Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 21 October, 2008

राज्यात अभूतपूर्व 'बंद'

'न भूतो न भविष्यती' असा प्रतिसाद; सरकारचे अपयश उघड
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): राज्य सरकारच्या दबावाला बळी भीक न घालता आणि १४४ कलम ठोकरून लावत मंदिर सुरक्षा समितीने पुकारलेल्या "गोवा बंद'ला सर्व घटकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. म्हापसा, सांगे, काणकोण याठिकाणी किरकोळ तणाव सोडल्यास बंद कसा शांततेने व शिस्तीने पार पाडता येतो हेच गोवेकरांकडून आज दाखवून दिले. तणाव निर्माण झाल्याने म्हापसा येथे १२, डिचोलीत २ तर काणकोण येथे एकाला अटक करण्यात आली. तसेच म्हापसा पोलिस स्थानकासमोर धरणे धरलेल्या जमावावर सौम्य लाठीमार करण्यात आला. सांगे येथे मोठ्या प्रमाणात झाडे रस्त्यावर टाकून रस्ता अडवण्यात आला. तसेच म्हापसा येथे तीन, मडगाव येथे दोन बसेसवर दगडफेक करण्यात आली तर, कोलवा येथे एका टॅक्सीवर दगडफेक झाली. काणकोण येथे रस्त्यावर तीन टॅंकरच्या टायरमधील हवा काढण्यात आल्याने कारवार - मडगाव या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
सकाळी बसेस बंद असल्याने अनेकांनी आपल्या खाजगी वाहनांनी पणजी गाठली. मात्र पणजीतील सरकारी कार्यालये सोडल्यास सर्व आस्थापने बंद होती. त्यामुळे दुपारनंतर साऱ्या शहरात सन्नाटा पसरला होता. कदंब बसस्थानकावर तुरळक प्रवासी पाहायला मिळत होते. राजधानीतील केवळ दोन हॉटेल्स सोडल्यास बाकी सर्व दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दर्शविला. यावेळी राज्य सरकारने मंदिर सुरक्षा समितीने पुकारलेला गोवा बंदची हाक मोडून काढण्यासाठी जय्यत तयारी ठेवली होती. तथापि, सरकारच्या या प्रयत्नांना सपशेल अपयश आल्याचे सर्वत्र चित्र पाहायला मिळाले. मालकवर्ग आपल्या दुकानांकडे फिरकलाच नाही. त्यामुळे पोलिस संरक्षणातही सरकारला दुकाने उघडता आली नाहीत. पणजीत हॉटेल "नवतारा' व "कासा मुट्टो' ही दोन्ही हॉटेल पोलिस संरक्षणात खुली ठेवण्यात आली होती. त्यामुळे सायंकाळी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी हॉटेलमधे घुसून मालकाला कडक इशारा दिल्याने काही प्रमाणात तणाव निर्माण झाला.
त्याचप्रमाणे म्हापसा, फोंडा व वास्को या मार्गावर एकही खाजगी बस धावली नाही. अधूनमधून वातावरणाचा कानोसा घेतला असता तुरळक प्रमाणात कदंब बसेस रस्त्यावर धावत होत्या. मात्र सकाळी १०.३०च्या दरम्यान म्हापसा, त्यानंतर काणकोण याठिकाणी कदंब बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे नंतर कदंब वाहतुकही जवळपास बंद पडली. म्हापशात नवतारा हॉटेलच्या मालकाने बंदला आव्हान देत ते खुले ठेवल्याने म्हापसा तेथे तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिस व जमाव आमने सामने आल्याने जोरदार शाब्दिक चकमकी उडाल्या. त्यामुळे काही आंदोलकांना अटक झाल्याने संतप्त जमावाने पोलिस स्थानकासमोर धरणे धरले. तेथे पुन्हा तणाव निर्माण झाल्याने जमावावर सौम्य लाठीहल्ला करण्यात आला.
दरम्यान, ठिकठिकाणी आज सकाळी सहा वाजता मंदिरात एकत्र येऊन हिंदूंनी घंटानाद केला. तर, सायंकाळी सहा वाजता पुन्हा पणजीतील बसस्थानकावर मारुती मंदिरात महाआरती करून बंदची समाप्ती करण्यात आली.
शहरातील पेट्रोल पंप बंद असल्याने सायंकाळी सर्व पेट्रोल पंपवर प्रचंड मोठी रांग लागली होती. मळा येथील पेट्रोल पंप मात्र दिवसभर पोलिस संरक्षणात सुरू होता.
-----------------------------------------------------------------
या बंदची झळ आज पुरवणी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनीही बसली. अनेक परीक्षा केंद्रावर विद्यार्थी वेळेवर पोचले नसल्याने तसेच सर्वच बसेस बंद ठेवल्याने शेवटी गोवा शालांन्त मंडळाने दहावी व बारावीची आजची पुरवणी परीक्षा पुढे ढकलली. तसेच साळगावकर कायदा महाविद्यालयानेही आजची परीक्षा पुढे ढकलली आहे.
मारुती मंदिरात महाआरती
सायंकाळी पणजी कदंब बसस्थानकावर असलेल्या मारुती मंदिरात महाआरतीनंतर मंदिर सुरक्षा समितीचे समन्वयक राजेंद्र वेलिंगकर म्हणाले, बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याने हा गोव्यातील हिंदू समाजाचा तसेच गोव्यातील राष्ट्रवादी ख्रिस्ती व मुस्लिमांचा विजय म्हटला पाहिजे. धार्मिक सलोखा टिकवायचे कार्य मंदिर सुरक्षा समितीने शिस्तबद्धरीत्या केले आहे. आजचा "बंद' हा केवळ एक झलक असून यापुढे खरा संग्राम आहे. येत्या मार्च ०९ पर्यंत साडेतीन हजार कार्यकर्ते संपूर्ण गोव्यात योग, संस्कार तसेच सुरक्षा या विषयाचा प्रचार करणार असून मंदिरे ही शक्तिपीठे बनवण्याचा निर्धार समितीने केला आहे.
आजच्या बंदमुळे जेवढे नुकसान झाले आहे, त्याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असल्याचेही ते म्हणाले. काहींनी आज बंदला आव्हान देऊन आपली आस्थापने उघडी ठेवली. त्यांनी गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याची टीका श्री. वेलिंगकर यांनी केली.
राज्यात अजूनही मंदिरांची विटंबना सुरूच असून "बंद'च्या आदल्याच दिवशी कुळे येथे एका मंदिरातील मूर्तींची मोडतोड करण्यात आली. या प्रकरणांचा शोध लावण्यास सरकार निष्क्रिय ठरल्याची टीका त्यांनी केली.

No comments: