Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 24 October, 2008

निर्देशांक पुन्हा १० हजारांखाली दोन वर्षातील मोठी घसरण

मुंबई, दि.२३ : गेल्या दोन वर्षातील मोठी घसरण नोंदवित आज मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक पुन्हा दुसऱ्यांदा १० हजारांखाली उतरला.
एरवी भारतीय गुंतवणूकदारांच्या शेअर्स विक्रीमुळे बाजारात संकट उभे राहिले असताना आज विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर्स विक्रीला काढले. त्यामुळे गेल्या पाच दिवसात मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक दुसऱ्यांदा १० हजारांखाली आला. ३० शेअर्सवर आधारित निर्देशांकात आज दिवसअखेर ३९८.२० अंकांची घसरण होऊन तो ३.९२ टक्क्यांनी खाली आला. आज तो ९७७१.७० वर बंद झाला. यापूर्वी ही पातळी २० जून २००६ मध्ये गाठली होती. आज दिवसभरात निर्देशांक ९६८१.२८ इतका खालच्या तर १०,२६०.५५ इतक्या वरच्या स्तरावर पोहोचला होता.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीतही आज १२२ अंकांची घसरण झाली. आज तो २९४३.१५ वर बंद झाला. दिवसभरात आज निफ्टी २९१७.१५ इतका खाली आला होता.
जपान दौऱ्यावर असताना काल पंतप्रधानांनी जागतिक मंदीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काही प्रमाणात का होईना परिणाम होईल, असे वक्तव्य दिल्याने आज शेअर बाजारात घबराट पसरली. आजच्या दिवसाची सुरुवात मंदीने झाल्याने अर्थमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे गुंतवणूकदारांना न घाबरण्याचा दिलासा दिला. पण, आज त्यांच्या वक्तव्यामुळे गुंतवणूकदारांची मानसिकता बदलली नाही आणि मोठ्या कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली आहे.
बाजारात सर्वाधिक भाग-भांडवल असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजला आज सर्वाधिक फटका बसला. २००६ नंतर आज प्रथमच रिलायन्सचे शेअर्स १०० रुपयांनी घसरले. ही घसरण ७.६२ टक्के इतकी होती. त्यापाठोपाठ इन्फोसिस या माहिती तंत्रज्ञानातील मोठ्या कंपनीला तोटा झाला. त्यांचे शेअर्स १.३५ टक्क्याने खाली आले. धातू क्षेत्र आज विक्रीच्या दबावाखाली होते.
मुंबई शेअर बाजारातील ३० पैकी २४ कंपन्यांचे शेअर्स आज तोट्यात राहिले. केवळ सहा कंपन्या फायद्यात राहिल्या. त्यात ग्रासीम इंडस्ट्रीज, भेल, एचडीएफसी बॅंक, लार्सन ऍण्ड टूब्रो, ओएनजीसी आणि टाटा कन्सल्टन्सी यांचा समावेश होता.

No comments: