Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 5 April, 2009

बैतुल्लाने स्वीकारली न्यूयॉर्क गोळीबाराची जबाबदारी

अमेरिकन हल्ल्याला तालिबानचे प्रत्युत्तर
इस्लामाबाद, दि. ४ : न्यूयॉर्क बिगॅम्टनच्या इमिग्रेशन सेंटरवर झालेला हल्ला मी घडवून आणला असून संपूर्ण अमेरिकेला हादरवणारे "ते' तालिबानी अतिरेकी होते, असे शनिवारी स्पष्ट करून तालिबानचा क्रूरकर्मा कमांडर बैतुल्ला महसूदने १४ निरपराध व्यक्तींचे प्राण घेणाऱ्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच पाकिस्तान - अफगाणिस्तान सीमेवर ड्रोन विमानांद्वारे तालिबानी अतिरेकी शिबिरांवर अमेरिका करत असलेल्या हल्ल्यांना हे प्रत्युत्तर असल्याचेही तो म्हणाला. अमेरिकेवर हल्ला करण्याची धमकी काही दिवसांपूर्वीच बैतुल्लाने दिली होती. या हल्ल्यासंदर्भात अमेरिकन गुप्तचर संस्थांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच बैतुल्ला उगाच फुशारकी मारत असल्याचे मत व्यक्त करताना जोपर्यंत सबळ पुरावा हाती येत नाही तोपर्यंत कोणावरही संशय व्यक्त करणे शक्य नसल्याची सावध प्रतिक्रियाही काही संरक्षण तज्ज्ञांनी दिली आहे.
बैतुल्लाच्या या कबुलीजबाबामुळे हा दहशतवादी हल्ला असल्याचे आता स्पष्ट झाले असून "फुल प्रूफ' अमेरिकेला तालिबानने पुन्हा एकदा जोरदार हादरा दिला आहे. तालिबानी कमांडरने एका वृत्तसंस्थेला अज्ञात स्थळावरून पाठविलेल्या संदेशात इमिग्रेशन सेंटरवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. शुक्रवारी हा दहशतवादी हल्ला असावा असा कयास वर्तविला जात होता. अमेरिकेने तालिबानी ठिकाणांवर केलेल्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून मीच या हल्ल्याचा कट रचला होता, असेही बैतुल्लाने सांगितले. अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचा अभिमान बाळगणाऱ्या अमेरिकेसाठी हा हल्ला खरेच धक्कादायक बाब असून पुन्हा एकदा महाशक्तीच्या सुरक्षेबद्दल संशय निर्माण झाला आहे. भरदिवसा गजबजलेल्या व महत्त्वाच्या ठिकाणी हा हल्ला झाल्यामुळे नागरिकही भयभीत झाले आहेत.
न्यूयॉर्कजवळ असलेल्या बिगॅम्टन शहरात स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास तीन अतिरेक्यांनी हा हल्ला केला होता. अत्याधुनिक रायफल हाती घेतलेला "हिरव्या' रंगाच्या जॅकेटमधील एक तरुण भीषण गोळीबार करीत इमिग्रेशन सेंटरमध्ये घुसला. त्याने व त्याच्या अन्य दोन सहकाऱ्यांनी ४० जणांना ओलीस ठेवले. या गोंधळादरम्यानच घाबरून सैरावैरा पळणाऱ्या १५ जणांना अतिरेक्यांनी गोळ्या घातल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नंतर या अतिरेक्याने स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या. त्याच्या अन्य दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. प्रारंभी गोळीबार करणारा माथेफिरू तरुण असावा असे वाटत होते. परंतु, आता हल्ला तालिबान्यांनी केल्याचे उघड झाले आहे.

No comments: