Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 29 November, 2008

सुरक्षेची ऐशीतैशी, 'कडक बंदोबस्त' ही निव्वळ धूळफेक, फक्त दहा रुपयांसाठी राज्याची सुरक्षा पणाला!

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई हे महानगर दहशतवाद्यांनी वेठीला धरल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील सुरक्षा कडक करण्यात आल्याची फुशारकी व दहशतवादी हल्ल्याचा प्रतिकार करण्यास येथील सुरक्षा व्यवस्था सज्ज असल्याचा टेंभा येथील वरिष्ठ पोलिस अधिकारी तथा मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री कितीही मिरवत असले तरी हा केवळ जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचा प्रकार असल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणी सुरक्षा व्यवस्थेबाबत करण्यात आलेल्या खास पाहणीत तसेच हाती घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार पोलिस खात्यात बोकाळलेला भ्रष्टाचार गोव्याच्या मुळावर येण्याची दाट शक्यता आहे. हा प्रदेश केवळ दहा रुपयांसाठी दहशतवाद्यांच्या विळख्यात सापडू शकतो व बेचिराखही होऊ शकतो एवढी दारुण परिस्थिती येथे सुरू आहे. सुरक्षेचे सर्व ते उपाय योजण्यात आल्याचे छातीठोकपणे सांगणारे वरिष्ठ पोलिस अधिकारी व पुढारी यांना खरोखरच या प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीव आहे की ते मुद्दामहून गेंड्याची कातडी पांघरून जनतेच्या जिवाशी खेळ करीत आहेत, हे कळायला कळायला मार्ग नाही. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी राज्यातील सुरक्षेच्या उपायांची जंत्री दासर केली आहे. मात्र त्यावर जनतेने कितपत विश्वास ठेवावा हा प्रश्न वेगळा. प्रत्यक्षात स्थितीची पाहणी केल्यास काहीही ठीक नाही, हे उघड झाले आहे. केवळ पोकळ वक्तव्ये न करता कागदोपत्री आखण्यात आलेल्या योजना प्रत्यक्षात उतरत आहेत का, याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने सरकारचा गाफीलपणा कायम राहिल्यास मुंबईसारखी गोव्यातही परिस्थिती ओढवण्यास अजिबात वेळ लागणार नाही.
गोव्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जाईल, असे ठामपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आता प्रत्यक्षात गोव्यातील काही तपासनाक्यांची पाहणी केल्याअंती उघड झालेली माहिती केवळ धक्कादायकच नव्हे तर आपली सुरक्षा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलिसांकडूनच केवळ दहा रुपयाच्या नोटीसाठी सुरू असलेली शर्यत आपल्या जिवावर बेतण्याचा धोका निर्माण झाला आहे. पोलिसांच्या तोंडावर फक्त दहा रुपयांची नोट फेकून कुणीही बिनधास्तपणे राज्यात प्रवेश करू शकतो व त्याची कोणताही तपास किंवा वाहनाजवळ जाण्याची तसदीही कुणी घेत नाही, अशी माहिती उघड झाली आहे. त्यात पत्रादेवी, न्हयबाग तसेच अस्नोडा येथेच पोलिस, अबकारी, रस्ता वाहतूक आदींचे तपासनाक्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर तेरेखोल व किरणपाणी मार्गेही गोव्यात फेरीबोटच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात इतर राज्यातील वाहने येत असल्याने त्यासाठी कोणतीही तपासयंत्रणा नसल्याचे उघड झाले आहे. दोडामार्गहून थेट नागझरमार्गे गोव्यात आल्यास शिवोलीमार्गे शहरात कोणत्याही अडथळ्याविना पोहचता येते. तपासनाक्यावर पोलिसांकडून होत असलेल्या हयगयीचा हा प्रकार मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी लक्षात आणून दिला असता त्यांनी दोन्ही जिल्हा अधीक्षकांवर त्याबाबतची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सांगितले होते.
पैशांपुढे सुरक्षेला ठेंगा!
पत्रादेवी व न्हयबाग येथील तपासनाक्यावर सुरू असलेल्या प्रकारांची सखोल माहिती मिळवली असता अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाला आहे. पैशांच्या लालसेपोटी राज्याच्या सुरक्षेला काडीमात्र किंमत नसल्याचे प्रकार तेथे सर्रास सुरू असल्याचे उघड झाले आहे. पत्रादेवी व न्हयबाग येथील तपासनाक्यावर एकूण चार पोलिस हजर असतात. त्यात एक हवालदार व तीन शिपायांचा समावेश असतो. या कर्मचाऱ्यांना सतत आठ दिवस येथे ड्यूटी करावी लागते. पेडणे पोलिस स्थानकाअंतर्गत हे तपासनाके येत असल्याने प्रत्येक पोलिस शिपायाला तीन महिन्यात इथे ड्यूटी करण्याची संधी मिळते. या तपासनाक्यावरून गोव्यात प्रवेश करणाऱ्या ट्रक,टेंपो,रिक्षा किंवा इतर मालवाहतुकीसाठी दहा रुपये दर निश्चित झाला आहे. ही दहा रुपयांची नोट अमूक एका ठिकाणी ठेवल्यास त्यांची कोणतीही तपासणी केली जात नाही. इतर राज्यांतील खाजगी वाहने व भाड्याची वाहने यांच्याकडून ५० रुपये आकारले जातात, त्यात काही वाहनांत अतिरिक्त प्रवासी असल्यास २०० ते २५० रुपये घेतले जात असल्याचीही माहिती मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एकदा तेथे प्रत्यक्ष भेट देऊन हा प्रकार पाहिला होता व त्यानंतर काही प्रमाणात त्यांचा वचकही निर्माण झाला होता. मात्र हे तपासनाके तेथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या वरकमाईची साधने असल्याने त्यांच्या आशीर्वादानेच हे प्रकार सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. हीच परिस्थिती न्हयबाग येथील सातार्डा पुलाकडील तपासनाक्यावर आहे. पत्रादेवी तपासनाक्यावर या आठ दिवसात सुमारे २० हजार तर न्हयबाग येथे सुमारे १२०० रुपयांची कमाई होते. यापैकी ३ ते ४ हजार रुपये पोलिस स्थानकाच्या प्रमुखांना जातात, १० टक्के उपअधीक्षक, १० टक्के गुन्हा विभाग व उर्वरित पैसे ड्यूटीवरील कर्मचाऱ्यांत आपापसात वाटले जातात. हे पैसे लपवून ठेवण्यासाठीही खास जागा निश्चित केलेली असतेअन्यथा याठिकाणी ड्यूटीवर असलेल्या गृहरक्षकाचा खिसा हीच या कमाईची तिजोरी बनवली जाते. या तपासनाक्यावरील पोलिसांकडे सामानाची किंवा शस्त्रांची तपासणी करण्याच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. गोवा-मुंबई बसवाहतूक करणाऱ्या गाड्यांकडून प्रत्येकी शंभर रुपये आकारले जातात व त्यांना बिनदिक्कत येता-जाता येते असेही उघड झाले आहे. सुरक्षा व राज्याचा महसूल या दृष्टीने उभारण्यात आलेले हे तपासनाके पोलिस,अबकारी व रस्ता वाहतूक खात्यांसाठी चरण्याची कुरणेच बनल्याचे सर्वज्ञात असूनही सरकार त्याबाबत काहीही करू शकत नाही, यावरूनच जनतेच्या सुरक्षेची किती काळजी विद्यमान सरकारला आहे, हे उघड झाले आहे.

No comments: