Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 22 May 2011

‘गूज’ अध्यक्षपदी पांडुरंग गावकर

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): गोवा श्रमिक पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत युवा पत्रकार पांडुरंग गावकर यांची निवड झाली आहे. त्यांनी ५८ मते प्राप्त करून आपले प्रतिस्पर्धी सुदेश आर्लेकर (५५) व सुहासिनी प्रभुगावकर (५१) यांच्यावर निसटती आघाडी घेत विजय मिळवला.
गोवा श्रमिक पत्रकार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण बैठक आज इथे ‘गूज’ कार्यालयात पार पडली. यावेळी २०११ ते २०१३ या काळासाठी ‘गूज’ कार्यकारिणीसाठीची निवडणूक झाली. कार्यकारिणीवर निवडून आलेल्या सदस्यांत सोयरू कोमरपंत (१२१), विठ्ठलदास हेगडे (११९), प्रशांत वेरेकर (१०५), गॅरी आझावेदो े(९५), बिंदीया च्यारी (९४), राजतीलक नाईक (९४) रूपेश सामंत (८२), यशवंत पाटील (७९), सुरेश वडावडेकर (७८) व कालिका बापट (७७) आदींची निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून शरदचंद्र नाईक यांनी काम पाहिले तर प्रेमनाथ गावडे यांनी त्यांना साहाय्य केले.
बैठकीच्या प्रारंभी ‘गुज’चे अध्यक्ष प्रकाश कामत यांनी आपला अहवाल वाचून दाखवला. श्रमिक पत्रकारांसमोरील विविध आव्हाने तसेच त्यांच्या न्याय्य हक्कांबाबतच्या लढ्याचा संदर्भ त्यांनी आपल्या अहवालात दिला. सध्याचे हे निवडणुकीचे वर्ष असल्याने ‘पेड न्यूज’च्या धोक्यापासून सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सरचिटणीस सुदेश आर्लेकर यांनी सरचिटणीस अहवाल सादर केल्यानंतर त्याला मान्यता देण्यात आली तसेच वार्षिक ताळेबंदालाही या बैठकीत मंजुरी मिळाली. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनाही संघटनेत सामावून घेण्यासंबंधी तसेच वृत्तपत्र उद्योगातील सर्वच कामगारवर्गांचा समावेश असलेल्या महासंघाची स्थापना करण्याबाबत वेगवेगळ्या समित्यांची स्थापना या बैठकीत करण्यात आली.

No comments: