Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 8 April, 2009

कुशाग्र बुद्धीचा अधिकारी
या अपघातात ठार झालेले बसवाणी हरिजन हे बेळगाव जिल्ह्यातील मुळगाव हुळगीचे. ते कॉन्स्टेबल म्हणून पोलिस खात्यात भरती झाले. उपजतच लाभलेल्या तल्लख बुद्धीमुळे तपास कसा करावा याची त्यांना नेमकी जाण होती. त्यामुळे ते आपल्या सहकाऱ्यांत प्रिय होते. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावरच त्यांनी कॉन्स्टेबल ते पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली. त्यांची कारकीर्द बहरत असतानाच त्यांना अकाली मरण आले. त्यामुळे गोवा पोलिस दलातील त्यांचे कित्येक सहकारी गहिवरले. पाहताक्षणी ते पोलिस उपनिरीक्षक आहेत असे वाटायचेच नाही इतके त्यांचे चालणे-बोलणे साधे होते. अनेक पत्रकारांनाही त्यांच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवणे कठीण बनले होते. उमेश गावकर हे जेव्हा पणजी पोलिस स्थानकात निरीक्षक होते तेव्हा बराच काळपर्यंत बसवाणी यांनी त्यांच्यासोबत काम केले होते.

चंदगडजवळ भीषण अपघातात सहा ठार
मृतांत गोव्याचे पोलिस उपनिरीक्षक बसवाणी हरिजन व कुटुंबीय
सॅंट्रो मोटारीचा चेंदामेंदा
आंब्याच्या झाडाला धडक
राजेंद्र मकोटे

कोल्हापूर, दि. ७ - बेळगाव - गोवा महामार्गावर आज दुपारी पावणेदोनच्या दरम्यान चंदगड पोलिस स्थानकापासून सुमारे दोन किलोमीटरवर शेडगाव फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात गोव्यातील शिवोली सागरी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक बसवाणी भीमाण्णा हरिजन यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील दोन पुरुष, दोन स्त्रिया व एक लहान मुलगी असे एकूण सहा जण ठार झाले.
बेळगावहून हरिजन हे आपल्या कुटुंबीयांसह गोव्याकडे (म्हापशाला) सॅंट्रो मोटारीने (क्र. जीए ०३ सी ५२३९) येत होते. या वाहनात तीन पुरुष, दोन महिला व एक मुलगी असे एकूण सहा जण प्रवास करत होते. मृतांची नावे सुशांत बसलिंगाप्पा तलवार (वय २३ रा. शिंगेहोळ ता. गोकाक), सौ. तळद्वा केपाण्णा हरिजन (वय ४८) व केपाण्णा नागाप्पा हरिजन (वय ५२ दोघेही रा. बुद्धिहाळ जि. बेळगाव), बसवाणी हरिजन (वय ५०), भूमी हरिजन (वय चार वर्षे), बबीता हरिजन (वय १७) अशी आहेत. भूमी व बबीता या दोघी बसवाणी यांच्या कन्या होत्या.
आंबोली बेळगाव मार्गावर वाली पेट्रोल पंपाजवळ बसवाणी यांची सॅंट्रो मोटार पोहोचली असता बसवाणी यांचा मोटारीवरील ताबा गेला. त्यामुळे समोर असलेल्या आंब्याच्या एका झाडाला या वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भयंकर होती की, त्यात गाडी झाडाला धडकून पुन्हा सुमारे पाचशे फूट मागे फरफटत आली. त्यात या मोटारीचा चक्काचूर झाला व आतील सर्वजण जागीच गतप्राण झाले. सर्व मृतदेह छिन्नविछीन्न झाल्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण बनले होते. पोलिसांनी तपासणी केल्यानंतर हरिजन यांचे ओळखपत्र सापडले व त्यानंतर त्यांनी हरिजन यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. त्यावेळी हरिजन यांचा मुलगा व पत्नी हे गोव्यातच मयडे येथे आपल्या घरी होते. त्यांना अपघाताची माहिती मिळताच ते त्वरेने चंदगडला रवाना झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच म्हापसा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी गोलतेकर हेही तातडीने चंदगडला रवाना झाले. सर्व मृतदेह चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून तेथेच शवचिकित्सा करण्यात येणार असल्याची माहिती चंदगड पोलिस स्थानकाचे साहाय्यक उपनिरीक्षक श्री. कोरे यांनी दिली.

No comments: