Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 7 April, 2009

छाननीनंतर उत्तरेत ७; दक्षिणेत १४ उमेदवार

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील दोन्ही मतदारसंघांच्या उमेदवारांची छाननी आज पूर्ण झाली. उत्तर गोव्यातून ७ तर दक्षिण गोव्यात १४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. परवा ८ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निश्चित करण्यात आला असून त्यानंतरच प्रत्यक्ष आखाड्यात किती उमेदवार राहतील हे स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी आज सकाळी दोन्ही ठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.उत्तर गोवा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी सात अर्ज ग्राह्य धरण्यात आले. त्यात श्रीपाद नाईक(भाजप), जितेंद्र देशप्रभू(राष्ट्रवादी कॉंग्रेस), पांडुरंग राऊत (म.गो), ख्रिस्तोफर फोन्सेका(भा.क.प), उपेंद्र गांवकर(शिवसेना), नरसिंह सुर्या साळगावकर व मार्था डिसोझा(अपक्ष) यांचा समावेश आहे.
दक्षिण गोवा मतदारसंघासाठी (मुरगाव) सादर झालेल्या १६ उमेदवारी अर्जांतील दोन अर्ज आज छाननीवेळी फेटाळण्यात आले. आता १४ उमेदवार रिंगणात उरले आहेत. आज अर्ज फेटाळण्यात आलेले दोघेही अपक्ष उमेदवार आहेत. आंतोनियो कार्व्हाल्यो व जोकीम रोझारियो रॉड्रीगीस अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान,दक्षिण गोव्यात रिंगणात असलेल्या महत्त्वाच्या उमेदवारांत फ्रान्सिस सार्दिन(कॉंग्रेस), ऍड.नरेंद्र सावईकर(भाजप), माथानी साल्ढाणा(युगोडेपा), राजू मंगेशकर(भा.क.प), आंतोनीयो गांवकर(सेव्ह गोवा फ्रंट), नामदेव नाईक(शिवसेना) आदींचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.

No comments: