Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 8 June, 2008

पर्वरी ये़थील दरड कोसळण्याचा धोका

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): पर्वरी येथील कोसळलेल्या दरडीच्या ठिकाणी संरक्षक भिंतीचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात सरकारने केलेल्या अक्षम्य दिरंगाईमुळे पुन्हा एकदा पर्वरी येथील राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची धोका निर्माण झाला आहे. आज पडलेल्या संततधार पावसामुळे ही दरड पुन्हा एकदा कोसळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे महामार्गावरील वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने पहिल्या पावसातच आम आदमी जाम झाला आहे.
या दरडीच्या ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम प्रत्यक्ष निविदेतील रकमेपेक्षा २० टक्के कमी दराने घेतलेल्या कंत्राटदाराची हे काम करण्याची क्षमताच नसल्याने खात्यासमोर पेच निर्माण झाला आहे. याप्रकरणी सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पर्वरी येथील गेल्या पावसाळ्यात कोसळलेल्या या दरडीच्या ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे गेल्या मे महिन्यात कंत्राट देण्यात आले. हे काम राष्ट्रीय महामार्गावर येत असल्याने त्यासंबंधी केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग रस्ता प्राधिकरणाची परवानगी ३० मार्च रोजी मिळाली व त्यानंतरच या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. या कामासाठी दोघा कंत्राटदारांकडून प्रस्ताव सादर झाले होते. त्यात १.७० कोटींच्या मूळ रकमेच्या २० टक्के कमी रकमेने निविदा सादर करून धारगळकर नामक एका कंत्राटदाराने हे काम मिळवले. मुळात हे कंत्राट मिळवण्यासाठी कुणा एका बड्या कंत्राटदाराने धारगळकर यांच्या नावाने हे कंत्राट घेतले होते. तथापि, कंत्राट मिळवल्यानंतर काही काळातच त्यांच्यात वाद निर्माण झाल्याने आता या कामाची पूर्ण जबाबदारी धारगळकर यांच्यावर आली आहे. हे काम करण्यासाठी जी यंत्रणा त्यांच्याकडे असायला हवी ती अजिबात नसल्याने एवढ्या मोठ्या दरडीचे काम केवळ चार ते पाच कामगार करीत असल्याचे विचित्र चित्र तेथे पाहायला मिळते. सरकारने कंत्राटदाराला नोटीस जारी करण्याची घोषणा करताच कंत्राटदाराने कामगारांच्या संख्येत वाढ करून कामाला गती दिली खरी परंतु आता भर पावसाळ्यात या दरडीचे काम करणे जिकिरीचे बनले आहे. मुळात येथे काम करणाऱ्या कामगारांनाही कोणतेही संरक्षण नसून ही दरड त्यांच्यावरच कोसळून ते ढिगाऱ्याखाली येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या दरडीचा धोका पाहता त्यासाठी "गॅबियन' पद्धतीने जाळी घालून ही माती अडवण्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याने ठरवले असले तरी हे काम प्रत्यक्षात केव्हा हाती घेतले जाणार यासंबंधी कोणतीही ठोस माहिती खात्याकडे उपलब्ध नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याचेमंत्री चर्चिल आलेमाव यांनी सदर कंत्राटदाराला दिलेले हे कंत्राट रद्द करण्याची घोषणा यापूर्वीच केली असून कारणे दाखवा नोटीस जारी केल्याची माहिती खात्यातील सूत्रांनी दिली. गेल्या पावसाळ्यात कोसळलेल्या दरडीवर सरकारला सुमारे सव्वा दोन कोटी रुपये खर्च झाला होता. त्यातील सुमारे १.५० कोटी रुपये केंद्र सरकारने दिले व ८५ लाख रुपये राज्य सरकारने खर्च केले. आता संरक्षक भिंतीसाठी १.२४ कोटी रुपये खर्च येणार असल्याने ही दरड पुन्हा खाली आल्यास आणखीन एक कोटीने खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरकार खरोखरच ही दरड हटवण्यासाठी प्रयत्नशील आहे की काय किंवा ज्या पद्धतीने हे काम सरकारकडून रखडवले गेले व भर पावसाळ्यात संरक्षक भिंतीचे काम हाती घेण्यात आले त्यावरून ही दरड काही लोकांनी पैसे कमावण्याचे साधन तर बनवली नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे.
-----------------------------------------------------------
वाहने चालवताना कसरत
पणजी शहरात ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आले असून त्यामुळे वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. हे रस्ते योग्य प्रकारे बुजवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे खड्ड्यांतून जाताना वाहन चालकांना त्यांच्या खोलीचा अंदाजच येत नाही. परिणामी ते अपघातांना निमंत्रण ठरत आहे. हे खड्डे बुजवण्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल लोकांतून विचारला जात आहे.
-----------------------------------------------------------
महामार्गावरील माती, अपघातांस आमंत्रण!
पर्वरी येथील दरडीची हटवलेली माती संपूर्ण महामार्गाच्या बाजूला टाकून सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ता अपघातांना आमंत्रणच दिले आहे. एरवी वाढत्या रस्ता अपघातांमुळे अनेकांचे प्राण गमावण्याचे प्रकार घडत असताना आता खुद्द सार्वजनिक बांधकाम खात्याकडूनच अपघातांना पोषक स्थिती निर्माण करण्यात आल्याने वाहनचालकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. पर्वरी येथील दरडीची चिकण माती असल्याने ती रस्त्याच्या बाजूला टाकल्याने अवजड वाहने या मातीवरून गेल्यानंतर ही संपूर्ण माती रस्त्यावर पसरली आहे. एखादे अवजड वाहन अंगावर आल्यास दुचाकी वाहन रस्त्याच्या बाजूला घेण्याची सोय असणे गरजेचे आहे परंतु आता ही माती रस्त्याच्या बाजूला टाकल्याने पावसाच्या पाण्यामुळे चिखल तयार झाला असून रस्ता अपघातांना हे आमंत्रणच ठरले आहे. वाहतूक पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन यापासून काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे. पर्वरी ते थेट कोलवाळ येथील बिनानी कंपनीपर्यंत संपूर्ण महामार्गाच्या बाजूला ही माती टाकण्यात आली आहे.

No comments: