Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 20 October, 2008

वाचन जगण्याची कला शिकवते - आशा काळे

महिला साहित्य संमेलनात मान्यवरांचा सत्कार
तिस्क उसगाव, दि.१९ (प्रतिनिधी)- " वाचन कसे जगावे हे शिकविते. साहित्याने मला जीवनात पुष्कळ बळ दिले. स्त्री हे जगदंबेचे रूप असून तिच्यात फार मोठी शक्ती आहे. स्त्रियांनी वाचन वाढविले पाहिजे. स्त्रियांची साहित्य निर्मिती झाली पाहिजे. नाटक ही जिवंत कला आहे.'असे प्रतिपादन अभिनेत्री श्रीमती आशा काळे (नाईक) मुंबई यांनी श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेतर्फे व कला आणि संस्कृती खाते,गोवा यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ६ व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनात फोंडा येथील गोवा विद्या प्रसारक मंडळाच्या सभागृहात उद्घाटक म्हणून आज सकाळी बोलताना केले.
" मी गोव्याची सून आहे याचा मला अभिमान आहे. नाटक हे फक्त नटांचे नसते त्यात प्रेक्षकांचा सहभाग असतो. त्याचप्रमाणे साहित्य हे वाचकाचे असते. विविध साहित्यिकांच्या नाटकात मला काम करायला मिळाले.'असे त्या पुढे म्हणाल्या.
यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष प्रा. लीना सोहनी (कोल्हापूर), विशेष अतिथी म्हणून नीलिमा बोरवणकर (पुणे), गिरिजा मुरगोडी (गोवा),स्वागताध्यक्षा नीला धेंपे, आयोजन समितीच्या अध्यक्ष माधवी देसाई, श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष सौ. लक्ष्मी जोग उपस्थित होत्या.
लीना सोहनी, आशा काळे (नाईक), नीलिमा बोरवणकर, गिरिजा मुरगोडी, नीला धेंपे,माधवी देसाई यांचा यावेळी गौरव सत्कार करण्यात आला.
यावेळी सौ.शैलजा दाबके यांच्या चैत्र पालवी (ललित लेख), कु.निर्मला शिरोडकर यांच्या शब्द वेल (कविता संग्रह), सौ. गुलाब वेर्णेकर यांच्या काय भूललासी (ललित लेख), सौ. लक्ष्मी जोग यांच्या बकुळ फुले (ललित लेख),डॉ. सौ. पूर्णिमा ना. शे. उसगावकर यांच्या किशोरवयातील पोषण (आरोग्य विषयक माहिती देणारे पुस्तक) या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
प्रमोद साळगावकर, ज्योती कुंकळ्येकर (पहिल्या मराठी चित्रपट निर्मात्या), धनश्री जांबावलीकर (कोकणी ब्रेललीपीची निर्मिती) यांचा गौरव करण्यात आला.
"अनुवाद करणे ही कला व विज्ञान ही आहे. साहित्यात विविध प्रकार आहेत.साहित्यातील प्रत्येक प्रकाराची वेगळी प्रतिभा आहे.प्रत्येक माणसाच्या अंगात कला निर्मितीची ऊर्मी असते.त्या ऊर्मीतून पुढे कलाकार घडतो.मी अनुवाद करताना मला निखळ आनंद मिळतो.ज्यात उच्च प्रतीचा आनंद मिळतो ती गोष्ट आपण करावी. साहित्यिकाला वेगळी भाषा असते. अनुवादकाला भाषा नसते.'असे यावेळी बोलताना संमेलनाध्यक्षा प्रा. लीना सोहनी म्हणाल्या.
गिरिजा मुरगोडी, नीलिमा बोरवणकर यांची यावेळी भाषणे झाली.
"आम्ही पुरुषांचा आदर करतो. पुरूषाशिवाय स्त्री अधुरी आहे. साहित्य हा आमचा परमेश्वर आहे.आज जे समाजात चालले आहे त्यामुळे आपली शाश्वती आपण देऊ शकत नाही. दूरदर्शनमुळे वाचन संस्कृती नष्ट होऊ लागली आहे. दूरदर्शन संस्कृतीला कोपरा दाखवा व घराघरांत वाचन संस्कृती रुजवा. हा संदेश आमचे हे संमेलन देते.' असे यावेळी प्रास्ताविक व आपले मनोगत व्यक्त करताना आयोजन समितीच्या अध्यक्षा माधवी देसाई म्हणाल्या.
" स्त्री अवघ्या जगाची जननी आहे.जेथे स्त्रियांची पूजा होते, तिथे देवता नांदते असे आपली संस्कृती सांगते.संस्कार देण्यासाठी ज्ञान साहित्य देते.त्यासाठी स्त्रियांनी चांगले साहित्य वाचले पाहिजे.वाचन साहित्याच्या सहवासात रममाण होण्याची प्रेरणा आपल्याला देईल. स्त्रियांनी रचलेले साहित्य काळाच्या ओघाबरोबर अजरामर झाले आहे.' असे नीला धेंपे आपल्या स्वागतपर भाषणात बोलताना म्हणाल्या.
२००७ -०८ या काळात श्री शारदा बाल वाचनालयात सर्वांत जास्त पुस्तके वाचणाऱ्या अनिश अजय धोपेश्वरकर, श्रीराज कृष्णा नाईक, सिद्धी मनोज सामंत यांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी गंगाधर गाडगीळ, दामू केंकरे, मनोहर हिरबा सरदेसाई यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
आशा शेट व साथींनी ईशस्तवन सादर केले. सूत्रसंचालन संगीता अभ्यंकर यांनी केले.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys