Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 21 December 2008

किनाऱ्यांवरील खुल्या पार्ट्यांवर २३ डिसें. ते ५ जाने.पर्यंत बंदी

राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
पणजी, दि. २० (प्रतिनिधी) - गुप्तहेर यंत्रणांकडून मिळालेल्या संकेतानुसार येत्या नाताळ व नववर्षाच्या मुहूर्तावर राज्यातील किनारे दहशतवाद्यांचे लक्ष्य बनण्याची दाट शक्यता असल्याने आज अखेर उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीत २३ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत किनाऱ्यांवरील खुल्या नाइट पार्ट्यांवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या येथील सरकारी निवासस्थानी झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री यांच्यासह गृहमंत्री रवी नाईक, पोलिस महानिरीक्षक किशनकुमार, मुख्य सचिव जे. पी. सिंग, उत्तर व दक्षिण जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक,उपविभागीय अधिकारी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या निर्णयाबाबत सरकारांतर्गत मतभेद निर्माण झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. अशा पार्ट्यांवर बंदी घालण्याबाबत पक्षांतच मतभेद आहेत, परंतु वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या अहवालाबाबत विस्तृत माहिती देऊन सुरक्षेच्याबाबतीत तडजोड करणे कठीण असल्याचे ठणकावून सांगितल्यानंतरच या बंदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
आजच्या या बैठकीच्या निर्णयाबाबत कुणीच स्पष्टपणे बोलण्यास राजी नाही,अशी परिस्थिती निर्माण झाली. सुरक्षेच्या बाबतीत घेण्यात येणाऱ्या निर्णयांबाबत आपण वेळोवळी प्रसारमाध्यमांना माहिती देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी जरी दिले असले तरी या महत्त्वाच्या निर्णयाबाबत त्यांनी काहीच कळवले नसल्यानेही संभ्रम निर्माण झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार राज्यातील विविध हॉटेल तथा पर्यटन उद्योगाशी संबंधित विविध उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात दबाव सरकारवर आणला होता. याप्रकरणी कळंगुटचे आमदार आग्नेल फर्नांडिस यांनीही किनारी भागातील अशा पार्ट्यांवर बंदी घातल्यास त्याचा फटका अनेक उद्योजकांना बसणार असल्याची गोष्ट सरकारच्या नजरेस आणून दिल्याचीही माहिती मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी दक्षिण गोवा उपजिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला आदेश मागे घ्यायला लावण्यामागे हॉटेल लॉबीचा दबाव कारणीभूत असल्याची माहिती खास सूत्रांनी दिली. नाताळ व नववर्षाचा काळ हा पर्यटन उद्योगास महत्त्वाचा असल्याने या आठ दिवसांत होणारा व्यवसाय संपूर्ण वर्षभराची मिळकत असल्याचे या उद्योगातील व्यावसायिकांनी सांगितले. गोव्यातील किनारी भाग प्रामुख्याने दक्षिण गोव्यातील किनाऱ्यांवर देशीविदेशी पर्यटकांची झुंबड उडते.अशावेळी केवळ निर्बंध घालून या पार्ट्या सुरू ठेवल्यास अधिक गोंधळ निर्माण होण्याचा धोका असल्याचेही पोलिसांनी यावेळी स्पष्ट केले. पोलिस संरक्षणात या पार्ट्यांना अनुमती देणे म्हणजे नवी डोकेदुखी ठरणार असल्याने या काळात खुल्या किनाऱ्यांवर होणाऱ्या पार्ट्यांवरच बंदी घालण्याची शिफारस यावेळी करण्यात आली. विविध हॉटेलांत आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांना सुरक्षेबाबतच्या सूचना व नियम लादण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
गृहमंत्री रवी नाईक यांनी या बंदीचा पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या कार्यक्रमांवर काहीही परिणाम होणार नसल्याचे सांगितले. हॉल किंवा हॉटेलांत होणाऱ्या पार्ट्यांना मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आली असून त्याचबरोबर अत्यावश्यक उपाययोजनाही आखण्यात आल्याचे ते म्हणाले.
आणखी दोन तुकड्यांची मागणी
गोव्यात सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या दोन तुकड्या तैनात आहेत. अशावेळी खास नाताळ व नववर्षाच्या निमित्ताने दोन अतिरिक्त तुकड्या मागवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कामत यांनी दिली. यासंबंधी केंद्राला पत्र पाठवण्यात आले असून त्यांनी सकारात्मक संकेत दिल्याचे ते म्हणाले.

No comments: