Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 6 April, 2009

असह्य उकाड्याने गोवेकर हैराण

नद्या, तलावांवर गर्दी; कलिंगडांना वाढती मागणी

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - मार्च कसाबसा गेला, पण एप्रिल सुरू झाल्यापासून राज्यभरात असह्य उकाड्याने गोवेकरांना हैराण करून सोडले असून अंगाची तलखी होत आहे. पणजी वेधशाळेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज कमाल तापमान ३४.८ तर किमान तापमान २७.६ अंश सेल्सियस होते; तर आर्द्रता ८१ टक्के होती.
या उकाड्याच्या चक्रातून आपली कशी सोडवणूक करून घ्यावी, असा प्रश्न लोकांना पडला आहे. एरवी दरवर्षी मार्च ते मे या कालावधीत उन्हाळा ठरलेलाच असतो. तथापि, यंदा त्याची तीव्रता अंमळ जास्तच जाणवू लागली आहे. "ग्लोबल वॉर्मिंग'चा हा परिणाम असावा, असे हवामानशास्त्रांचे म्हणणे आहे. घरात पंखे सुरू असले तरी वाढत्या उकाड्यामुळे त्यातून गरम वारा येत असतो. म्हणून पंखेही कुचकामी ठरू लागले आहेत. एअर कंडिशनर प्रत्येकाच्या घरात असणे शक्यच नाही. त्यामुळे प्रामुख्याने दुपारी व रात्री जीवाची तगमग होते त्यावर काय उपाय, असा प्रश्न लोकांना पडला आहे.
जेथे सरकारी कार्यालये कोंदट खोल्यांत आहेत तेथील कर्मचाऱ्यांची अवस्था तर विचारू नका. शीतपेय किंवा थंड पाण्याच्या बाटल्या तरी रिचवायच्या किती? बरे थंड पाणी प्यायल्यावर एक-दोन मिनिटे बरे वाटते. पुन्हा अंगातून घामाच्या धारा सुरूच. दिवसातून दोन-तीनदा अंघोळ केली तरी घाम येणे काही थांबत नाही. शिवाय ज्या ठिकाणी प्यायला पाणी मिळण्याची मारामार आहे तेथे लोक इतक्या वेळा अंघोळ तरी कशी करणार? या दिवसांत तलाव, नद्या, तळी, विहीरी आदी ठिकाणी उकाड्यावर मात करण्यासाठी गर्दी करताना दिसतात. युवावर्ग यात प्रामुख्याने आघाडीवर आहे. उन्हाळ्यामुळे शीतपेयांना मागणी वाढत चालल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. तसेच कलिंगडासारख्या थंड फळांचीही हातोहात विक्री होताना दिसते. कलिंगडाच्या थंडगार फोडी पोटात थंडावा निर्माण करतात, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कलिंगडांच्या किंमती वाढल्या आहेत. अगदी छोटे कलिंगड घ्यायचे म्हटले तरी त्यासाठी ३५ ते ४० रुपये मोजावे लागत आहेत. तीच गोष्ट आईस्क्रीमची. दुपारी आणि संध्याकाळी उशिरापर्यंत विविध ठिकाणी आईस्क्रीम पार्लरवर गर्दी उसळलेली असते. मात्र, आईस्क्रीमवर मस्त ताव मारून घरात पाऊल ठेवले की, पुन्हा उकाडा सुरू. याचे मुख्य कारण म्हणजे दिवसभर तापलेला स्लॅब थंड होताना आपल्या अंगातील उष्णता बाहेर सोडत असतो. त्यामुळे रात्री झोप लागणेही कठीण. चोरीमारीच्या भीतीने दारे-खिडक्या उघडी ठेवण्याचीही सोय नसते. त्यामुळे मग आहे त्या परिस्थितीत चंचल निद्राराणीची प्रतीक्षा करत अंग टेकायचे, झोप येईल तेव्हा येईल. अगदीच वेळ जाईनासा झाला तर टीव्हीवर चॅनेल सर्फिंग करत बसायचे. खिशात भरपूर पैसे खुळखुळणारी मंडळी उन्हाळा सुरू झाला की, परदेशाची वाट धरतात. तथापि, सामान्य आणि मध्यमवर्गीयांना ते शक्यच नसते. ऐतिहासिक काळात डोकावायचे तर तेव्हा या समस्येवर मात करण्यासाठी वाळ्याचे पडदे खोल्यांना लावलेले असायचे. वाळा ही एक तंतुमय वनस्पती असून तिच्यावर पाण्याचा शिडकावा केला तर उन्हाळ्याच्या झळा त्यामुळे सुसह्य होतात. धनिक लोक पूर्वीच्या काळी रस्त्याच्या कडेला पाणपोया घालायचे. जमिनीत पुरलेल्या रांजणातील थंडगार पाणी पिऊन तृप्त झालेला श्रमिक नकळत या पाणपोईच्या प्रवर्तकाला दुवा देऊन जायचा. आता हे संदर्भ केवळ इतिहासाच्या पुस्तकातच उरले आहेत.माठ किंवा डेरा ही संस्कृती तर रेफ्रिजरेटर आल्यापासून केव्हाच लयाला गेली आहे. एकेकाळी माठामध्ये सुवासिक वाळा टाकून ते पाणी तांब्याच्या पात्रातून चाखण्यातील मजा काही औरच असायची. ग्रामीण भागात काही ठिकाणी आजही तांब्याच्या पात्राभोवती भिजवलेले वस्त्र गुंडाळून त्यामुळे थंड झालेले पाणी पिण्याची पद्धत आहे. "मिनरल' वॉटर म्हणून बंद बाटल्यांतून विकत घेतले जाते ते नव्हे तर निसर्गाच्या सानिध्यात सोप्या उपायांचा अवलंब करून आपल्याला सहजगत्या मिळवणे शक्य असते तेच हे खरे पाणी. कळशीभोवती भिजवलेले वस्त्र लपेटून ठेवणे हा खरोखरीच सोपा उपाय असून तो प्रयोग घरी करून पाहण्यास हरकत नाही. या पाण्याचा प्रत्येक घोट तुम्हाला तरतरी आणतो आणि तुमच्या दुपारच्या जेवणाची लज्जत निश्चितच वाढवतो. तथापि, त्याऐवजी युवकांमध्ये क्रेझ दिसून येते ती पाठीला लावलेल्या "सॅक'मधील एखाद्या शीतपेयाची बाटली शाहरुख खान किंवा अक्षयकुमारच्या शैलीत तोंडाला लावण्याची. हा निव्वळ जाहिरातींचा चमचमाटातून आलेला भोंगळ उपाय आहे. कारण ही शीतपेये जास्त प्रमाणात सेवन केली तर शरीरावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, असे वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांनी अनेकदा स्पष्ट केले आहे.
उकाडा सुरू होताच अनेक व्याधी मागे लागू शकतात. आला उन्हाळा, असा इशारा घरातील ज्येष्ठ मंडळी देतात तो यासाठीच. म्हणूनच या व्याधी टाळण्यासाठी, नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया केलेले टाळण्यासाठी ठरावीक वेळाने भरपूर पाणी प्या आणि उकाडा दूर पळवा.

No comments: