Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 25 November, 2008

स्पर्धात्मक विपणनतंत्रामुळे दर्जेदार चित्रपटांवर अन्याय


पत्रकार परिषदेत बोलताना अभिनेता आशुषोत राणा, अभिनेत्री गुल पनाग, दिग्दर्शक सोहेल ततारी. (छाया: प्रसाद सोनू)

अभिनेता आशुतोष राणा यांचे सडेतोड मत
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): व्यावसायिक व कलात्मक चित्रपटांची तुलनात्मकता योग्य निकषांवर आधारली जात नाही. चित्रपटांचे विपणन करताना कुणीतरी आपल्या कुवतीनुसार चित्रपटांचा दर्जा ठरवून वैयक्तिक फायद्यासाठी वातावरण निर्मिती करतो व त्या पोकळ व निराधार वातावरणावर आधारीत प्रसिद्धी माध्यमांकडून त्यांना प्रसिद्धी मिळते. त्यामुळे दर्जेदार चित्रपटांवर अन्याय होतो, असे सडेतोड मत अभिनेता आशुतोष राणा यांनी व्यक्त केले.
"समर -२००७' या चित्रपटाचे प्रदर्शन आज भारतीय पॅनोरमा विभागात झाले. यानिमित्ताने पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अभिनेत्री गुल पनाग, युवा अभिनेता आलेख सिकंदर, चित्रपटाचे दिग्दर्शक सोहेल ततारी, पटकथाकार ब्रिजेश जयराजन, निर्माते अतुल पांडे आदी हजर होते. चित्रपट क्षेत्रात आपले काही वैयक्तिक नियम किंवा आदर्श बाळगणाऱ्या कलाकारांना आपली मर्जी राखणे बरेच कठीण होते, हे सहन करण्याची तयारी हवी, असेही राणा म्हणाले. एक अभिनेता या नात्याने आपण आपल्या भूमिकेबाबत कोणतीही पूर्वकल्पना आखत नाही. एक साधा कलाकार या नात्याने दिग्दर्शकापुढे उभे राहून त्यांनी आपल्या इच्छेनुसार व चित्रपटाच्या कथानकानुसार ठरवलेले पात्र साकार करण्याचे पूर्ण स्वतंत्र त्यांना देतो,अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. विविध जबरदस्त चित्रपटांत काम करूनही अद्याप प्रकाशझोतापासून कसे काय मागे राहिलात, असे विचारताच 'आपण स्वतःला विकण्याचे तंत्र अद्याप अवगत केले नाही" असा टोला त्यांनी हाणला. आपल्या वेगळ्या भूमिकेबाबत किंवा वेगळ्या चित्रपटांबाबत रसिक आपली आठवण करतात हेच समाधान असल्याचेही ते म्हणाले. आपले भारतीय प्रेक्षक हे पूर्वीपासूनच कलेचे उपासक आहेत. "मदर इंडिया',"मुगल ए आझम' आदी चित्रपट कलात्मकच होते तसेच प्रेक्षकांनी हे चित्रपट उचलून धरल्याने व्यावसायिक पातळीवरही ते यशस्वी ठरले, असेही राणा यांनी यावेळी सांगितले.
चित्रपट सृष्टीत केवळ काही काळ आपला दबदबा तयार करून नंतर नामानिराळे होण्याचा आपला अजिबात मनसुबा नसून या क्षेत्रात दीर्घकाळ आपल्याला काम करायचे आहे, असे मत अभिनेत्री गुल पनाग हिने व्यक्त केली. "ग्लॅमर'च्या मागे धावून अल्प काळात प्रकाशझोतात येण्याची कोणतीही घाई आपल्याला नसून आपले अंतर्मन ज्या भूमिकेला व चित्रपटाला संमती देते तेच आपण स्वीकारीत असल्याचेही तिने मान्य केले. एखादी जरी निवड चुकीची ठरली तरी ती भूमिका कायम राहत असल्याने संपूर्ण कारकिर्दीत ती अपयशाची आठवण करीत राहते, असेही ती म्हणाली. खास करून युवकांच्या भोवती या चित्रपटाचे कथानक फिरते. उच्च शिक्षणासाठी कॉलेजात शिक्षण घेणाऱ्या युवकांच्या घरची आर्थिक परिस्थिती बिघडल्याने त्याचा त्यांच्यावर कसा काय परिणाम होतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. चांगल्या कलाकृती व चांगल्या अभिनयाचा पुरस्कार प्रसारमाध्यमांनी केल्यास त्यांच्यावर अन्याय होणार नाही, असे आवाहन निर्माते अतुल पांडे यांनी केले.

No comments: