Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 23 November, 2008

रवींद्र केळेकर यांना "ज्ञानपीठ'
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) ः ज्येष्ठ गोमंतकीय कोकणी साहित्यिक रवींद्र केळेकर यांना आज राष्ट्रीय पातळीवर साहित्यात सर्वोच्च मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याने गोव्यात आनंदाचे वातावरण पसरले. गेल्या जानेवारीत त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. गोव्याची राजभाषा असलेल्या कोकणीसाठी हा पुरस्कार देण्यात आल्याने हा गोमंतकीयांचा सन्मान असल्याचे श्री. केळेकर यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात केळेकर यांनी गोवा मुक्तीसाठी दिलेले योगदानही महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी हा दर्जेदार आणि वैचारिक अधिष्ठान असलेल्या साहित्याचा सन्मान असल्याचे सांगून केळेकर यांचे अभिनंदन केले आहे.
कोकणी साहित्य व भाषेचा सन्मान ः केळेकर
फोंडा, (प्रतिनिधी) ः आपणाला मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार हा कोकणी भाषा आणि साहित्याचा सन्मान आहे, असे उद्गार ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र केळेकर यांनी "गोवादूत'शी बोलताना आज काढले.
कोकणी भाषेला व्याकरण नाही, लिपी नाही. दुसऱ्या भाषेची बोली म्हणून हिणवले जात होते. या ज्ञानपीठ पुरस्काराने कोकणी भाषेची जागा कुठे आहे हे दाखवून दिले आहे, असे श्री. केळेकर यांनी सांगितले.
श्री. केळेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार झाल्याची माहिती जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना खूप आनंद झाला. यापूर्वी भारत सरकारने याचवर्षी जानेवारीत पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे. तसेच त्यांना फेलो २००८ प्राप्त झालेली आहे.
ज्येष्ठ साहित्यिक श्री. केळेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने हितचिंतक, चाहते यांनी साहित्यिक श्री. केळेकर यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. गोव्यातील साहित्यिक आणि हितचिंतकांनी त्यांच्या प्रियोळ येथील घरी जाऊन साहित्यिक श्री. केळेकर यांचे अभिनंदन केले. आर्किटेक्ट गिरीष केळेकर यांनी आपले वडील ज्येष्ठ साहित्यिक श्री. केळेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
दर्जेदार साहित्यावर मोहर ः पर्रीकर
ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र केळेकर यांना साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या दर्जेदार व वैचारिक प्रतिष्ठान असलेल्या साहित्यावर राष्ट्रीय स्तरावर मोहर उठली आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली. केळेकर हे शारदेच्या दरबारातील उपासक आहेत, त्यांचे लेखन कसदार व विवेकपूर्ण आहे. साहित्यिक क्षेत्रातही गोमंतकीय मागे नाहीत, हेच आजच्या पुरस्काराने सिद्ध झाले आहे, असे पर्रीकर यांनी केळेकर यांचे अभिनंदन करताना सांगितले. केळेकर यांच्या महान कार्याची ही पोचपावती असल्याचे भाजप प्रवक्ते दामोदर नाईक यांनी म्हटले आहे.
कोकणीचा तिसऱ्यांदा सन्मान ः पुंडलिक नायक
रवींद्र केळेकर यांचा "ज्ञानपीठ' ने झालेला गौरव हा कोकणी भाषेच्या आजवरच्या संघर्षाचा आणि सर्जनाचा विजय आहे, कोकणीला साहित्य अकादमीकडून मिळालेली मान्यता, कोकणीचा घटनेच्या आठव्या परिशिष्टात झालेला समावेश आणि आता केळेकर यांना मिळालेला हा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे कोकणीचा तिसऱ्यांदा झालेला सन्मान आहे, अशा शब्दांत गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष पुंडलिक नायक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
कोकणीत अनेक प्रतिभावंत लेखक आहेत, तरीही ज्येष्ठता आणि त्यांची साहित्यातील श्रेष्ठता यामुळे केळेकर यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. नायक यांनी आनंद व्यक्त केला. "इफ्फी'च्या उद्घाटनादिनी हा पुरस्कार मिळाल्याने आपला आनंद द्विगुणित झाल्याचे त्यांनी सांगितले. केळेकर यांचा अनुयायी म्हणून जसा आपल्याला या वृत्ताने आनंद झाला, त्याचप्रमाणे कोकणी अकादमीचा अध्यक्ष म्हणूनही आपण त्यांचे विशेष अभिनंदन करीत असल्याचे नायक म्हणाले. केळेकर हे अकादमीच्या पहिल्या कार्यकारिणीचे सदस्य होते, हेही त्यांनी साभिमान नमूद केले. केळेकर यांच्या "महाभारत'ग्रंथाचे प्रकाशन तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते करण्याचा मान अकादमीला मिळाला होता, असे ते म्हणाले.
आपल्या प्रागतिक विचारांनी गोव्याची नवी पिढी घडविण्याचे सातत्यपूर्ण कार्य हे केळेकरांचे मोठे योगदान असून, त्यांना मिळालेला पुरस्कार हा सर्व गोमंतकीयांचा सन्मान असल्याचे पैंगीण कोकणी अस्मिताय मंचचे निमंत्रक अनंत अग्नी यांनी पत्रकात म्हटले आहे.

No comments: