Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 27 November, 2008

पाळीत ८१ टक्के मतदान

पणजी, डिचोली,दि.२६(प्रतिनिधी): पाळी मतदारसंघ पोटनिवडणूकीत आज मतदारांनी दाखवलेल्या उत्फुर्त प्रतिसादामुळे विक्रमी ८०.५० टक्के मतदानाची नोंद झाल्याने मतदारांनी आपला कल नक्की कुणाच्या पदरात टाकला आहे, याबाबत जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली आहे. कॉंग्रेस, भाजप तथा अपक्ष उमेदवार डॉ.आमोणकर यांनी आपला विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे खरा परंतु येथील मतदारांनी नक्की कुणाला पसंती दिली आहे, याबाबत कमालीची गुप्तता राखली असून मतदारांच्या या मौनाबाबत या पोटनिवडणूकीच्या निकालाची उत्सुकता वाढली आहे.
पाळी मतदारसंघ पोटनिवडणूक मतदानाला आज सकाळी ८.३० वाजता सुरूवात झाली. अत्यंत शांत व कोणत्याही अनुचित प्रकाराविना मतदान पार पडले. सकाळपासूनच मतदारांनी विविध मतदान केंद्रांवर गर्दी केल्याने संध्याकाळपर्यंत मतदारांचा हा रेटा सुरूच होता. या मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या २२७३० असून त्यातील बहुतांश १८२१७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आज झालेल्या मतदानात ९५७१ पुरूष तर ८६४६ महिला मतदारांनी भाग घेतला. घाडीवाडा- सुर्ला येथील मतदान केंद्र क्रमांक १८ वर सर्वांत जास्त ८८.६५ टक्के तर साखळी सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मतदान केंद्र क्रमांक १ वर सर्वांत कमी ६९.३६ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी अरविंद बुगडे यांनी दिली.
काही ठिकाणी दोन मतदानकेंद्रांचे एका मतदान केंद्रात रूपांतर करण्यात आल्याने मतदारांची गर्दी झाल्याचे स्पष्टपणे दिसत होते. साखळी प्रोग्रेस हायस्कूल येथील मतदान केंद्रावर सकाळी ११ वाजता बरीच गर्दी झाली दिसत होती.साखळीतील भांडारवाडा व सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय केंद्रांवर मोठ्याप्रमाणात अल्पसंख्यांक मतदारांची गर्दी स्पष्टपणे दिसत होती. काही मतदारांशी संपर्क साधला असता त्यांनी "बाबांचा'उच्चार करून आपला पाठींबा त्यांना असल्याची माहिती दिली. कॉंग्रेसचे उमेदवार प्रताप गांवस हे केवळ निमित्तमात्र असून साखळीतील जनतेची सर्व जबाबदारी घेण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री विश्वजित राणे (बाबा) यांनी घेतल्याचेही यावेळी एका नगरसेवकाने सांगितले. साखळी व हरवळे मिळून एकूण ७ हजार मते आहेत. हरवळे हा भाग भाजप समर्थकांचा असल्याने तिथे काही प्रमाणात कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांना फसवण्याचे प्रयत्न केल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. हरवळेचे पंच यशवंत माडकर यांचे बंधु शिवदास माडकर यांनी या गावातील युवकांना हाताशी धरून एकूण ८२ मतदारांची ओळखपत्रे तपासून देतो,असे म्हणून गोळा केली व तो आज संपूर्ण दिवस गायब झाला,अशी तक्रार घेऊन काही स्थानिक लोक भाजप कार्यलयापाशी आले होते. त्यांनी शिवदास माडकर याच्याशी शेवटपर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न करून अन्यथा पोलिस तक्रार करण्याची तयारीही केली होती.
काही ठिकाणी मतदारयादीत नाव व ओळखपत्र असलेल्या काही मतदारांना मतदान करण्यास मज्जाव करण्यात आल्याने वाद निर्माण झाला. विविध राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना व निवडणूक एजंटांना मतदारयादीची जुनी प्रत दिल्याने नव्या यादीत रद्द करण्यात आलेली नावे या यादीत समाविष्ठ असल्याने काही प्रमाणात घोळ झाला. विविध गावात मतदारयादीच्या सर्वेक्षणावेळी गावातून लग्न करून दिलेल्या मुलींची नावे या यादीतून रद्द करण्यात आली होती. ही नावे व लग्नापूर्वीचे ओळखपत्र घेऊन या महिलांना काही उमेदवारांनी खास भाड्याच्या वाहनांची सोय करून माहेरहून इथे आणले होते परंतु बहुतांश या मतदारांची नावे रद्द करण्यात आल्याने त्यांना हात हलवत परतावे लागले. मतदानाच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणूक अधिकारी तथा निरीक्षकांची वाहने कायम फिरतीवर होती व कुणीही नेता किंवा आमदार किंवा अन्य पदाधिकारी मतदारांच्या संपर्कात येऊ नये, याची काळजी घेत होते. विविध मतदानकेंद्रावर मतदारांना उन्हात उभे राहावे लागणार यासाठी खास पडदे बांधुन सावलीची सोय करण्यात आली होती. दुपारी एक वाजेपर्यंत ३० ते ४० टक्क्यांच्या सरासरीने सुरू असलेल्या मतदानाने संध्याकाळी अचानक गती प्राप्त केली. विविध पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना घरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत होते, हे स्पष्टपणे दिसत होते.
दरम्यान, आज मतदारसंघाचा दौरा करतेवेळी काही मतदारांशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या पाठींब्याबाबत उघडपणे बोलण्याचे टाळले. काहींनी राजकीय भाष्य केले परंतु नक्की कोण विजयी होईल,याबाबत मात्र त्यांनी ठाम भूमिका घेण्याचे टाळले. या संपूर्ण दौऱ्यात संपर्क साधलेल्या मतदारांचा अंदाज पाहता मतदारांचे मोैन हाच खरा कौतुकाचा विषय ठरला आहे. स्व.गुरूदास गावस यांच्या अकाली मृत्यूमुळे हळहळ व सहानुभूती, भाजपचे युवा उमेदवार डॉ.प्रमोद सावंत यांच्या समाज कार्याचे कौतुक तसेच डॉ.आमोणकर यांना भाजपाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने काही प्रमाणात पसरलेली नाराजी अशा सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्याने एवढे करूनही त्यांनी नक्की कुणाला आपले प्रतिनिधी म्हणून निवडले आहे हे आता २९ रोजी निकालाअंती स्पष्ट होणार आहे.

No comments: