Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 26 February, 2008

संप मागे
कचरा उचलण्यास आरंभ

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी) - महापौर टोनी रोड्रिगीस यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पालिकेच्या कामगारांनी बेमुदत पुकारलेला संप सायंकाळी मागे घेतला. याविषयीची घोषणा आज हंगामी महापौर यतीन पारेख यांनी केली. काल पणजीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आज सायंकाळपर्यंत कचरा प्रश्नावर तोडगा काढला जाणार असल्याचे घोषित केले होते.
महापौरांना झालेल्या मारहाण प्रकरणात आज सायंकाळी पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक व निरीक्षक यांची बदलीचे आदेश काढण्यात आले असले तरी, या प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याची मागणी कायम असल्याचे श्री. पारेख यांनी सांगितले. आज सायंकाळी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी तब्बल पाच दिवसांनी महापौर रोड्रिगीस यांची इस्पितळात जाऊन भेट घेतली. यावेळी त्याच्याबरोबर नगर विकास मंत्री ज्योकीम आलेमाव व वीज मंत्री आलेक्स सिकेरा उपस्थित होते. यावेळी कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने महापालिकेने सरकारला सहकार्य करण्याची विनंती त्यांना केल्याचे श्री. कामत यांनी पत्रकारांना सांगितले. दुपारी मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, नगर विकास मंत्री ज्योकीम आलेमाव यांची पर्वरी येथील सचिवालयात संयुक्त बैठकीत घेऊन कचरा प्रश्नावर चर्चा केली.
गेल्या काही दिवसांपासून कचरा टाकण्यास जागेच्या मालकाने विरोध केल्याने महापालिकेने कचरा उचलायचे बंद केले होते. सदर कचरा टाकण्यास पोलिस संरक्षणाचीही मागणी केली होती. परंतु ती न मिळाल्याचे केशव प्रभू यांनी सांगितले. त्यामुळे जमीन मालकाची मनधरणी करावी व कचरा न उचलण्याचा निर्णय महापालिकेने मागे घ्यावा, यासाठी गेल्या दोन दिवसांपासून श्री. पर्रीकर यांनी जोरदार प्रयत्न चालवले होते. या विषयी काल त्यांनी इस्पितळात महापौर रोड्रिगीस, हंगामी महापौर यतीन पारेख व पालिका कामगार नेते केशव प्रभू यांच्याशी चर्चा करून आज दि. २५ रोजी सायंकाळपर्यंत तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.
श्री. रोड्रिगीस यांच्या मारहाणीच्या विरोधात आज दिवसभर संपूर्ण बाजारात बंद पाळण्यात आला. मासळी बाजार तसेच भाज्यांचा बाजारही पूर्णपणे बंद होता. महापालिका बाजार सोडल्यास पणजीतील अन्य दुकाने सुरू होती. तर बाजारातील औषधालयेही खुली होती. गेल्या तीन दिवसांपासून शहरातील कचरा उचलला नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडले होते. अनेक ठिकाणी कचरा साजून कुजल्याने त्याची दुर्गंधी येत होती. तर राहिलेले मासे तीन दिवसांपासून मासळी बाजारातच पडून राहिल्याने त्याची असह्य दुर्गंधी येत होती. सकाळी पणजी शहरात फिरणारे काही पर्यटक आपल्या नाकाला रुमाल बांधून फिरतानाचे चित्र पाहायला मिळत होते. सध्या बाजारात सुमारे पन्नास टन कचरा पडून असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्री. गडकरी यांनी दिली. हा कचरा उद्या सकाळपर्यंत उचलला जाणार असल्याचा दावा श्री. पारेख यांनी केली. सायंकाळी सात वाजल्यापासून युद्धपातळीवर कचरा उचलण्याच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र येत्या आठ दिवसांत सरकारने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले नसल्यास पुन्हा संपावर जाण्याची तयारी ठेवल्याचे श्री. पारेख यांनी सांगितले. यावेळी त्यांच्याबरोबर अन्य नगरसेवक व कामगार नेते केशव प्रभू उपस्थित होते.

No comments: