Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 9 April, 2009

रोहित प्रकरणी याचिका निकालात

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): अल्पवयीन जर्मन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार व न्यायमूर्ती एस. ए. बोबडे यांनी गंभीर दखल घेऊन दाखल करून घेतलेली "सुओमुटो' जनहित याचिका आज निकालात काढली.
या प्रकरणातील संशयित रोहित मोन्सेरात याच्याविरोधात बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे, त्याचप्रमाणे त्याची जामिनावर सुटकाही झाली असल्याने 'सुओमुटो' याचिका निकालात काढली जावी, अशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली होती.
रोहित फरार नव्हता. केवळ सुरुवातीच्या काळात त्याची पोलिसांना पोलिस कोठडीत गरज नव्हती, त्यामुळेच त्याला अटक करण्यात आली नव्हती. तथापि, पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात रोहित फरार होता, ही माहिती चुकीची असून त्यानंतर त्यात दुरुस्ती करण्यात आली,' अशी माहिती ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांनी न्यायालयाला दिली. रोहित याला बाल न्यायालयाने दिलेला जामीन अर्ज का रद्द करू नये, असा प्रश्न करून त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नोटीस बजावली होती, असेही ऍड. कंटक यावेळी म्हणाले.
२ ऑक्टोबर रोजी त्या पीडित मुलीच्या आईने कळंगुट पोलिस स्थानकावर रोहित मोन्सेरातच्या विरोधात तक्रार दाखल केला होती. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी सदर तक्रारीची दखल घेऊन नोंद केली. १४ ऑक्टोबरला गुन्हा नोंद होऊनही कोणालाच चौकशीसाठी ताब्यात घेतले नसल्याने खंडपीठाने पोलिस खात्यावर जोरदार ताशेरे ओढले होते. त्याचप्रमाणे या गुन्ह्याचे तपासकाम अन्य तपास यंत्रणेकडे का देऊ नये, अशी विचारणाही त्यावेळी मुख्य न्यायमूर्तींनी केली होती.

No comments: