Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 26 February, 2008

समाजाभिमुख शिक्षण ही
काळाची गरज - डॉ. नरेंद्र जाधव

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी) - कुठल्याही राष्ट्राच्या उभारणीत शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असते. मात्र हे शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान मिळवणे नसून समाजाभिमुखता ही शिक्षणाची दिशा असायला हवी. समाजातील सर्व घटकांना शिक्षणाची कवाडे खुली करून दिल्यावर राष्ट्राला त्याचा कसा लाभ होत जातो, हे भारतीय स्वातंत्र्यानंतर आपण अनुभवत आलो आहोत. येथील ज्ञानीजनांना आता तर जगाची द्वारे खुली झाली असून त्यातूनच भारत जागतिक महासत्तेकडे वाटचाल करू लागला आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत तथा पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नरेंद्र जाधव यांनी येथे आज केले. येथील मुष्टिफंड संस्थेच्या शताब्दी समारोह समितीने संस्थेच्या सभागृहात आयोजित केलेल्या "शैक्षणिक संस्थांसमोरची आव्हाने' या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते.
देशावर दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिशांनी आपल्याला मागास ठेवले नाही, पूर्वापार चालत आलेल्या गुरूकुल शिक्षण पद्धतीने आपल्याला मागास ठेवले. या शिक्षणपद्धतीने अवघ्या काहीजणांना शिक्षित केले. समाजाच्या तळागाळातील मुलांसह एकूणएक लोकांना शिक्षणाची दारे जर खुली राहिली असती तर आज आहे त्याहीपेक्षा भारत पुढारलेला असता असे डॉ.जाधव म्हणाले. सुमारे शंभर वर्षांपूर्वी मुष्टिफंड संस्थेच्या संस्थापकांनी हाच विचार करून मूठ मूठभर फंडाच्या रूपाने ही शिक्षणदानाची संस्था रूजू घातली. शिक्षणाचे ध्येयही असेच व्यापक असायला हवे. सामाजिक बांधिलकीतून शैक्षणिक क्षेत्र विकसित होणे गरजेचे आहे. ही सामाजिक बांधिलकी आपल्या अभ्यासक्रमांतून आणि शिक्षणाच्या पद्धतीतूनही दिसायला हवी. खूप विद्वत्ता मिळवायची आणि जगाचे ज्ञान शून्य, असे शिक्षण काय कामाचे, असा सवाल त्यांनी केला. पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून आपण स्वतः या समस्या सोडवण्यास आरंभ केला आहे. प्रचंड लोकसंख्या हा शाप नव्हे, जास्तीत जास्त युवापिढी हे कुठल्याही देशाचे सामर्थ्य असते. वय वर्षे १६ ते २२ हे कॉलेजसारखे उच्चशिक्षण घेण्याचे वय असते. असे शिक्षण घेणाऱ्या आपल्याकडील युवापिढीचे प्रमाण केवळ साडेनऊ टक्के आहे. बाकीचे जवळजवळ ९० टक्के विद्यार्थी अशा शिक्षणापासून दूर राहतात. विकसनशील देशांतील हेच प्रमाण २१ टक्के आहे. शिक्षणक्षेत्राच्या वृद्धीसाठी सरकारची इच्छाशक्तीही दिसायला हवी. देशाच्या उत्पन्नातील ६ टक्के रक्कम शिक्षणावर खर्च व्हायला हवी, हे सर्वमान्य सूत्र आहे. अगदी शाहू महाराजांनीदेखील आपल्या रयतेसाठी हे सूत्र जपले होते. पहिल्यावहिल्या कोठारी आयोगानेदेखील या ६ टक्के तरतुदीचे सूतोवाच केले होते. दुर्दैवाने आजही ही रक्कम तीन-साडेतीन टक्क्यांच्या पुढे सरकत नाही. शिक्षणावरील अधिकतर खर्च प्राथमिक स्तरावर होणे गरजेचे आहे. आर्थिक परिस्थितीमुळे समाजातल्या काही घटकांना आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण देता येत नाही. त्यावरही उपाय आहे. "कमवा आणि शिका' ही योजना आपण पुणे विद्यापीठात यशस्वीपणे राबवीत आलो असल्याची माहिती डॉ.जाधव यांनी दिली. सध्याच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांत आमूलाग्र बदल होणे गरजेचे असून विद्यमान परिस्थितीत जागतिक स्पर्धेत टिकाव धरू शकेल अशाच शिक्षणाची आज गरज असल्याचे डॉ.जाधव यांनी आपल्या उद्बोधक भाषणात सांगितले.
शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. मुष्टिफंडच्या शताब्दि समारोह समितीचे अध्यक्ष मोहन राव यांनी प्रास्ताविक केले. डॉ.अजय वैद्य यांनी सूत्रसंचालन केले, तसेच पाहुण्यांचा परिचय करून दिला. समितीचे कार्यवाह दिलिप धारवाडकर हेही व्यासपीठावर उपस्थित होते.

No comments: