Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 8 April, 2009

जागतिक मंदीतही "एमपीटी'ची भरीव प्रगती

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - जागतिक आर्थिक मंदी असूनही मुरगाव बंदराने २००८-०९ या आर्थिक वर्षात आपली मालवाहतूक १९ टक्के वाढविली असून, जहाज मंत्रालयाने (आरटी ऍन्ड एच) निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा भरीव प्रगती केल्याची माहिती "एमपीटी 'चे चेअरमन प्रवीण अग्रवाल यांनी दिली.
२००८-०९ साली पोर्ट ट्रस्टने ४१.६८ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली जी गेल्या वर्षी म्हणजे २००७-०८ साली ३५.१३ दशलक्ष झाली होती. जहाज मंत्रालयाने निश्चित केलेली ४०.६० दशलक्ष उद्दिष्टापेक्षा ही वाढ ३ टक्क्यांनी जास्त झाली आहे.
व्यावसायिक नियोजन सल्लागाराने एमपीटीने २०१२ पर्यंत ४० दशलक्ष टन मालवाहतुकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची आवश्यकता दर्शविली होती. मात्र हे उद्दिष्ट एमपीटीने निश्चित केलेल्या वेळेपेक्षा तीन वर्षे अगोदरच व १२५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून पूर्ण केल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.
यंदाच्या वर्षी "एमपीटी'ने निर्यातीत २४ टक्के वाढीचा उच्चांक गाठला असून, ४१.६८ दशलक्ष टन वाहतुकींपैकी ३४.६७ दशलक्ष टन निर्यात करण्यात आली आहे तर ७.०१ दशलक्ष टन माल आयात केला आहे.
प्रमुख मालवाहतुकीत खनिज मालाची ३३.८१ दशलक्ष टन, कोळशाची ४.११ दशलक्ष टन वाढ झाली आहे. ही सर्वांत मोठी वाढ असून मंत्रालयाने निश्चित केलेल्या आर्थिक वर्षातील ३०.४० दशलक्ष टन उद्दिष्ट पार करणारी आहे. क न्टेनर वाहतूक आणि मालवाहू जहाजामध्येही यावर्षी लक्षणीय वाढ झाल्याचे ते म्हणाले.गेल्या वर्षी बंदरात ८२५ मालवाहू जहाजे लागली.त्यात वाढ होऊन यंदाच्या वर्षी ती ८९० वर पोहोचली.
शेजारी बंदरातील वाहतूक आकर्षित करण्यासाठी लागू केलेल्या योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला व पश्चिम विभागात वाहतूक दुप्पटीने वाढल्याचे अगरवाल यांनी सांगितले.
जागतिक मंदीचा फटका मुरगाव बंदरातील जलपर्यटक वाहतुकीस बसला. यंदाच्या वर्षी केवळ २४ जलपर्यटक जहाजांतून १०८७८ प्रवासी आहे, जी संख्या गेल्या वर्षी ३८ जहाजांतून १२९९७ एवढी होती.
मुरगाव बंदराचे तात्पुरते उत्पन्न यंदाच्या वर्षी २९० कोटीवर पोहोचले जे गेल्या वर्षी २६८ होते. एकूण महसुलातही आकर्षक वाढ झाली आहे.पेन्शन ट्रस्ट निधीला २८ कोटी आणि ग्रॅज्युइटी ट्रस्ट फंडला २.५० कोटी निधी देण्यात आला आहे. निवृत्तीवेतनासाठी वरील निधी काढल्यानंतर एकूण निव्वळ थकबाकी १८ कोटी राहील जी गेल्या वर्षी ३९.८५ कोटी होती.
नवीन विकासात्मक कामासंबंधी माहिती देताना अग्रवाल यांनी सध्या सुरू असलेल्या अतिरिक्त तीन मूरिंग डॉल्फिन्सचे काम ऑक्टोबर २००९ पर्यंत पूर्ण होणार असल्याचा आत्मविश्वास दर्शविला व त्यासाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सांगितले.
बंदराला जोडणाऱ्या चारपदरी रस्त्यासंबंधी माहिती देताना श्री.अग्रवाल यांनी या संबंधी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत बंदराला जोडणाऱ्या रस्त्यांची योजना हाती घेण्यात आली असून मुरगाव पोर्ट कंपनी लिमिटेड मार्फत त्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्राधिकरणाने उर्वरित ५.२० किमी. रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे ठरविले असून वरूणापुरी जोडरस्ता ते सडापर्यंतची निविदा लवकरच काढण्यात येणार आहे.
एमपीटीने पोर्ट क्राफ्ट व लहान बोटींसाठी धक्का बांधण्याचे काम यापूर्वीच सुरू केले असून,१९० मी. लांब व १० मीटर रुंदीच्या या धक्क्याचे काम मार्च २०१० पर्यंत पूर्ण होणार असल्याचे ते पुढे म्हणाले.
एमपीटीच्या विस्तारीकरणासंबंधी बोलताना, २५२ कोटी रुपयांचा आधुनिक कोळसा निर्यात टर्मिनल उभारण्यात येणार असून त्यासाठी पाच जणांची संक्षिप्त यादी तयार केली आहे.जागतिक मंदी असून सुध्दा श्री अग्रवाल यांनी एमपीटी आगामी काळात आपली प्रगती चालूच ठेवेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

No comments: