Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 24 October, 2008

जर्मन मुलीवरील अत्याचार प्रकरण चर्चिल यांचा पुतण्याही गुंतल्याचा आरोप

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): 'त्या' जर्मन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याच्या प्रकरणात शिक्षणमंत्र्यांचा पुत्र रोहित मोन्सेरात याच्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांचा पुतण्या वॉरन आलेमाव हाही गुंतल्याचा आरोप आज ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी केला. याविषयीचे ठोस पुरावे आपल्या हाती लागले असून ते पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. तसेच पोलिसांना वॉरनविरोधात वेगळ्या तक्रारीची गरज भासल्यास तीही दिली जाणार असल्याचे त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी त्याच्याबरोबर त्या पीडित मुलीची आईसुद्धा उपस्थित होती.
सध्या पोलिसांनी आपल्यावरील हल्ला प्रकरणाचा छडा लावत आणला असून बलात्कार आणि अश्लील एसएमएस प्रकरणाच्या तक्रारीवर चौकशी आठ दिवसांत पुढे गेली नाही तर बाल न्यायालयात दाद मागितली जाईल, असे ऍड. रॉड्रिगीस यांनी स्पष्ट केले.
त्या अल्पवयीन मुलीबरोबर वॉरन याची विचित्र अवस्थेतील छायाचित्रे मिळाली आहेत. काही दिवसापूर्वी ती एका संकेत स्थळावरही होती. तक्रार दाखल होताच ती तेथून काढण्यात आली. आता ती छायाचित्रे उपलब्ध करण्यासाठी त्या संकेतस्थळाच्या संपर्कात पोलिस असल्याची माहिती ऍड. रॉड्रिगीस यांनी दिली. त्याचप्रमाणे आज सकाळी त्या मुलीचा "ई मेल आयडी' पोलिसांना देण्यात आला असून त्यातूनही अनेक अश्लील "मेल' हाती लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
अशा प्रकारच्या गुन्ह्यात मुलीची वैद्यकीय चाचणी होणे महत्त्वाचे असून पोलिसांनी ती चाचणी जरूर करावी, त्यासाठी त्या मुलीच्या मान्यतेची गरज नसून तिच्या आईने तिच्या वैद्यकीय चाचणीसाठी परवानगी दिली असल्याचे ते म्हणाले. तसेच चर्चिल आलेमाव यांनी त्या अल्पवयीन पीडित मुलीबद्दल आणि तिच्या आईबद्दल अपशब्द वापरले असून त्यांनी त्वरित त्यांची माफी मागावी, अशी मागणीही ऍड. रॉड्रिगीस यांनी केली आहे.
मंत्री चर्चिल आलेमाव यांनी आपल्यावर बिनबुडाचे आरोप केल्याचा दावा त्यांनी केला. विवादास्पद पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने आपणास चारित्र्याचाच्या गोष्टी शिकवण्याची आवश्यकता नाही. माणसाकडून चुका होतात. एखादा विषय हाताळताना आपल्याकडूनही चूक झाली असावी. तथापि, आपले व्यवहार पारदर्शक असल्याचे ऍड. रॉड्रिगीस म्हणाले.
सदर जर्मन महिला वकील पत्र घेऊन पणजीत एका नामवंत वकिलाकडे गेली होती. तथापि, त्याने बाबूश मोन्सेरात यांचे नाव वाचून वकिलपत्र घेण्याचे नाकारले. त्यानंतर त्यानेच आपले नाव सुचवले व आपण तिचे वकिलपत्र घेतले, असा खुलासा ऍड. रॉड्रिगीस यांनी केला.

No comments: