पणजी, दि. २५ : कॉंग्रेस सरकारने इंग्रजीसमोर अक्षरशः लोटांगण घालून इंग्रजी शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याने आजचा दिवस हा गोमंतकातील भारतीय भाषांसाठी काळा दिवसच असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेश प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी व्यक्त केली आहे.
कॉंग्रेसचा हा निर्णय म्हणजे भारतीय भाषांचे खच्चीकरण करण्याचा कुटील डाव आहे. या निर्णयाद्वारे स्थानिक भाषा, विशेषतः कोकणी भाषेच्या मुळावरच घाव घालण्याचे दुष्कृत्य दिगंबर कामत सरकारने केले आहे. प्राथमिक शिक्षणाच्या माध्यम प्रश्नाबाबत सरकारने समस्त गोमंतकीयांची दिशाभूल केली असून, इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना अनुदान देण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे गोवेकरांचा घोर विश्वासघात आहे, असे श्री. आर्लेकर यांनी म्हटले आहे.
भाषा माध्यम प्रश्नावर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांनी इंग्रजी माध्यमास विरोध दर्शविला असल्याने या प्रश्नावर त्यांनी सरकारचा पाठिंबा त्वरित काढून घ्यावा; सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी आणि मगो पक्षाचा जर खरोखरच या निर्णयास विरोध असेल तर त्यांनी ताबडतोब मंत्रिमंडळातून बाहेर पडावे, असा सल्लाही श्री. आर्लेकर यांनी दिला आहे.
Thursday, 26 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment