Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 25 November, 2008

पाळी मतदारसंघ भाजपला अनुकूल

पाळी, दि.२४ (विशेष प्रतिनिधी): पाळी पोटनिवडणुकीत कोण विजयी होणार हे सांगणे जरी कठीण असले तरी भाजपच बाजी मारेल असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. यामागे तसे सबळ कारण सांगितले जाते. सध्या भाजप, कॉंग्रेस व डॉ.सुरेश आमोणकर यांच्यामध्ये लढत असल्याचे दिसत असले तरी तो एक भास आहे, असे तेथील प्रत्यक्ष स्थिती दर्शविते. खरी लढत कॉंग्रेसचे प्रताप गावस व भाजपचे डॉ. प्रमोद सावंत यांच्यामध्येच आहे. मतदार कोणाच्या बाजूने आहेत ते २६ रोजी मतदानात व २९ रोजी निकालाने स्पष्ट होणार आहे. कोणीही आपल्या विजयाचा दावा ठामपणे करीत नाही, कारण घडीघडीला राजकारण बदलत आहे. कॉंग्रेसमध्ये कोणाला उमेदवारी द्यावी याबाबत एकमत होत नव्हते तर विश्वजित राणे यांच्या मनात वेगळ्याच उमेदवाराचे नाव होते. अखेर प्रताप गावस यांच्या नावावर कॉंग्रेसने शिक्कामोर्तब केले. डॉ. सुरेश आमोणकरांना बाजूला ठेवत भाजपने नव्या दमाचे लोकप्रिय उमेदवार डॉ. प्रमोद सावंत यांना उमेदवारी दिल्यामुळे डॉ. आमोणकर यांना काही जणांनी अपक्ष उमेदवार म्हणून पुढे आणले. यामागे विश्वजित राणे यांचा हात असल्याचे सुरवातील मानण्यात येत होते. राणे हे दोन दगडांवर पाय ठेवून आहेत, कारण त्यांना आपल्यासोबत आणखी एक अपक्ष निवडून आणायचा आहे, अशी चर्चा होत होती, तथापि अलीकडे हा कयास चुकीचा असल्याचेच सिद्ध झाले आहे, त्यामुळे डॉ. आमोणकर यांचे कार्यकर्ते निराश झाले आहेत. दुसऱ्या बाजूला प्रताप गावस निवडून आले तर सध्याच्या कॉंग्रेसच्या बजबजपुरीत भर पडेल, असे मतदारांना वाटत आहे. सध्याच्या सरकारबद्दलची जनतेमधील नाराजी लक्षात घेऊन तसेच भविष्याचा विचार करून राणे योग्य वेळी योग्य ती भूमिका वठवतील, असे मानले जाते. भाजपचे डॉ. सावंत निवडून आले तर एक सक्षम व कार्यतत्पर सरकार गोमंतकीयांना लाभू शकेल, अशी चर्चा चालू आहे. अशा सरकारला अपक्षांचे समर्थन लाभू शकेल, असे मानले जाते.
कॉंग्रेस नेते प्रतापसिंग राणे व विश्वजित कॉंग्रेसच्या रोडशो मध्ये सहभागी झाले असले तरी, त्यांच्यावर विसंबून राहाण्याची कॉंग्रेसची तयारी नाही. याचसाठी रवी नाईक आपल्या सहकाऱ्यांसह मतदारांवर प्रभाव टाकू पाहात आहेत. सभापतीपदी राणे असल्याने आगामी राजकारणावर त्यांचा सर्वात अधिक प्रभाव राहाणार आहे. रेजिनाल्ड व चर्चिल यांची आमदारकी सध्या तरी अधांतरीच आहे, याची कल्पना विश्वजित यांना पुरेपूर आहे. नव्या समीकरणात त्यांना अधिक चांगले स्थान मिळू शकेल असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. सध्या सर्वांचे डोळे मतदानावरच नव्हे तर शनिवारच्या मतमोजणीकडे लागून राहिले आहेत. राजकीय उलथापालथ होते की कालचा तमाशा बरा होता..असे म्हणण्याची पाळी जनतेवर पाळी मतदारसंघ आणतो, एवढेच पाहणे गोमंतकीयांच्या हाती आहे.

No comments: