Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 26 November, 2008

दत्तू देसाई खून : दोघे पोलिस दोषी मडगाव अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निवाडा

मडगाव, दि. २५ (प्रतिनिधी): कुंकळ्ळी पोलिस स्थानकात २००१ मधील गाजलेल्या
दत्तू देसाई खूनप्रकरणी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप गायकवाड यांनी आज कुंकळ्ळी पोलिस स्थानकातील तत्कालीन साहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीपती देसाई व हवालदार मधू देसाई यांना दोषी ठरवले. अन्य दोघे संशयित आरोपी जितेंद्र फळदेसाई व नरेंद्र फळदेसाई यांना पुराव्याअभावी दोषमुक्त करण्यात आले.
न्यायाधीशांनी आज शिक्षा जाहीर केली नाही. बचावपक्षाचे वकील हजर नसल्याने न्यायालयाचे कामकाज उद्या सकाळपर्यंत तहकूब करण्यात आले. उद्या सकाळी शिक्षेच्या प्रमाणाबाबत युक्तिवाद होईल. भरगच्च न्यायालयात निकालपत्र वाचताना न्या. गायकवाड यांनी भा. दं. सं.च्या कलम २२०, ३४२ (कोठडीत बेकायदा डांबून मारहाण करणे), ३०२ (खून करणे) व १२०(ब)(कटकारस्थान रचणे ) या कलमांखाली आरोपींना न्यायालय दोषी ठरवत असल्याचे सांगितले. त्यांच्या शिक्षेची घोषणा होईपर्यंत त्यांना तुरुंगात ठेवण्यास फर्मावण्यात आले. या खटल्याचा निकाल काल जाहीर होईल, असे न्यायालयाच्या सूचना फलकावर लिहिले होते. मात्र तो सोमवारी सायंकाळपर्यंत पूर्ण होऊ शकला नव्हता.
आरोपपत्रानुसार किटला फातर्पा येथील कु. प्रशीला राऊत देसाई हिने कुंकळ्ळी पोलिसात दत्तू देसाई याच्याविरुध्द तो आपल्या आईला मारहाण करीत असून पोलिसांनी तेथे त्वरीत यावे अशी तक्रार केली होती. वरिष्ठांच्या आदेशावरून पोलिस शिपाई निळू शेट व श्याम देसाई यांनी दत्तूला २७ जून २००१ रोजी सकाळी पोलिस स्टेशनवर आणले व त्याच्या विरुध्द गुन्हा नोंदविला. तथापि, शोभावती देसाई यांच्याविरुध्द आपली तक्रार नोंदवून घेतली जात नाही यास्तव त्याने तेथील पोलिसांशी वाद घातला. तसेच तेथे असलेल्या एका महिला पोलिसाला शिवीगाळ केली.
त्यामुळे भडकलेले सदर महिला पोलिसाचे पती हवालदार मधू देसाई व साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रीपती देसाई यांनी जितेंद्र फळदेसाई व नरेंद्र फळदेसाई यांच्या मदतीने त्याला जबर मारहाण केली. नंतर त्याला महिला कैद्यांच्या कोठडीत डांबले व आणखी मारहाण केली. त्याची एकूण अवस्था पाहता तो मेला असे वाटल्याने आपल्या दुष्कृत्यावर पांघरूण घालण्यासाठी त्यांनी त्याला पोलिस स्टेशनमागे असलेल्या झाडाला लटकावले व त्याने आत्महत्या केल्याचा आभास निर्माण केला. २९ रोजी त्याचा मृतदेह सापडला असे आरोपपत्रात म्हटले हेाते. शवचिकित्सा अहवालात कमरेखालील भागात झालेल्या जबर मारहाणीमुळे त्याला मृत्यू आल्याचे आरोपपत्रात म्हटले होते.
मडगावात २० वर्षांपूर्वी घडलेल्या गाजलेल्या अब्दुल्लाच्या पोलिस कोठडीतील मृत्युप्रकरणी झालेल्या शिक्षेनंतर तशाच प्रकरणी पोलिसांना शिक्षा झालेले अशा स्वरूपाचे हे दुसरे प्रकरण आहे.

No comments: