Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 25 October, 2008

माथानी आदर्श लोकनेते : पर्रीकर

कासावली येथे थाटात साठावा वाढदिवस
वास्को, दि. २४ (प्रतिनिधी): सर्व संप्रदाय, पक्ष, धर्म व विविध संस्थांच्या लोकांनी एकत्र येऊन माथानी साल्ढाणा यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याने यातूनच माथानींचे मोठेपण दिसून येते. माथानी हे स्पष्टवक्ते लोकनेते असून गोव्याच्या व गोमंतकीयांच्या हितासाठी त्यांनी अमौलिककाम केले आहे. यापुढेही ते असेच काम करत राहतील व त्याकरता त्यांना मी दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज कासावली येथे केले.
माजी पर्यटनमंत्री तथा कुठ्ठाळीचे माजी आमदार माथानी यांच्या ६० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेलिब्रेशन ऑफ पीपल स्ट्रगल्सतर्फे आयोजित त्यांच्या सत्कार समारंभाला श्री. पर्रीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर गजानन नाईक, फ्रान्सिस रॉड्रिगीस, निमंत्रक ख्रिस्तोफर फोन्सेका, सायमन कार्व्हालो, फादर रिबेलो, ऍड. आनाक्लेत व्हिएगश, आग्नेलो रॉड्रिगीस, बेर्नादो सापेको व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच श्री साल्ढाणा यांची पत्नी श्रीमती एलिना साल्ढाणा यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना पर्रीकर म्हणाले की, माथानीसारख्या गोमंतकीय भूमीच्या पुत्राने सदाकाळ येथील जनहितासाठी काम केले असून गोव्यात जर प्रामाणिक नेता दाखवण्याची संधी आपल्याला मिळाल्यास आपण क्षणाचाही विलंब न करता माथानींचा उल्लेख करू, असे ते म्हणाले.
माथानी सारखा लोकनेता जनहितासाठी दिवसाचे १६ तास कार्य करत असून त्यांना अशाच रितीने कार्ये करण्यासाठी आपण देवाशी प्रार्थना करत आहोत. ३५ वर्षांपूर्वी गोव्यातील जनतेला सुरक्षिततेची पूर्ण खात्री होती; मात्र आता ती राहिलेली नाही. ते दिवस पुन्हा आणण्यासाठी माथानी यांच्यासारखे नेते गोव्याच्या जनतेने निवडण्याची गरज असल्याचे पर्रीकर म्हणाले.
सत्काला उत्तर देताना माथानी म्हणाले, गोमंतकीयांनी धर्म, जात पात, सर्वकाही बाजूला ठेवून गोमंतकीय म्हणून एकत्र येण्याची गरज आहे. तसे झाल्यासच गोवा सुरक्षित राहिल. अन्यथा सर्वत्र
अंधकार पसरण्याची भीती संभवते. जनतेने कुठल्याच दबावाखाली न येता विचार करण्याची गरज आहे.
जनतेला काहीच फायदा होत नाही ती प्रगतीच नव्हे. आपला याला सातत्याने विरोध असणार आहे, असे ते म्हणाले. गोव्यामध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारींमध्ये राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात होत असल्याने पोलिसांना पुरेशी मोकळीक कारवाईसाठी मिळत नाही. पोलिसांना त्यांचे काम करू द्या नंतर खूप सुधारणा होईल अशी खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केली. गोव्याला सध्या जन्मलेल्या राक्षसांच्या तावडीतून वाचवण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. येथील जमीन बिगरगोमंतकीयांना विकण्यावर बंदी घालणाऱ्या कायद्याची गरज असल्याचे साल्ढाणा म्हणाले. तसेच आपला भव्य सत्कार केल्याबद्दल समितीचे आभार मानले.
कामगार संघटनेचे अध्यक्ष ख्रिस्तोफर फोन्सेका, प्रा. प्रजल साखरदांडे, फादर एरामितो रिबेलो, आग्नेलो रॉड्रिगीस (रापणकार संघटनेचे अध्यक्ष) ज्युलियो डिसिल्वा (गावभावाचो एकवोट समितीचे अध्यक्ष) दत्ता दामोदर नाईक, कामिनी कुणयकर व इत्यादींची भाषणे झाली.
यावेळी कार्यक्रमाचे निमंत्रक ख्रिस्तोफर फोन्सेका यांच्या हस्ते माथानी यांचा शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. माथानी यांनी अनेक जनहिताच्या हक्कासाठी चळवळीत भाग घेतला व आज रापोणकार समितीच्या वतीने रेंदेरकार समितीच्या वतीने कुणबी गावडा वेळीप धनगर समितीच्या वतीने अशा अनेक संप्रदायांच्या वतीने त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावून माथानी यांचा सत्कार यावेळी केला. सुरुवातीला माथानी यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तसेच त्यांच्यावर लिहिण्यात आलेल्या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. डॉ. विल्फ्रेड मिस्किता, शिवसेनेचे प्रमुख उपेंद्र गावकर तसेच इतर मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

No comments: