Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 7 April, 2009

"धीरयो' कायदेशीर करण्यास सार्दिन प्राधान्य देणार

पणजी, दि.६ (प्रतिनिधी) - दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यास संसदेच्या पहिल्या अधिवेशनातच "धीरयो' (बैलांच्या झुंजी) कायदेशीर करण्याबाबत खाजगी विधेयक सादर करणार असल्याचे आश्वासन कॉंग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी दिले. सरकार जर यासाठी भूसंपादन करीत असेल तर खासदार निधीतून झुंजीसाठी आखाडा तयार करण्यास अर्थसहाय्यही करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
आज पणजी येथील कॉंग्रेस भवनात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष एम.के.शेख व सरचिटणीस आर्थर सिकेरा हजर होेते. "सीआरझेड' हा विषय जिथे सरकारला सोडवणे शक्य होत नाही तिथे विरोधक काय सोडवतील,असा सवाल करून हा केंद्रीय विषय आहे परंतु तरीही याबाबत तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार अभ्यास करीत असल्याचे ते म्हणाले. आपण निवडून आल्यास विशेष आर्थिक विभाग "सेझ' परत आणणार असल्याचा अपप्रचार विरोधक करीत आहेत, असे ते म्हणाले. गोव्यातील जनतेला "सेझ'नको त्यामुळे जनतेच्या भावनांचा आदर करून राज्यात एकही "सेझ'आणला जाणार नाही,असेही यावेळी ते म्हणाले.
आपण निवडून आल्यास जुवारी नदीवर नवा पुल, नुवे-वेर्णा बगलमार्ग आदी गोष्टींना प्राधान्य देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नुवे-वेर्णा बगलमार्गामुळे येथील लोकांच्या मनात भिती व्यक्त झाल्याने त्यात हस्तक्षेप करून प्रसंगी लोकांची घरे वाचवण्यासाठी मार्गही बदलण्याचे आश्वासनही त्यांनी याप्रसंगी दिले. केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार व राज्यातील दिगंबर कामत सरकार यांनी सामान्य लोकांसाठी बरेच कार्य केल्याने येत्या निवडणुकीत कॉंग्रेसचा विजय निश्चित असल्याचेही ते म्हणाले.
कॉंग्रेसकडूनही निरीक्षकांची नेमणूक
येत्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे नेते,पदाधिकारी तथा कार्यकर्ते खरोखरच पक्षासाठी काम करतात काय किंवा त्यांना आखून दिलेले काम योग्य पद्धतीने करतात की नाही याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी खास निरीक्षकांची नेमणूक केल्याची माहिती सार्दिन यांनी दिली. चर्चिल आलेमाव हे कॉंग्रेससाठी काम करतील काय,असे विचारले असता ते बोलत होते. चर्चिल यांनी श्रेष्ठींचा निर्णय मान्य करण्याचे घोषित केले आहे. पक्षाचे सर्व नेते वावरल्यास सुमारे ४१ हजार मताधिक्क्याने विजयी होऊ ,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. युगोडेपा ही लोकांना गृहीत धरीत असल्याची टीका करून निवडणूक जवळ आल्या की हा पक्ष जागा होतो,असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला.

No comments: