Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 8 May, 2009

'स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा समाजाला ब्रह्मानंदाचार्यांनी दिली'

सातव्या पुण्यतिथीदिनी मान्यवरांचा सत्कार
फोंडा, दि.७ (प्रतिनिधी) : श्री पद्मनाभ शिष्य संप्रदायाच्या श्री क्षेत्र तपोभूमीचे संस्थापक प.पू. सद्गुरूमाऊली ब्रह्मानंदाचार्य स्वामी महाराज यांची सातवी पुण्यतिथी आज विविध कार्यक्रमासह थाटात साजरी करण्यात आली आहे.
प.पू.ब्रह्मानंदाचार्य स्वामी यांनी भरकटलेल्या बहुजन समाजाला दिशा दाखवून त्यांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. स्वामींचे विचारांची समाजाला आजही गरज असून स्वामींचे हे पवित्र कार्य यापुढे सुरूच राहील, असे विद्यमान पीठाधीश प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांनी आपल्या आशीर्वचनात सांगितले.
पुण्यतिथीनिमित्त तपोभूमीवर दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी प्रकट कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी, गोवा विधानसभेचे सभापती प्रतापसिंह राणे, ज्येष्ठ वकील मनोहर उसगावंकर, उद्योगपती अशोकराव चौगुले, साळगावचे आमदार दिलीप परूळेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुभाष वेलिंगकर, खानापूरचे आमदार प्रल्हाद रेमाणी, उजैन संस्कृत विद्यापीठाचे उपकुलगुरू श्री. मिश्रा, सौ. विजयादेवी राणे, संप्रदायाचे अध्यक्ष गुरूदास शिरोडकर, उपाध्यक्ष प्रकाश केदार आदी मान्यवर उपस्थित होते.
प.पू.ब्रह्मानंद स्वामीचे कार्य अद्वितीय असून त्यांनी हजारो कुटुंबाचा उद्धार केला. व्यसनाधीन बनलेल्या समाजाची व्यसनातून मुक्तता केली. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर केली. समाज सुसंस्कृत आणि मूल्याधिष्ठित बनविण्यासाठी प्रयत्न केले. स्वामीचे समाज उद्धाराचे कार्य यापुढेही सुरू ठेवले जाणार आहे. भक्तगणांनी सुध्दा ब्रह्मानंद स्वामींचे विचार समाजात पोचविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे,असेही स्वामींनी सांगितले.
भक्तिरसातून जीवनाचे सार्थक होऊ शकते. मनुष्याने माणुसकीची जोपासना करून आपल्या कर्तव्याचे पालन करावे, असे अँड. मनोहर उसगावंकर यांनी सांगितले. प.पू.ब्रह्मानंद स्वामींनी केलेल्या अलौकिक कार्यामुळे समाज स्थिर होत आहे, असे उद्योगपती अशोकराव चौगुले यांनी सांगितले. प.पू. ब्रह्मानंद स्वामी यांनी बहुजन समाजाला योग्य मार्गदर्शन केले, असे सभापती प्रतापसिंह राणे यांनी सांगितले.
या कार्यक्रमात अँड. मनोहर उसगांवकर, सभापती प्रतापसिंह राणे, उद्योगपती अशोकराव चौगुले यांचा प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. विजयादेवी राणे यांची ब्रह्मानंदस्वामीच्या कन्येच्या हस्ते ओटी भरून सन्मान करण्यात आला. श्री पद्मनाभ शिष्य संप्रदायाशी निगडीत असलेल्या दिगंबर कालापूरकर कुंटुबीय, गुरूदास नार्वेकर कुटुंबीय, जगन्नाथ फडते कुंटुबीय, बन्सीलाल हडफडकर कुटुंबीय यांचा स्वामींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संप्रदाय समितीचे अध्यक्ष गुरूदास शिरोडकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन सच्चिदानंद नाईक यांनी केले. या पुण्यतिथी सोहळ्याला भाविक, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाधी मंदिरात ब्रह्मानंद स्वामींचे दर्शन घेण्यासाठी भक्तगणांनी गर्दी केली होती.

No comments: