Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 25 October, 2008

'संभवामि युगे युगे'महानाट्य राज्यात ८ पासून

केरी-फोंड्याच्या विजयदुर्गा सांस्कृतिक मंडळाची निर्मिती
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित "संभवामि युगे युगे' या महानाट्याचा शुभारंभी प्रयोग येत्या ८ नोव्हेंबर रोजी फर्मागुडी फोंडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार असून १४ नोव्हेंबरपर्यंत या महानाट्याचे त्याच मैदानावर एकूण सात प्रयोग होणार आहेत. बाबासाहेब पुरंदरेंच्या "जाणता राजा'नंतर विशाल स्वरूपाची अशी ही पहिलीवहिली व आगळीवेगळी महान गोमंतकीय कलाकृती आहे.
विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळ केरी फोंडा या संस्थेने या महानाट्याची निर्मिती केली असून मंडळाचे अध्यक्ष अरुण देसाई यांनी या महानाट्याचे गोव्यातील वेळापत्रक आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. या महानाट्यासाठी भव्य दिव्य रंगमंच उभारण्यात येत असून त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. दरदिवशी संध्याकाळी सात वाजता प्रयोगांना सुरुवात होणार असून सुमारे आठ ते दहा हजार प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था व वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
सदर संस्थेने २००२ साली बाबासाहेब पुरंदरेंच्या "जाणता राजा' या महानाट्याचे गोव्यात यशस्वी आयोजन केले होते. त्या अनुभवाच्या आधारे या संस्थेने आता महानाट्य निर्मितीच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. कृष्ण जीवनाविषयी समाज प्रबोधन व गोव्यातील कला व कलाकार सातासमुद्रापार नेण्याच्या हेतूने या महानाट्याची निर्मिती केल्याचे अध्यक्ष देसाई यांनी स्पष्ट केले. या महानाट्यासाठी एकूण दीड कोटी खर्च अपेक्षित असून अनेक दात्यांनी मंडळाचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी हातभार लावल्याचे ते म्हणाले.
या महानाट्याच्या रंगमंचाची लांबी २४ मीटर असून उंची १८ मीटर आहे. शिवाय भव्य दिव्य अशा रंगमंचाला ६ मजली इमारतीचे स्वरूप देण्यात आले असून हा रंगमंच फिरता, सरकता व उचलता येण्यासारखा असल्याने त्याच्या या नावीन्यामुळे तो अधिक आकर्षक ठरला आहे. शिवाय रंगमंचावर गाई, गुरे, हत्ती, घोडे यांचा प्रत्यक्ष वावर असल्यामुळे भगवान कृष्णाच्या जीवनावरील जीवनपट रसिकांना प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी या महानाट्यामुळे लाभणार आहे. या महानाट्याचे प्रयोग केवल गोव्यातच नव्हे तर भारतभरात व भारताबाहेरही करण्याची तयारी संस्थेने ठेवली आहे.
गेल्या दोन वर्षापासून या महानाट्याची निर्मिती सुरू होती. त्यासाठी मंडळाच्या सदस्यांच्या बैठकाही होत होत्या. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून रंगमंच उभारणीला सुरुवात झाली होती अशी माहितीही अध्यक्ष देसाई यांनी दिली. या महानाट्यासाठी दात्यांकडून घेतलेला निधी दोन वर्षांच्या आत त्यांना आम्ही सव्याज परत करणार असून तसे हमीपत्रही त्यांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या महानाट्याच्या लेखनाची बाजू डॉ. नारायण देसाई यांनी सांभाळली असून त्यासाठी त्यांनी दोन वर्षे श्रीकृष्ण जीवनावर भरपूर वाचन व चिंतन केले आहे. वास्तविक कृष्णाच्या एकेका अध्यायावर एक महानाट्य होऊ शकते. मात्र येथे त्याचा जन्म ते प्रस्थानादरम्यानचा प्रवास केवळ तीन ते चार तासांच्या शब्दबद्ध करून महानाट्याचे लेखन करण्याचे आव्हान आपल्यासमोर होते असे डॉ. देसाई म्हणाले.
संगीतकार अशोक पत्की यांनी या महानाट्याच्या संगीताची बाजू सांभाळली असून दिलीप देसाई यांचे महानाट्याला दिग्दर्शन लाभले आहे. या महानाट्याला दयानंद भगत यांचे नेपथ्य तर दिगंबर सिंगबाळ यांची वेशभूषा लाभली आहे. तसेच प्रभाकर पणशीकर, करवीर शंकराचार्य स्वामी, मोहन वाघ, ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर, श्रीमती अल्का वेलिंगकर, पद्मश्री प्रसाद सावकार या दिग्गजांचे मार्गदर्शनही या महानाट्याला मिळाले आहे.
व्दारका, गोकुळ इत्यादींचे दर्शन घडवतानाच प्रेक्षकांना महाभारतकालीन वातावरणात नेण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने नेपथ्यकाराने विविध वाचनालये, संदर्भ स्थळांना भेटी दिल्या असून अथक व सखोल संशोधनातून नेपथ्य निर्मितीचा त्यांनी प्रयत्न केला आहे. या नाट्याच्या आयोजनासाठी प्रा. भूषण भावे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १५० स्वयंसेवक कार्यरत असून त्यांच्या वेगवेगळ्या ३२ समित्या नेमण्यात आल्या आहेत.
आजच्या पत्रकार परिषदेला रंगमंग निर्मिती प्रमुख राजीव देसाई, रंगमंच साहित्य प्रमुख संतोष देसाई, मंडळाचे ज्येष्ठ सदस्य राजेंद्र देसाई, लेखक डॉ. नारायण देसाई, प्रमुख समन्वयक प्रा. भूषण भावे उपस्थित होते.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys