Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 21 October, 2008

यशस्वी 'बंद' ही सरकारला सणसणीत चपराक : पर्रीकर

पणजी,दि.२०(प्रतिनिधी): संपूर्ण गोव्यात आजच्या बंदला सर्व थरातील जनतेने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाचा जाहीर निषेधच जनतेने केल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली.अत्यंत शांततापूर्ण व काही किरकोळ प्रकार वगळता लोक स्वेच्छेने या बंदमध्ये सहभागी झाले. परिणामी जमावबंदीचे १४४ कलम जारी करून हा बंद मोडून काढण्यास पुढे सरसावलेल्या सरकारचे थोबाडच फुटले आहे,असेही पर्रीकर म्हणाले.
पणजी येथे भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी भाजप सरचिटणीस सुभाष साळकर उपस्थित होते.राज्यात बळाचा वापर करून बंदमध्ये सहभागी होण्यास लोकांना भाग पाडण्याचा प्रकार अजिबात घडला नाही हे या बंदचे वेगळे वैशिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. म्हापसा येथील एका हॉटेलाबाबत घडलेल्या प्रकार हा सदर हॉटेल मालकाने काही गुडांना लोकांवर हल्ला करण्यासाठी ठेवल्याच्या गैरसमजुतीतून घडल्याचेही ते म्हणाले. यावेळी मुळात हा वाद मिटला असताना त्याबाबतची काहीही माहिती नसलेल्यांवर पोलिसांनी अचानक मागून लाठीहल्ला सुरू केल्याने गोंधळ निर्माण झाल्याचे पर्रीकर म्हणाले.
कुंकळ्ळी येथे घुमटी तोडफोड केल्याप्रकरणी कर्नाटकातील एका वेडसर व्यक्तीला अटक करून वेडाच्या भरात तिनेहे कृत्य केल्याची कबुली पोलिसांकडून घेतली जात असताना गुडी पारोडा येथे अत्यंत हिंस्त्र पद्धतीने मुर्तींची तोडफोड होणे म्हणजे थेट गुन्हेगारांकडून पोलिसांना आव्हान देण्याचाच प्रकार असल्याचेही त्यांनी सांगितले.१४४ कलम लागू केले तरी लोक सहजपणे घोळक्यानेफिरत होते. त्यात भर म्हणजे पोलिसांनी आदल्या दिवशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही लोकांना नोटीसा पाठवून "बंद'ला पाठींबा दिल्यास गुन्हा दाखल करण्याच्या नोटीसा पाठवल्याचा प्रकारही त्यांनी उघडकीस आणला.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुभाष साळकर यांच्या नावानेही नोटीस पोहोचल्याने या नोटीसा कोणाला पाठवल्या आहेत, त्याची पडताळणीही कोणी केली नसल्याची माहिती त्यांनी दिली. या लोकांत काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या नावांचा समावेश असून काही लोक गोव्यातही नाहीत,असेही ते म्हणाले.
गुन्हेगारांनाच सरकारचे अभय
विद्यमान सरकारने मूर्ती तोडफोड प्रकरणी गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष पथकाचा कितपत फायदा होईल याबाबत पर्रीकर यांनी शंका व्यक्त केली. खुद्द सरकारकडूनच जर गुन्हेगारांना अभय मिळत असेल तर हे पथक कसली डोंबलाची चौकशी करणार, असा प्रश्न त्यांनी केला. गोव्यात बाहेरून आलेल्या लोकांची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. तलवारसाठा प्रकरणात सहभागी असलेल्या व मोतीडोंगरावर वास्तव्य करणाऱ्या लोकांना मुख्यमंत्र्यांकडूनच सरंक्षण मिळते तेव्हा पोलिस तरी काय करणार,असे पर्रीकर म्हणाले.
आपण मुख्यमंत्री असताना अशा लोकांची चौकशी सुरू केली होती व त्याचमुळी तत्कालीन सरकारात मंत्री असलेले दिगंबर कामत अस्वस्थ झाले होते. तेथेच त्यांची खऱ्या अर्थाने कोंडी झाली होती, असा टोला पर्रीकर यांनी हाणला. सिमी व इंडियम मुजाहीद्दीनशी संबंधीत लोक भटकळ येथे कार्यरत आहेत. त्यामुळे गोव्यात भटकळ येथील लोक सध्या कुठे राहतात त्याचा शोध घेऊन त्यांची माहिती व पूर्वीचा इतिहास याचाही अभ्यास केला जावा,असेही पर्रीकर म्हणाले. हे सर्व प्रकार मडगावच्या आसपासच्या भागातच होतात याचाच अर्थ अशा लोकांना कोणाचेतरी सरंक्षण मिळते,असा आरोपही पर्रीकर यांनी केला.
सलोखा हीच दहशतवाद्यांसाठी अडचण
गोव्यात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात व त्यामुळे या लोकांत कलह निर्माण करण्याचे कितीही जरी प्रयत्न झाले तरी त्यात दहशतवादी संघटनांना यश मिळत नाही. दरम्यान,राज्यात मूर्तिभंजनाचे सुमारे वीसाहून जास्त प्रकार घडले असतानाही येथे हिंदूंकडून कोणतेही हिंसक प्रकार घडले नाहीत. याचा अर्थ हे प्रकार असेच सुरू राहिल्यास हिंदू गप्प राहतील,अशी सरकारची इच्छा आहे काय,असा सवाल करून झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठीच हा "बंद' पुकारण्यात आल्याचे पर्रीकरांनी स्पष्ट केले. गोव्यात जोपर्यंत धार्मिक सलोखा शाबूत आहे तोपर्यंत येथे दहशतवादी संघटना कार्यरत होऊ शकत नाहीत. तथापि, लोकांत दुही माजवण्याचा प्रयत्नच अशा घटकांकडून सुरू असल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला.
------------------------------------------------------------
पर्रीकरांकडून लोकांचे आभार
आजचा (सोमवारचा) 'बंद' यशस्वी केल्याबद्दल विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी भाजपतर्फे जनतेचे अभिनंदन केले असून याकामी सहकार्य केल्याबद्दल लोकांचे आभारही मानले आहेत. या "बंद'ला सर्व गोमंतकीयांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठिंबा म्हणजे विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारच्या कारभाराबाबत जनतेत पसरलेल्या असंतोषाचाच हा परिपाक असल्याचे प्रतिपादन पर्रीकर यांनी केले.

No comments: