Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 6 April, 2009

वास्को व पणजीत पाच लाखांची चोरी

पणजी व वास्को, दि. ५ (प्रतिनिधी) - राज्यातील चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून रात्रीच्यावेळी पोलिस गस्त असताना पणजी व वास्कोत मिळून पाच लाखांवर ऐवज चोरीस गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
पणजी येथील नीलकमल आर्केडच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या स्टरलिंग अँड व्हिल्सन प्रा. लिमिटेडच्या कार्यालयात काल पहाटे काही अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याविषयीची पोलिस तक्रार आज सकाळी या कंपनीचे उपव्यवस्थापक साईप्रसाद भास्कर राम चल्ला यांनी केली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
मुख्य प्रवेशदाराचे कुलूप तोडून ही चोरी करण्यात आली असून गेल्या काही दिवसांत या टोळीने अशाच पद्धतीने चोऱ्या करून पणजी पोलिसांना हैराण केले आहे. काल रात्री पोलिस निरीक्षकासह दोन उपनिरीक्षक गस्तीवर असतानाही चोरट्यांनी आपली मोहीम यशस्वी केली.
अधिक माहितीनुसार वरील कंपनीच्या कार्यालयाच्या कपाटात असलेले १ लाख ५ हजार रुपये, एक एसर कंपनीचा लॅपटॉप, एक पासपोर्ट, २५ चांदीचे नाणे अशी एकूण १ लाख ५० हजार रुपयांची मालमत्ता चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. आज सकाळी कार्यालय उघडण्यासाठी आले असता सदर घटना उघडकीस आली. याच कार्यालयातील एक काच फुटलेली असून त्याला रक्तही लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत गोव्यातील काही प्रमुख शहरांत वाढत्या घरफोड्या आणि दुचाकी चोऱ्यांमुळे पोलिसांसमोर बिकट समस्या निर्माण झाली आहे. याविषयीचा अधिक तपास उपनिरीक्षक नारायण चिमुलकर करीत आहे.
वास्कोत साडेतीन लाखांची चोरी
वास्को, (प्रतिनिधी)ः राज्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असून, वास्को येथे आज सकाळी दोन नामवंत दुकानांमध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले. वास्को पोलिस स्थानकापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या "रेडिओ मुंडियाल' व "बाटा' अशा दोन दुकानांमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे तीन लाख साठ हजारांची मालमत्ता लंपास केली असून रात्रीच्या वेळी वास्को पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या गस्तीबाबत पुन्हा एकदा जनतेमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे.
आज सकाळी ९.४५ च्या सुमारास वास्कोच्या अन्नपूर्णा हॉटेलसमोर असलेल्या "रेडिओ मुंडियाल'या इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या मालकाचा मुलगा दुकान उघडण्यासाठी आला असता त्याला दुकानाचे मधले कुलूप तोडण्यात आल्याचे लक्षात आले. याच प्रकारे या दुकानाच्या बाजूला असलेल्या "बाटा शोरूम'दुकानाच्या मालकालाही त्यांच्या दुकानाचे मधले कुलूप तोडण्यात आल्याचे लक्षात आल्याने त्वरित वास्को पोलिसांना याची माहिती देण्यात आली. वास्को पोलिसांनी सदर घटनेची माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी दाखल होऊन तपास करण्यास सुरुवात केली असता दोन्ही दुकानांमध्ये मिळून तीन लाख साठ हजारांची चोरी झाल्याचे दिसून आले.बाटा शोरूममधून ३५ हजारांची रोख रक्कम व रेडिओ मुंडियालमधून २२ हजारांची रोख व तीन लाखांचा इलेक्ट्रॉनिक माल (डिजिटल कॅमेरा, हेन्डी केम, एमपीथ्री, प्ले स्टेशन इत्यादी) चोरीला गेल्याचे पोलिसांनी सांगितले. अज्ञात चोरट्यांनी दोन्ही दुकानांच्या शटरांची मधली कुलुपे तोडून नंतर शटर वाकवून आत प्रवेश केला आहे. वास्को पोलिसांकडून रात्रीच्या वेळी गस्ती घालण्यात येत असताना सुद्धा सहा दिवसाच्या आत शहरातील हा दुसरा चोरीचा प्रकार असून यापूर्वी येथील एफ.एल गोम्स मार्गावर असलेल्या "अरविंद सेल्युलर' या मोबाईल संच विकणाऱ्या दुकानामध्ये चोरी झाली होती. तसेच जानेवारी ते आत्तापर्यंत २२ लाखांच्या आसपास मालमत्तेची चोरी झाल्याचे उघडकीस आल्याने वास्कोच्या पोलिसांच्या सुरक्षेबाबत जनतेचा विश्वास उडत चालल्याचे दिसून येत आहे.
वास्को पोलिसांनी सदर प्रकरणाबाबत कडक तपासणी करण्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांचे या वेळी पाचारण करून पंचनामा केला. ""रेडिओ मुंडियाल'' ह्या दुकानामधून चोरीला गेलेले इलेक्ट्रॉनिक सामानाचे खोके दुकानामध्ये फेकून माल नेण्यात आला असे तपासाच्या वेळी पोलिसांना दिसून आले. रेडिओ मंडियालच्या श्री शेखर प्रेमानंद वेर्णेकर व बाटा शोरूमच्या दीपक पागी ह्या मालकांनी आपआपली तक्रार वास्को पोलीस स्थानकात नोंदविल्यानंतर पोलिसांनी भा.द.स ४५७ व ३८० ह्या कलमाखाली अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद केला असून त्याच्या कडून तपास चालू आहे.दरम्यान वास्को मध्ये ह्या काळात घडलेल्या चोरी प्रकरणाची तपशील करण्यासाठी वास्को पोलीस स्थानकाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी न येत असल्याने जनतेमध्ये प्रश्न निर्माण करत आहे. तसेच आज चोरी झालेल्या व गेल्या सहा दिवसापूर्वी झालेल्या चोरीच्या ठिकाणी इतर व्यवस्थापनांचे सुरक्षा कर्मचारी उपस्थित असताना सुद्धा त्यांना हे चोरटे कशा प्रकारे दिसून येत नाही हा एक मोठा प्रश्न आता पोलिसांना खात आहे. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक ब्राज मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रजाक शेख पुढील तपास करीत आहे.
चोरट्यांना अटक करू-बसी
वास्कोमध्ये अलीकडे झालेल्या चोरी प्रकरणातील अज्ञात चोरट्यांना गजाआड करण्यासाठी येथील पोलिस कर्मचारी परिश्रम घेत असून लवकरच त्यांना अटक करण्यास यश मिळणार असल्याचा विश्वास गोवा पोलिस खात्याचे महासंचालक भीमसेन बसी यांनी आज व्यक्त केला. आज संध्याकाळी श्री. बसी यांनी वास्को पोलीस स्थानकाला भेट दिली असता काही पत्रकारांनी त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की गोव्याच्या बहुतेक पोलिस स्थानकावर कर्मचाऱ्यांची कमतरता असून ती दूर करण्यासाठी कारवाई चालू आहे. वास्को शहर एक प्रमुख शहर असल्याचे श्री. बासी यांनी यावेळी मान्य करून येथे असलेली मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता लवकरात लवकर दूर होईल असे आश्वासन व्यक्त केला.

No comments: