Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 11 April, 2009

चर्चिलच्या डावपेचांनी कॉंग्रेस हवालदिल!

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांच्यासमोर पक्षांतर्गत भांडणाचे जबरदस्त आव्हान निर्माण झाल्याने या मतदारसंघावर सध्या भाजप व युगोडेपाने पूर्णपणे आघाडी घेतली आहे. सार्दिन यांच्या उमेदवारीला विरोध करून आपली कन्या वालंका हिच्या उमेदवारीसाठी कार्यरत असलेले चर्चिल यांचे मनसुबे धुळीस मिळाल्यानंतर त्यांनी आता नव्याने राजीनामा नाट्य सुरू केल्याने कॉंग्रेसच्या प्रचारातील हवाच निघून गेली आहे.
याप्रकरणी प्राप्त माहितीनुसार राज्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात सध्या कॉंग्रेसची अवस्था दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. उत्तर गोव्यात शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीतर्फे जितेंद्र देशप्रभू यांना रिंगणात उतरवले असले तरी श्रीपाद नाईक यांना टक्कर देणे शक्य नसल्याचे खुद्द सत्ताधारी नेतेच उघडपणे बोलू लागले आहेत.देशप्रभू यांना एकवेळ कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली असती तर काम करणे सोपे होते परंतु राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्यांना निवडून देण्याचे कितीही आवाहन केले तरी ते लोकांच्या पचनी पडणार नाही,अशी उघड चर्चा आता सरकारपक्षात सुरू आहे.दरम्यान,देशप्रभू यांनी मात्र आपली सारी भिस्त आरोग्यमंत्री विश्वजित राणे,सभापती प्रतापसिंग राणे,बाबुश मोन्सेरात व राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉ.विल्फ्रेड डिसोझा यांच्यावर ठेवली आहे. या नेत्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यास श्रीपाद नाईक यांना टक्कर देणे सहज शक्य असल्याचा दावा ते करतात.
उत्तरेत परिस्थिती निश्चित नसताना आत्तापर्यंत कॉंग्रेसचा बालेकिल्ला अशी ख्याती असलेला दक्षिण गोवा मतदारसंघातही कॉंग्रेससाठी धोकादायक बनण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.दक्षिणेत भाजप व युगोडेपाने कॉंग्रेससमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. विद्यमान मंत्रिमंडळात सासष्टी तालुक्याला जास्त प्रतिनिधित्व मिळाले आहे त्यामुळे ही जागा कॉंग्रेसपासून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही,असा दावा करणारे नेते यावेळी मात्र संभ्रमात सापडले आहेत. चर्चिल आलेमाव व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सेव्ह गोवा फ्रंट पक्षाचे कॉंग्रेसमध्ये केलेले विलीनीकरण बेकायदेशीर असल्याचा निवाडा निवडणूक आयोगाने केल्याने ते कात्रीत सापडले आहेत. त्यांच्याविरुद्ध खुद्द पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी अपात्रता याचिका दाखल केल्याने त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. सभापती राणे यांनी याप्रकरणी येत्या १६ एप्रिल रोजी सुनावणी ठेवली असून त्यापूर्वी चर्चिल यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याबाबतचे नाटय बरेच रंगवले आहे. आम्हा दोघांचा राजीनामा तयार आहे तो योग्य वेळ आली की सादर करणार,असा दावा करून चर्चिल यांच्याकडून सध्या सरकारला वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे.खुद्द निवडणूक आयोगानेच हे विलीनीकरण अवैध्य ठरवल्याने सभापती राणे यांना या अपात्रता याचिकेवर तात्काळ निवाडा देणे भाग पडले आहे.चर्चिल यांच्या या भूमिकेमुळे कॉंग्रेसच्या प्रचारावर त्याचे विपरीत परिणाम जाणवत आहेत. विविध ठिकाणी मतदारांकडून कॉंग्रेस नेत्यांना या प्रकाराबाबत जाब विचारली जात असल्याने आता प्रचार करणेही डोकेदुखी बनल्याची तक्रार कॉंग्रेस कार्यकर्ते करीत आहेत.
बी.के.हरिप्रसाद रविवारी येणार
दरम्यान,या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक बी.के.हरिप्रसाद यांना बोलावणे पाठवण्यात आले असून ते रविवारी गोव्यात दाखल होणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.काही पत्रकारांनी श्री.हरिप्रसाद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चर्चिल व आलेक्स राजीनामा प्रकरणाबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याची भूमिका घेतली. आपण निवडणुकीतील व्यूहरचना आखण्यासाठी येत असल्याचे ते म्हणाले.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys