Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 11 April, 2009

सरपंच व पंचसदस्यांचा आज भाजपतर्फे मेळावा

पणजी, दि. १० (प्रतिनिधी): भाजप पंचायतीराज विभागातर्फे उद्या ११ रोजी राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, जिल्हापंचायत सदस्य तथा विद्यमान व माजी पंचायत सदस्यांसाठी भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. पर्वरीतील संत गाडगे महाराज सभागृहात संध्याकाळी ३.३० वाजता या मेळाव्याचे उद्घाटन पंचायतीराज विभागाचे भाजपचे राष्ट्रीय निमंत्रक भारतभाई गाजीपारा यांच्याहस्ते होणार असून विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर तथा भाजपचे इतर नेतेही यावेळी मार्गदर्शन करतील.
राज्याचा विकासात स्थानिक संस्थांना विश्वासात घेऊन निर्णय प्रक्रियेत त्यांनाही सहभागी करून घेण्याची नितांत गरज आहे. पंचायतीराज संस्था मजबूत करून हे उद्दिष्ट गाठणे शक्य असल्याने सरकारने पंचायत संस्था तथा जिल्हा पंचायतींना त्यांचे हक्क बहाल करण्याची गरज असल्याचे मत गोवा प्रदेश भाजप पंचायतीराज विभागाचे निमंत्रक प्रेमानंद म्हांबरे यांनी व्यक्त केले. या मेळाव्यात अनेक महत्त्वाचे ठराव घेण्यात येतील. अलीकडेच पंचायतमंत्री बाबू आजगावकर यांनी विधानसभेत पंचायतीराज दुरुस्ती विधेयक मांडून ते घाईघाईने संमत करून घेण्याची कृती केली. या विधेयकाला सत्ताधारी तथा विरोधी आमदारांनीही हरकत घेतल्याने हे विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आले आहे. मुळात हे विधेयक पूर्णपणे पंचायत विरोधी असून ते तात्काळ मागे घेण्याची मागणी या मेळाव्यात केली जाईल. पंचायत मंडळांचे हक्क हिरावून घेऊन ते पंचायत सचिवांना बहाल करण्याचा कट पंचायतमंत्र्यांनी या विधेयकामार्फत थाटला आहे व तो अजिबात साध्य होऊ देणार नाही, असा निर्धारही भाजप पंचायतीराज विभागाने केला आहे.
दरम्यान, या मेळाव्यात इतरही काही महत्त्वाचे विषय चर्चेला येतील. राज्यातील सर्व पंचायत तथा जिल्हा पंचायत सदस्यांना हक्काचा निधी देणे, पंचायत व जिल्हा पंचायतींना घटनेच्या ७३ व्या कलमानुसार त्यांचे अधिकार, निधी व विकासकामे मिळायला हवीत, राज्य वित्त आयोगाने केलेल्या शिफारशींनुसार पंचायत व जिल्हा पंचायतींना त्यांचे हक्क मिळायला हवेत, जिल्हा पंचायतींना कायमस्वरूपी पायाभूत सुविधा निर्माण करून त्यांना महसुलाचा स्रोत मिळवून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न हवेत, आदी सर्व विषयांवर सखोल चर्चा या मेळाव्यात होणार आहे.
या मेळाव्यासाठी राज्यातील सर्व पंचायत तथा जिल्हा पंचायत सदस्यांना आमंत्रित करण्यात आले असून या सर्वांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला हजर राहावे,असे आवाहनही श्री.म्हांबरे यांनी केले आहे.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys