Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 5 April, 2009

पाकमध्ये आत्मघाती हल्ल्यात ६ सैनिक ठार

इस्लामाबाद, दि. ४ : पाकिस्तानच्या इस्लामाबाद या राजधानीत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कार्यालयाजवळील जीना सुपर मार्केटच्या परिसरात आत्मघाती दहशतवाद्यांनी आज रात्री उशिरा चढवलेल्या हल्ल्यात फ्रंटियर कोअर ("एफसी') या निमलष्करी दलाचे सहा सैनिक ठार झाले असून पाच जखमी झाले आहे; तर "एफसी'ने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला.
जेथे हल्ला झाला तेथे अनेक महत्त्वाच्या आस्थापनांची कार्यालये, अतिमहनीयांची निवासस्थाने व फ्रंटीयर कोअरच्या सैनिकांची छावणी आहे. दहशतवाद्यांनी या छावणीला लक्ष्य करण्यासाठी बॉम्बस्फोट केला. त्यानंतर एफसीच्या सैनिकांनी लगेच कारवाई केली. त्यांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला आहे.
सुरक्षेचा उपाय म्हणून सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण परिसराला घेरले आहे. नागरिकांना बाहेर काढून आणखी दहशतवादी लपले आहेत का, याचा शोध सुरू आहे. शहरातील सर्व इस्पितळांना जखमींवर उपचार करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.
इस्लामाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच एफसीच्या सैनिकांची मोठी तुकडी इस्लामाबादहून पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर जाणार आहे. या तुकडीतील सैनिकांना दहशतवाद्यांशी लढण्यासाठी इंग्लडचे सैनिक इस्लामाबादमध्येच विशेष प्रशिक्षण देत आहेत. हे प्रशिक्षण थांबावे आणि एफसीच्या सैनिकांमध्ये घबराट पसरावी या उद्देशानेच दहशतवाद्यांनी हल्ला केला.
दरम्यान, या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेला जोरदार दणका बसला आहे. तेथे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बॉंबस्फोटांची मालिकाच सुरू झाली आहे. श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर झालेल्या हल्ल्यानंतर लाहोरमध्ये नव्यानेच पोलिस प्रशिक्षण केंद्रावर हल्ला झाला होता. त्यापाठोपाठ हा ताजा हल्ला झाला आहे.

No comments: