Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 25 November, 2008

'आम्ही मृत्यू डोळ्यांसमोर पाहिला' सोमालियातून इजिदोर व ऍलिस्टर परतले जन्मभूमीत


वास्को, दि. २४ (पंकज शेट्ये): जीवन की मृत्यू याचा विदारक अनुभव सुमारे दोन महिने घेतल्यानंतर आपल्या अन्य २० साथीदारांबरोबर घेतल्यावर इजिदोर फर्नांडिस व ऍलिस्टर फर्नांडिस आज दुपारी सुखरुपपणे गोव्यात परतले आणि त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले... १६ सप्टेंबर रोजी आफ्रिका खंडातील सोमालिया देशात सागरी चाच्यांनी "स्टॉल्ट व्हेलोर' या जहाजावरून त्यांचे अपहरण केले होते.
त्यामुळे या दोघांच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलांच्या परत येण्याची आशाच सोडली होती.
मात्र, आज त्यांना दोबोळी विमान तळावर सुखरुप पाहून दोघांच्या कुटुंबीयांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. मानवी नातेसंबंध दृढतर करणारे हे अनोखे दृश्य पाहून तेथे उपस्थित असलेल्यांनाही आपल्या भावनांना बांध घालणे कठीण बनले होते.
जपानमधील एका व्यापारी कंपनीच्या मालकीचे हे जहाज रसायनांचा साठा घेऊन निघाले असता चाच्यांनी त्याचे अपहरण केले होते. या जहाजावर १८ भारतीयांसह एकूण २२ सेवक होते. तब्बल दोन महिने त्यांना ओलिस म्हणून ठेवण्यात आले होते. जेव्हा चाच्यांच्या अटी पूर्ण झाल्या तेव्हाच या सर्वांना १६ नोव्हेंबर रोजी मुक्त करण्यात आले. आज सकाळी मस्कत विमानतळावरुन ५ भारतीय (नाविद बुरोन्दकर, उमप्रकाश शुल्का, संतोष पाटील, ऍलिस्टर फर्नांडिस व इजिदोर फर्नांडिस) मुंबई विमनतळावर पोहोचले. त्यातील ऍलिस्टर व इजिदोर हे दोघे गोमंतकीय नंतर दुपारी १.४५ च्या सुमारास गोव्याच्या दाबोळी विमानतळावर दाखल झाले. दोघेही सुखरुप असून गोव्यात परतल्याचे त्यांचे कुटुंबीय, नातेवाइक व गावबंधूंना समजताच त्यांनी दाबोळी विमानतळावर येऊन मोठ्या आनंदाने त्यांचे स्वागत केले. राय येथील इजिदोर व कुंकळ्ळी येथील ऍलिस्टर यांनी विमानतळावर उतरताच प्रथम आपल्या मातापित्यांची गळाभेट घेतली.
सोमालियात चाच्यांनी आमचे जहाज ताब्यात घेतल्यावर "एक्स. वाय. एल' बंदरावर ठेवल्याचे ऍलिस्टर याने "गोवादूत'च्या प्रतिनीधी शी बोलताना सांगितले. गोव्यात परतल्याने त्या भयंकर आठवणींना तिलांजली देण्याचे मी ठरवले आहे. पुन्हा जहाजावर नोकरीसाठी जायचे की नाही याबाबतचा निर्णय आपण कुटुंबीयांशी चर्चा करूनच घेणार आहोत. तूर्त दीर्घ सुट्टी घेऊन विश्रांती घ्यायचे आपण ठरवल्याचे त्याने सांगितले.
यापूर्वी आपण अन्य ५ जहाजांवर काम केले आहे. मात्र हा आपला सर्वात भयंकर प्रवास असल्याची प्रतिक्रीया इजिदोर याने व्यक्त केली. जेव्हा चाच्यांनी जहाजाचे अपहरण केले तेव्हापासून परिस्थिती क्षणाक्षणाला बदलत होती. जिवंत राहण्यासाठी चाच्यांच्या आज्ञेचे पालन करणे हा एकमेव मार्ग आमच्यापुढे उरला होता. सर्वांनी तो मान्य केला. इजिदोर हा स्टॉल्ट जहाजावर प्रमुख स्वयंपाकी म्हणून काम करत होता. अपहरणप्रसंगी आपल्याला परिवाराशी चार वेळा बोलण्याची संधी मिळाल्याचे तो म्हणाला. चाच्यांनी जहाजाचे अपहरण केल्यानंतर आम्हाला जहाजावर पूर्ण दिवस बंदुकीच्या धाकावर ठेवण्यात आले. पहीले ९ दिवस चाच्यांना आपणच जेवण बनवून द्यायचो. त्यांच्या परवानगीशिवाय इंचभरही हलणे म्हणजे साक्षात मृत्यूच. शांत समुद्रात आमचे जहाज जात असताना स्पीड बोटीद्वारे चाच्यांनी आमच्या जहाजावर कसा कब्जा केला तो प्रसंग आठवला की, आजही अंगावरून सरसरून काटा येतो, असे तो म्हणाला.
गोव्यात आप्तेष्टांचे चेहरे पाहून अत्यानंद झाला. यापुढेही आपण जहाजावरच काम करणार असल्याचा मनोदय त्याने व्यक्त केला.
गोव्याच्या या दोन्ही सुपुत्रांना त्यांच्या कुटुंबीयांनी पुष्पहार घालून त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी इजिदोरची आई जास्निता फर्नांडिस, वडील सेबी तसेच ऍलिस्टरची माता सोफिया व वडील अँथनी यांनी देवाच्या दयेनेच आज आमेचे सुपुत्र गोव्यात सुखरुप परतल्याचे सांगितले. हे कथन करताना त्यांचे डोळे पाणावले होते.
जहाजाचे कप्तान प्रभात गोयल व इतर भारतीय (त्या जहाजावरी कर्मचारी) लवकरच मायभूमीत परतणार असल्याची माहीती ऍलिस्टर याने दिली.
----------------------------------------------------
त्या आठवणीही नकोशा...
ऍलिस्टर म्हणाला, त्या आठवणी आजही अंगावर काटा आणतात. सोमाली चाच्यांना केवळ पैशाशी मतलब होता. माणुसकी कशाशी खातात हे त्यांच्या गावीही नव्हते. त्यांची देहबोलीच हे सांगत होती. आमच्या जहाज कंपनीने व भारत सरकारने आमच्यासाठी खूप कष्ट घेतल्याने आज आम्ही सुखरुप आमच्या "मायगावी' पोहोचल्याचे सांगताना ऍलिस्टर याला हुंदका आवरला नाही.

No comments: