Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 28 November, 2008

त्यांनी अनुभवला साक्षात मृत्यू! मुंबईतील रेल्वे प्रवासी गोव्यात दाखल

मडगाव, दि. २७ (प्रतिनिधी): मुंबईतील काल रात्रींचे महाभयानक स्फोट व अतिरेकी हल्ल्यांमुळे विलंब झालेली कोकण रेल्वेची गाडी आज तब्बल दोन तास उशिरा म्हणजे दुपारी १२-३० ऐवजी अडीच वाजता येथे दाखल झाली व आतील प्रवाशांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.
ही गाडी सुटतानाच साधारणतः सीटीएसवर बॉंबस्फोटांचा धमाका उडाला व त्यानंतर एकच धावपळ उडाली होती. त्या गडबडीत बरेच प्रवासी अडकून पडले. काही जण मिळेल त्या डब्यात घुसून नंतर आपापल्या डव्यात परतले. रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याही परिस्थितीत गाडीला संपूर्ण सुरक्षा पुरवून गाडी मुंबईबाहेर काढली व नंतरच प्रवाशांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. काहींनी आज येथे उतरल्यावर हा आपला पुनर्जन्म असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. एकाने तर आपण साक्षात मृत्युचे दर्शन घेतल्याचे सांगितले.
दरम्यान, महानगरातील स्थिती सुधारली नसल्याने त्याचा परिणाम येथून तिकडे निघणाऱ्या बसेसवर झालेला दिसून आला. येथील रेल्वे स्टेशनवर खबरदारीखातर जरी मेटल डिटेक्टर जरी बसविलेले असले तरी सीसीटीव्ही बसवण्याची योजना धूळ खात पडलेली असल्याने सुरक्षा व्यवस्थेत अनेक त्रुटी दिसून येत आहेत.
पोलिस अधीक्षक ऍलन डिसा यांनी आज दक्षिण गोव्यातील पंचतारांकित हॉटेलांचे चालक व व्यवस्थापक यांची तातडीची बैठक घेतली व हॉटेलांकडून सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोर पालन केले जात नसल्याबद्दल त्यांना समज दिली. मडगाव पोलिसांनी कालच्या मुंबईतील घटनांची गंभीर दखल घेताना बाजारातील आपली गस्त तसेच महामार्गांंवर अनोळखी वाहनांची कसून झडती घेण्याचे काम पूर्ववत सुरू केले.

No comments: