Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 19 October, 2008

पालिकेच्या चुकीच्या धोरणामुळे गरीब विक्रेत्या महिलांची फरफट

पणजी, दि. १८ (विशेष प्रतिनिधी): येथील नव्या मार्केटमध्ये जागा देताना पालिकेने मोठ्या प्रमाणात पक्षपात केला गेला असून गेल्या कित्येक वर्षांपासून जुन्या मार्केटात स्थानिक भाज्या, फळे, तसेच अन्य लहान मोठ्या वस्तू विकणाऱ्या स्थानिक गोमंतकीयांच्या तोंडाला पाने पुसून बिगर गोमंतकीयांचे चोचले पुरवले असल्याचा आरोप किमान दीडशे ते दोनशे सोपोधारक गरीब महिला विक्रेत्यांनी केला आहे. यातील किमान शंभर महिलांनी आज (शनिवारी) सायंकाळी पणजीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपली कैफियत मांडली व चुकीच्या पध्दतीने नव्या मार्केटात घुसडण्यात आल्याने आपले व्यापारउदीम पुरते थंडावून अक्षरशः उपासमार सुरू असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
पणजी, ताळगाव, कुरका, मेरशी, सांताक्रुझ परिसरातील या गरीब महिला गेल्या अनेक वर्षांपासून पणजी मार्केटात स्थानिक भाज्या, फळे, नारळ तसेच दैनंदिन गृहोपयोगी वस्तु विकून गुजराण करतात. यातील बऱ्याच महिलांची हा व्यवसाय करता करता वयाची साठी उलटली आहे. जेव्हा दिवसाला वीस पैसे सोपा होता तेव्हापासून आम्ही येथे आहोत, परंतु नव्या मार्केटमध्ये जागा देताना आमच्यावर अक्षरशः अन्याय करण्यात आल्याचे त्या सांगतात. पूर्वी जुन्या मार्केटमध्ये उघड्यावर बसणाऱ्या या विक्रेत्यांना पर्रीकरांनीच मुख्यमंत्री असताना नवी शेड घालून दिली होती व दुसरीकडे संपूर्ण नव्या मार्केट प्रकल्पाचीच नव्याने बांधणी सुरू केली होती. या नव्या मार्केटमध्ये शेवटच्या टप्प्यात बहुतांश या छोट्या भाजी व फळे विक्रेत्या महिलांची सोय करण्यात येणार होती, मात्र पालिकेच्या काही नगरसेवकांनी बिगर गोमंतकीय विक्रेत्यांकडून पैसे खाऊन या स्थानिक गरीब महिलांची अक्षरशः फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे. नवीन जागेत वाट्टेल त्या ठिकाणी एका माणसालाही बसता येणार नाही आणि हलताही येणार नाही अशा ठिकाणी त्यांची सोय करण्यात आली असून या जागा इतक्या उंचीवर आहेत की तेथे चढायचे कोठून येथपासून प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण वर चढण्यासाठी धड पायऱ्याही नाहीत आणि सामान ठेवण्यासाठी योग्य जागाही नाही अशा कात्रीत त्या सापडल्या आहेत. परिणामी सध्या गिऱ्हाईकही त्यांच्याकडे फिरकेनासे झाले आहे आणि त्यांची अक्षरशः उपासमार सुरू असल्याचे त्यांनी पर्रीकरांना सांगितले.
आपल्या या अवस्थेबद्दल सदर महिलांनी पणजी महानगरपालिका, महापौर टोनी रॉड्रिगीस व दोघा नगरसेवकांवर ठपका ठेवला असून या परिस्थितीला ही मंडळी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. मार्केटात भाजी, फळे आणि अन्य वस्तू विकूनच आमची गुजराण होत असल्याने सध्या होणाऱ्या उपासमारीतून वाचविण्याचे आवाहन त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना केले आहे. आमच्या मागण्या अवास्तव नाहीत. एका माणसाला व्यवस्थित बसण्याइतकी जागा द्या आणि पूर्वी भाजी व फळे विकणाऱ्यांची एका रांगेत सोय करा, एवढेच आमचे मागणे आहे. पर्रीकर मुख्यमंत्रिपदी होते तोपर्यंत सगळे काही सुरळीत होते; परंतु आता आमचे ऐकणारे कोणीच राहिलेले नाही. पैशांपुढे सगळे विकत गेले असून मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना देव कधीही माफ करणार नसल्याचे त्यांनी नंतर पत्रकारांशी बोलतानाही सांगितले.
दरम्यान, सायंकाळी पर्रीकर यांनी या महिलांची कैफियत ऐकून घेतल्यानंतर स्वतः मार्केटमध्ये जाऊन त्यांची परिस्थिती समजून घेतली व या प्रकरणी पुन्हा आवाज उठवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या गरीब महिलांना न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा पर्रीकर यांनी दिला आहे.
पणजी आमदार तथा राज्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी सकाळी १०.३० वाजता पर्वरी येथील सचिवालय संकुलात या विषयावरून बैठक बोलावली असून महापौर टोनी रॉड्रीगीज यांना बैठकीसाठी पाचरण केले आहे.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys