Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 7 May, 2009

सात प्रकरणी महानंद संशयाच्या भोवऱ्यात

..चार खुनांची आत्तापर्यंत कबुली
..आणखी तीन प्रकरणांची नोंद



महानंदने खुनाची कबुली
दिलेली प्रकरणे
योगिता नाईक
दर्शना नाईक
वासंती गावडे
केसर नाईक

बुधवारी नोंद झालेली
बेपत्ता तरुणींची प्रकरणे
गुलाबी गावकर
दीपाली ज्योतकर

निर्मला गावकर

फोंडा, दि.६ (प्रतिनिधी) - फोंडा भागातील चार युवतींचे खून, एका युवतीवरील बलात्काराची कबुली दिलेल्या सिरियल किलर संशयित महानंद नाईकची आणखी तीन नवीन प्रकरणे आज (६ मे) उघड झाली असून या प्रकरणात संशयित महानंद नाईक गुंतल्याचा दाट संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. आत्तापर्यत सहा प्रकरणामध्ये संशयाच्या घेऱ्यात सापडला आहे. दरम्यान, कुर्टी येथील कु. योगिता नाईक खून प्रकरणी संशयित महानंद याला १४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने आज (दि.६) दिला आहे.
सीरियल किलर महानंद नाईक यांच्या विरोधात आणखी तीन नवीन प्रकरणे आज (दि.६) नोंद झाली आहेत. सध्या सहा प्रकरणामध्ये महानंद नाईक संशयाच्या घेऱ्यात आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू असून संशयिताने ह्या प्रकरणाची अद्याप कबुली दिलेली नाही. ज्या ज्या ठिकाणी संशयित महानंद नाईक याचा संबंध आला तेथील युवती गायब झालेल्या आहेत. फोंडा भागात १९९४ सालातील गाजलेल्या गुलाबी गावकर खून प्रकरणी संशयित महानंद याचा संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मयत गुलाबी हिचा मृतदेह खांडेपार येथे आढळून आला होता. मयत गुलाबी गावकर हिच्या भावाने फोंडा पोलिसांशी संपर्क साधून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मयत गुलाबी घरातून सोन्याचे दागिने घेऊन आली होती. त्यानंतर तिचा खून करण्यात आला होता. मयत गुलाबी ही वरचा बाजार फोंडा येथील एका टेलरिंगच्या दुकानात कामाला होती. त्याच ठिकाणी महानंद हा भाडोत्री मालवाहू रिक्षा चालविण्याचे काम करीत असल्याने महानंद यांचा याप्रकरणी गुंतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दवर्ली हाउसिंग बोर्डे मडगाव येथून २००६ सालापासून बेपत्ता असलेल्या कु. दिपाली दत्ताराम ज्योतकर या युवतीच्या प्रकरणी सुध्दा संशयित महानंद नाईक गुंतल्याची संशय तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. श्री. ज्योतकर यांच्या घराच्या विस्तारीत कामाचा ठेका संशयित महानंद नाईक याने घेतला होता. त्यावेळी सुमारे पंधरा दिवस त्याच्या घराचे काम करीत होता. त्यावेळी कु. दिपाली हिच्याशी त्याने मैत्री केली. कु. दिपाली घरातून जाताना रोख ८० हजार रुपये आणि सुमारे पावणे दोन लाख रुपयांचे दागिने घेऊन गेली होती, असे कुटुंबीयांनी उघड केले आहे. आपण मित्रासोबत मुंबईला जात असल्याची चिठ्ठी दिपाली हिने लिहून ठेवली होती.
रिवण सांगे भागातून निर्मला गांवकर ह्या युवतीच्या खून प्रकरणी महानंद नाईक याचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ह्या युवतीचा मृतदेह वेर्णा येथे आढळून आला होता. घरातून जाताना तिने दागिने नेले होते, अशी माहिती मिळाली आहे.
संशयित महानंद नाईक याचा निरंकाल भागात मोठ्या प्रमाणात वावर होता. या गावातून बेपत्ता झालेल्या युवतीच्या प्रकरणात महानंद याचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. निरंकाल ह्या गावाचे नाव सुरुवातीला उच्चारताच संशयित महानंद नाईक याने हे गाव आपल्याला ठाऊक नसल्याचे पोलिसांना सांगितले. निरंकाल येथील कु.अंजनी गांवकर प्रकरणी संशयितांची तपासणी सुरू आहे. ही युवती वरचा बाजार फोंडा येथे टेलरिंगच्या दुकानात कामाला होती. त्याच ठिकाणी संशयित महानंद रिक्षा चालविण्याचे काम करीत होता. उसगाव येथे आपल्या वडिलांचे हॉटेल असल्याचे सांगितले होते. अंजनी गावकर हिचा मित्र संशयित महानंद नाईक याला ओळखत आहे, अशी माहिती मिळाली आहे. अमळाय पंचवाडी येथील नयन गांवकर, विझार पंचवाडी येथील सूरत गांवकर यांच्या प्रकरणी सुध्दा संशयित महानंद याची चौकशी केली जात आहे. सिरियल किलर महानंद नाईक निर्ढावलेला असल्याने गुन्ह्याची कबुली देत नाही. संशयित महानंद चार सिम कार्डाचा वापर करीत होता. त्यांच्या सर्व सिमकार्डची माहिती मिळविण्यात येत आहे. महानंद यांच्या संपर्कात आलेल्या युवती ह्या सोन्याच्या दागिने घेऊन घरातून आलेल्या आहेत आणि त्यानंतर बेपत्ता झालेल्या आहेत. संशयित गुन्ह्याची कबुली देण्यास पुढे येत नसल्याने पोलिसांना साक्षीदार व इतर पुरावे गोळा करावे लागत आहे. गुलाबी गावकर खून प्रकरणातील प्रमुख साक्षीदार मृत झाला आहे. मात्र, त्याने आपल्या जबानीत केलेले आरोपीचे वर्णन महानंदाशी मिळते जुळते आहे, असेही सूत्रांनी सांगितले. गेल्या वीस वर्षात महानंद नाईक यांच्या संपर्कात आलेल्या अनेक युवती बेपत्ता झालेल्या आहेत. आपणा सोबत येताना सोन्याचे दागिने घालण्याची अट महानंद युवतींना घालत होता. युवतीचा एकाच पद्धतीने खून करीत होता. महानंद हा कोणतेही काम न करता गेली कित्येक वर्षे युवतीचे खून करून त्यांच्या अंगावरील दागिने चोरून चरितार्थ चालवत होता, असे उघड झाले आहे. युवतीचे खून केल्याचा त्याला खेद किंवा दुःख वाटत नाही. या सहा प्रकरणी संशयित महानंद नाईक याने कबुली न दिल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. सध्या चार खून आणि एक बलात्काराचा गुन्हा त्याच्या विरोधात नोंद झालेले आहेत. निरंकाल येथील एका कुटुंबांशी महानंद याची दाट मैत्री होती. त्या कुटुंबांकडे वरच्यावर येजा करीत होता. एके दिवशी त्या कुटुंबाला एका कार्यक्रमाला घेऊन गेला. या कार्यक्रमातून महानंद अचानक निघून गेला. कार्यक्रम झाल्यानंतर सदर कुटुंब घरी आले. त्यावेळी त्यांच्या घरात चोरी झाल्याचे आढळून आले. घरातील लाखांचा ऐवज पळविण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक सी.एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय दळवी, उपनिरीक्षक लक्षी आमोणकर, उपनिरीक्षक निखिल पालेकर, हेडकॉस्टेबल सोनू परब आदी तपास करीत आहेत.
कुठे आहे दीपाली?
संशयित महानंद नाईक याला दुपारी रिमांडसाठी न्यायालयात नेत असताना त्या ठिकाणी मडगाव येथून कु.दीपाली ज्योतकर हिचे आई, वडील आले होते. त्यावेळी दीपाली हिच्या आईचा राग अनावर झाला. संशयित महानंद नाईक याच्या अंगावर ती धावून गेली व तिने त्याच्यावर थप्पड लगावली. पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप केला. कु. दीपाली कुठे आहे, असा प्रश्न तिने महानंद नाईक याला केला. याप्रकरणी पोलिसांनी तपासकाम सुरू केले आहे.

2 comments:

Unknown said...

good detail story.
nice coverage....
congrats!

Anonymous said...

Mahanand is an alleged killer, he should be punished severely if found guilty in the court of law.

Police also have a nice opportunity now. Whatever unsolved case, perhaps due to their inept and unprofessional way of working, could now be dumped on mahanand.