Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 23 October, 2008

'गोवादूतचे भवितव्य उज्ज्वल' दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): 'गोवादूत'ची आजपर्यंतची वाटचाल आणि विशेषांकांचा दर्जा पाहाता, या दैनिकाचे भविष्य उज्ज्वल असल्याचे प्रतिपादन राज्याचे माहिती संचालक निखिल देसाई यांनी आज "गोवादूत'च्या दिवाळी अंक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी केले.
"गोवादूत'च्या मुख्यालयात झालेल्या या विशेष कार्यक्रमात "दिवाळी विशेषांक २००८'चे प्रकाशन श्री.देसाई यांच्या हस्ते झाले. या अंकातील वैविध्य आणि मांडणी याची प्रशंसा श्री. देसाई यांनी केली. "भावबंध' विषयावरील ललित लेखन स्पर्धेचे परीक्षण केलेले प्रा. कृष्णाजी कुलकर्णी हे यावेळी खास निमंत्रित म्हणून उपस्थित होते. त्यांनी लेखनस्पर्धेचा आढावा घेताना ३४ स्पर्धकांमध्ये २४ महिलांनी भाग घेतल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. विषय देऊन लेखकांना लिहिते करण्याचा "गोवादूत'चा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातील दिवाळी अंकाच्या तोडीचे दर्जेदार अंक आता गोव्यातही प्रकाशित होत असून त्यात "गोवादूत'च्या दिवाळी अंकाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल, असे त्यांनी नमूद केले.
संपादक राजेंद्र देसाई यांनी स्वागत केले. संचालक सागर अग्नी यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. दिवाळी अंकाचे संपादक अशोक नाईक तुयेकर उर्फ पुष्पाग्रज यांनी प्रास्ताविकात "गोवादूत'च्या आजपर्यंतच्या विशेषांकांना मिळालेल्या वाचकांच्या जोमदार प्रतिसादाचा आढावा घेतला. निखिल देसाई व प्रा.कुलकर्णी यांच्या हस्ते लेखन स्पर्धेतील विजेत्या सौ.लक्ष्मी जोग, गुरुदास नावेलकर व सौ.सुचिता सामंत यांना बक्षिसे देण्यात आली.
"गोवादूत'च्या संचालक ज्योती धोंड यांनी आभार मानले. यावेळी व्यवस्थापक विलास कामत, जाहिरात व्यवस्थापक सुरेंद्र काकोडकर, प्रा. रवींद्र घवी तसेच गोवादूतचे कर्मचारी उपस्थित होते.

No comments: