Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 8 June, 2008

भिंत कोसळून पाच कामगार ठार

. पर्वरी येथे रविवारी पहाटे दुर्घटना
. अन्य सहा जण गंभीर जखमी


पणजी, दि. 8 (प्रतिनिधी) - दिवसभर काबाडकष्ट करून रात्री झोपी गेलेल्या तेरा कामगारांपैकी पाच जण पहाटे जाग येण्यापूर्वीच देवश्री रिअल इस्टेट डेव्हलॉपरच्या मालकीची भली मोठी संरक्षण भिंत कोसळल्याने आज जागीच ठार झाले तर, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
पहाटे साखरझोपेत असताना सुमारे 12 फूट उंचीचा चिऱ्याने बांधून काढलेला कठडा कोसळल्याने रमेश (22), अज्ञात महिला(35), माधवी जाधव (15) रेणुका जाधव (32) व उमर साहब (40) यांचे निधन झाले तर रणजीत कोचर (20), जाफर शिलगेकर (18), दिलीप कुमार (18), राम हेराद्दू (20), नागराज जाधव (32) व कमलेश जाधव (10) हे गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी मुख्यमंत्री दिगंबर कामत व पोलिस महानिरीक्षक किशनकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पोलिसांनी पंचनामा करून देवश्री रिअल स्टेट डेव्हलॉपरचे सरव्यवस्थापक व या कामगारांना कंत्राटवर आणलेल्या बिल्डर संदीप कळंगुटकर यांच्यावर भा.दं.सं 336, 337 व 304 (अ) कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. मृत झालेले व जखमी झालेले सर्व कामगार हे कर्नाटक व ओरिसा राज्यातील असून त्यांना संदीप कळंगुटकर या बिल्डरने कामानिमित्त गोव्यात आणल्याची माहिती पर्वरी पोलिसांनी दिली.
पहाटे 6. 45 वाजता या दुर्घटनेची माहिती पर्वरी पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन जखमींना म्हापसा येथील आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आले तर, मृतांना गोवा वैद्यकीय इस्पितळात हलवण्यात आले. दिलीपकुमार व नागराज जाधव यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना तातडीने आझिलो इस्पितळातून गोवा वैद्यकीय इस्पितळात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यांत बांधकामाच्या ठिकाणी दुर्घटना होऊन कामगारांचा बळी जाण्याची ही दुसरी घटना आहे.
या कठड्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना अग्निशामक दलाच्या जवानांनी व पोलिसांनी बाहेर काढले. घटनास्थळी साहाय्यक जिल्हाधिकारी स्वप्निल नाईक, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज, उपजिल्हाधिकारी महेश खोर्जुवेकर, पर्वरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक देवेंद्र गाड उपस्थित होते. या अपघाताची नेमकी कारणे शोधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंता विभागाची मदत घेतली जाणार असल्याचे यावेळी साहाय्यक जिल्हाधिकारी स्वप्निल नाईक यांनी सांगितले.
अधिक माहितीनुसार पर्वरी येथे देवश्री रिअल इस्टेटचा प्रचंड मोठा प्रकल्प उभा राहात असून, या प्रकल्पाच्या सभोवती सुमारे 600 मीटर लांब संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. या भिंतीच्या दुसऱ्या बाजूला लोकांची घरे असून एका बाजूलाच संदीप कळंगुटकर या बिल्डरचे बंगल्याचे बांधकाम सुरू होते. या दोन्ही बांधकामाच्या मधोमध ही संरक्षण भिंत उभी आहे. या संरक्षण भिंतीच्या बाजूला संदीप कळंगूटकर याचे कामगार झोपडी बांधून राहत होते. याच झोपड्यांवर भिंत कोसळल्याने हा अनर्थ घडला.
ही संरक्षण भिंत बाजूच्या घरांना धोकादायक असल्याने काही दिवसांपूर्वी सुकुर पंचायतीच्या काही पंच सदस्यांनी ही भिंत पाडण्यासाठी ठराव संमत केला होता आणि या विषयीची नोटीस काढण्याची सूचनाही पंचायत सचिवांना करण्यात आली होती. परंतु ती नोटीस काढण्यात आली नसल्यानेच एवढी मोठी दुर्घटना घडल्याचा आरोप पंच सदस्य कीर्ती अस्नोडकर यांनी केली आहे. या घटनेनंतर आज सकाळी पंचायत सदस्यांनी खास बैठक घेऊन अन्य घरांना लागूनच असलेला दोनशे मीटरचा धोकादायक कठडा त्वरित पाडण्याचा ठराव संमत करण्यात आला. त्याचप्रमाणे जोपर्यंत हा कठडा पाडला जात नाही, तोपर्यंत प्रकल्पाचे कसल्याही प्रकारचे बांधकाम हाती घेतले जाऊ नये, असाही ठराव संमत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दुपारपासून हा कठडा पाडण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यापूर्वी पंच सदस्य नारायण सातार्डेकर व किशोर अस्नोडकर यांनी क्षमतेपेक्षा उंच उभारलेल्या या कठड्याला आपला विरोध दर्शविला होता,अशी माहिती श्री. अस्नोडकर यांनी दिली.
कुत्र्यांचे जाधव कुटुंबीयावर प्रेमः
या दुर्घटनेत जाधव कुटुंबातील आई व मुलीला मृत्यू आला तर, वडील व मुलगा गंभीर जखमी झालेत. झोपण्यापूर्वी त्यांनी आपला कुत्रा झोपडीच्या बाहेर बांधून ठेवला होता. या अपघातात तो सुरक्षित राहिला, मात्र दोघांच्या मृत्यू ने आणि आपल्या मालकाच्या काळजीने तो तेथून हटवल्यासही जायला तयार नव्हता. ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढताना त्या कुत्र्याला पोलिसांनी हाकलायचा बराच प्रयत्न केला. परंतु तो पुन्हा पुन्हा त्याठिकाणी येत असल्याने शेवटी पोलिसांनी त्याला हाकलणेच सोडून दिले.

No comments: