारताने व्यक्त केली आहे. नेपाळमध्ये निर्माण झालेली स्थिती ही त्या देशाची अंतर्गत बाब असली तरी शेजारी देश म्हणून आम्हाला चिंता वाटत आहे, असे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे.

No comments: