Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 6 April, 2009

आत्मघाती हल्ल्यात पाकमध्ये ३५ ठार

२०० जखमी

इस्लामाबाद, दि. ५ - पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील चकवाल शहरात आज दुपारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात कमीत कमी ३५ जण ठार झाले आहेत तर २००वर लोक जखमी झाले आहेत. कालच पाकिस्तानात झालेल्या एका बॉम्बहल्ल्यात अनेक लोक ठार झाले होते. गेल्या दहा दिवसांत पाकिस्तानात अशाप्रकारचे चार हल्ले झाले असून त्यात १०५ लोक ठार झाले आहेत. आजच्या आत्मघाती हल्ल्यासाठी एका लहान वयाच्या मुलाचा वापर करण्यात आला, असे समजते.
हा आत्मघाती स्फोट इस्लामाबादपासून ९० किमी अंतरावरील चकवाल शहराच्या मधोमध असलेल्या इमामबाड्याजवळ झाला. यावेळी इमामबाड्यात शिया समुदायाचा वार्षिक धार्मिक समारंभ सुरू होता व त्यासाठी हजारोच्या संख्येने लोक जमा झाले होते. या गर्दीत आत्मघाती दलातील हल्लेखोर सहभागी झाला व त्याने स्वत:ला उडवून घेतले.
प्रत्यक्षदर्शी व पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी ३५ वर जणांचे मृतदेह आढळून आले, तर २०० वर लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोेेणत्याही दहशतवादी संघटनेनी स्वीकारलेली नाही.
प्रसिध्दी माध्यामांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक गोष्ट समोर आली आहे की, या भागात शिया व सुन्नी दोन्ही समुदायाचे लोक राहतात. या दोन्ही समुदायांना भडकविण्यासाठी हा आत्मघाती स्फोट घडवून आणला असावा.
स्फोटानंतर मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य हाती घेण्यात आले. घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका दाखल झाल्या व त्यांनी जखमींना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यास प्रारंभ केला.
या स्फोटानंतर पोलिसांनी या भागाला चारी बाजूंनी घेरले असून चौकशी सुरू केली आहे. या स्फोटात अनेक वाहनांचे नुकसान झाले. पंतप्रधान युसुफ रजा गिलानी व देशांतर्गत गृहमंत्रालयाचे प्रमुख रहमान मलिक यांनी या स्फोटाची निंदा केली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनीही या हल्ल्याची निंदा केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांनी सिंध तसेच वायव्य सहरहद्द प्रांतातील शिया समुदायाला आपल्या हल्ल्यांचे लक्ष्य केलेले आहे. आजच्या हल्ल्याचे विशेष हे आहे की हा हल्ला पंजाब प्रांतात झाला आहे.

No comments: