Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 5 April, 2009

वास्को रेल्वे यार्डातून लाखोंचा तांदुळ गायब

वास्को, दि. ४ (प्रतिनिधी) : सडा वास्को येथील भारतीय अन्न महामंडळासाठी रेल्वे मार्गाने आलेल्या प्रत्येकी ५० किलोच्या ५३,९९० तांदळाच्या गोण्यांपैकी २३६ गोण्या चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. या तांदळाची किंमत दोन ते अडीच लाख रुपयांच्या आसपास असल्याची माहिती मिळाली आहे. वास्को रेल्वे यार्डमध्ये उभ्या करून ठेवलेल्या मालगाडीच्या डब्यांमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात तांदळाच्या गोण्या गायब झाल्याने येथील सुरक्षा यंत्रणेच्या कार्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जगदलपूर - छत्तीसगड येथून वास्को येथील अन्न महामंडळाच्या शाखेसाठी २६ मार्च रोजी ९९३३४३ क्रमांकाच्या मालगाडीच्या ४३ डब्यांतून प्रत्येकी ५० किलोच्या एकूण ५३,९९० तांदळाच्या गोण्या आल्या होत्या. सदर मालगाडी वास्कोत दाखल झाल्यानंतर महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ४३ डब्यांपैकी १२ डबे खाली केले. त्यात असलेला माल त्यांच्या सडा येथे असलेल्या गोदामात नेला. नंतर दुसऱ्या दिवशी (दि.२७ रोजी) आणखी २१ डबे खाली करून २६,८८० किलो तांदुळ गोदामात नेण्यात आला होता. तिसऱ्या दिवशी उर्वरित दहा डब्यांतील तांदळाच्या गोण्या रेल्वे यार्डमधून नेल्या जात असता शेवटच्या डब्याचे सुरक्षा सील तोडण्यात आल्याचे लक्षात आले. यावेळी एकूण ११,८०० किलो तांदूळ (२३६ गोण्या) डब्यातून गायब झाल्याचे स्पष्ट झाले. १०४४ गोण्यांपैकी २३६ गोण्या गायब झाल्याने लक्षात येताच वास्को रेल्वे पोलिसांना याची माहिती देण्यात आली. रेल्वे पोलिसांनी सदर प्रकरण रेल्वे पोलिस फोर्सकडे (आर.पी.एफ) सोपवले आहे.
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगड येथून अन्न महामंडळाचा माल वास्को रेल्वे यार्डात पोहोचल्यानंतर ४३ डब्यांची तपासणी करण्यात आली होती. तेव्हा सर्व डबे सीलबंद होते. तथापि, २७ रोजी शेवटचे दहा डबे खाली करण्यात येत असताना एका डब्याचे सील काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे दरम्यानच्या काळात येथे चोरी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रेल्वे यार्डमधून अन्न महामंडळासाठी आलेला तांदळापैकी ११,८०० किलो तांदूळ चोरीला गेल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिली असता त्यांनी त्वरित येथे येऊन तपासणी केली व तक्रार नोंदविली. छत्तीसगड येथून आलेला माल आर.पी.एफच्या हद्दीत येत असल्याने येथे अन्न महामंडळाचा सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आला नव्हता, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. वास्को रेल्वेच्या क्षेत्रातून अशा प्रकारे अन्न महामंडळाचा माल मोठ्या प्रमाणात चोरीला गेल्याने येथील सुरक्षेबाबत शंका निर्माण झाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी यासंदर्भात तपास सुरू केला आहे.

No comments: