Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 27 November, 2008

दत्तू देसाई खून प्रकरणी दोन्ही पोलिसांना जन्मठेप

मडगाव, दि. २६ (प्रतिनिधी): कुंकळ्ळीत पोलिस कोठडीत गाजलेल्या दत्तू देसाई खून प्रकरणी काल दोषी ठरवण्यात आलेले तत्कालीन साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रीपती देसाई व हवालदार मधू देसाई यांना आज येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप गायकवाड यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अन्य दोघे संशयित आरोपी जितेंद्र व नरेंद्र फळदेसाई यांना कालच पुराव्याअभावी दोषमुक्त करण्यात आले होते.
आज सकाळी भरगच्च न्यायालयात न्यायाधीशांनी शिक्षा फर्मावली तेव्हा उभय आरोपी तेथे उपस्थित नव्हते. काल त्यांना न्यायालयाच्या आदेशावरून तुरुंगात हलवले जात असताना छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने त्यांना रात्री हॉस्पिसियू इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
न्यायाधीशांनी आपल्या आदेशांत श्रीपती व दत्तू या आरोपी क्र.१ व क्र. २ यांना भा. दं. सं. च्या कलम २२०, १२०(ब) खाली प्रत्येकी ३ वर्षें स. म., कलम ३४२ व १२० (ब) खाली सहा महिने स. म. व खुनाच्या आरोपाच्या कलम ३०२ व १२०(ब) खाली सश्रम जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रु. दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दंड भरला नाही तर आणखी २ महिने सश्रम कारावास त्यांना भोगावा लागेल.
आरोपींना सर्व शिक्षा एकाच वेळी व सलग भोगावयाच्या असल्याचेही निकालात नमूद केले आहे. आरोपींनी दंड भरला तर शिक्षेविरुद्ध करावयाची मुदत संपून गेल्यावर ती रक्कम मयताच्या आईला द्यावी असेही न्यायाधीशांनी आदेशात म्हटले आहे. मात्र दोन्ही आरोपींची पुरावा नष्ट करण्याबाबत ठेवल्या गेलेल्या (कलम २२०, १२०(ब) कलमांतून न्यायालयाने मुक्तता केली आहे.
आरोपी क्र. ३ व ४ जितेंद्र व नरेंद्र फळ देसाई यांची त्यांच्यावर असलेल्या कलम २२०,१२०(ब),३४२,३०२ व २०१ या कलमांतून पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र श्रीपती व मधू यांना लगेच तुरुंगात पाठवावे, असे आदेशात बजावले आहे.
या खटल्यात एकूण ४६ साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या होत्या व त्यांतील तपासअधिकाऱ्यासह ५ पोलिसांचा समावेश होता. सरकारच्या वतीने हा खटला आशा आर्सेकर यांनी हाताळला.
मडगावात २० वर्षांपूर्वी घडलेल्या गाजलेल्या अब्दुल्लाच्या पोलिस कोठडीतील मृत्युप्रकरणी झालेल्या शिक्षेनंतर तशाच प्रकरणी पोलिसांना शिक्षा झालेले हे दुसरे प्रकरण आहे.

No comments: