Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 6 March, 2011

‘पणजी फर्स्ट’ला निवडून द्या : पर्रीकर


(जाहीरनाम्याचे प्रकाशन)

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)
पणजी महापालिकेची १३ मार्च रोजी होणारी निवडणूक राजधानीतील लोकांची मानसिकता दर्शवणारी ठरणार आहे. स्वच्छ प्रशासन व सुनियोजित विकास यासाठी पणजी महापालिका क्षेत्रातील मतदारांनी ‘पणजी फर्स्ट’ पॅनलला निवडून द्यावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते तथा पणजीचे आमदार मनोहर पर्रीकर यांनी आज येथे बोलताना केले.
‘पणजी फर्स्ट’च्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पर्रीकर बोलत होते. यावेळी खासदार श्रीपाद नाईक, माजी महापौर अशोक नाईक, विद्यमान नगरसेवक मिनीन डिक्रुझ, संदीप कुंडईकर, दीक्षा माईणकर, वैदेही नाईक, वर्षा हळदणकर, रुपेश हळर्णकर, सुरेश चोपडेकर, ज्योती मसुरकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
खासदार श्री. नाईक यांच्या हस्ते ‘पणजी फर्स्ट’ पॅनलच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले. यावेळी बोलताना श्री. नाईक यांनी ‘पणजी फर्स्ट’ पॅनल पणजीच्या अर्थात पणजीकरांच्या हितासाठी स्थापन झाले असल्याचे सांगून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पणजीच्या मतदारांनी या पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन केले.
श्री. पर्रीकर यांनी यावेळी ‘पणजी फर्स्ट’ पॅनलच्या आगामी योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. या जाहीरनाम्यात पणजीकरांचे हित साधणार्‍या विविध योजना पॅनलतर्फे आखण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पार्किंगचे सुनियोजन, वाहतुकीत सुधारणा व त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर, पायाभूत सुविधा उपलब्ध करून विविध योजनांची कार्यवाही करणे, बाजारसंकुलाच्या तिसर्‍या टप्प्याचे बांधकाम पूर्ण करणे, कॅसिनोतील बेकायदा गोष्टींना आळा घालणे, ज्येष्ठांसाठी घरबसल्या विविध सेवा उपलब्ध व्हाव्यात म्हणून योजना आखणे, अस्वच्छतेवर उपाय, मुख्य रस्त्याशेजारील जुन्या घरांचे महापालिकेच्या खर्चाने रंगकाम करणे, मळा मार्केट प्रकल्पाचे काम मार्गी लावणे, महापालिकेचे नियम पणजी महापालिकेला लागू व्हावेत म्हणून प्रयत्न करणे, महापालिकेला असलेल्या विविध अधिकारांचा प्रभावीपणे वापर करून महसूल गोळा करणे व महापालिका क्षेत्रातील प्रत्येक भागाचा सर्वांगीण विकास करणे, सरकारी संस्था व इमारतींकडून महापालिकेला येणे असलेला कर निधी वसूल करण्यावर भर आदी अनेक योजनांची माहिती श्री. पर्रीकर यांनी यावेळी पत्रकारांना दिली.
मळा तलावाचे सौंदर्यीकरण
पत्रकारांनी मळा तलावाबाबत श्री. पर्रीकर यांना प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले, मळा भागाला एैतिहासिक महत्त्व आहे. आपल्या कारकिर्दीत तेथे अनेक विकासकामे झाली. मात्र विद्यमान सत्ताधारी मंडळाने त्यानंतर या भागाकडे दुर्लक्षच केले. मळा तलाव व त्या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार असून त्यासाठी विकास योजना तयार आहे असेही श्री. पर्रीकर यांनी सांगितले.
पणजीत येण्यास तिसरा रस्ता
सकाळ - संध्याकाळ पणजीत ये-जा करणार्‍या वाहनचालकांची वाहतूक कोंडीमुळे बरीच तारांबळ उडते. त्यासाठी पाटो प्लाझा वस्तुसंग्रहालय ते नेवगीनगर पणजी शहर असा नवा रस्ता बांधण्यात येणार आहे. ‘पणजी फर्स्ट’ पॅनल सत्तेवर आल्यानंतर त्वरित या कामाला सुरुवात होईल. सध्या फक्त प्राथमिक स्तरावर या रस्त्याची आखणी सुरू आहे अशी माहिती श्री. पर्रीकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना दिली.
दुकाने वाटपांचे फेरसर्वेक्षण
बाजारसंकुलातील दुकाने वाटप घोटाळ्यांची सखोल चौकशी करून त्यामध्ये अडकलेल्यांवर कारवाई व्हावी यासाठी ‘पणजी फर्स्ट’ प्रयत्न करणार आहे. सत्तेवर आल्यानंतर दुकाने वाटपांचे फेरसर्वेक्षण करून अनेकांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात येईल, असेही एका प्रश्‍नाचे उत्तर देताना श्री. पर्रीकर म्हणाले.
रायबंदर येथे पाणीप्रकल्प
महापालिका क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी मिळावे यासाठी ‘पणजी फर्स्ट’चा प्रयत्न असेल. पॅनल सत्तेवर येताच रायबंदर व पाटो परिसरात स्वच्छ पाणीपुरवठा करणारे प्रकल्प उभारण्यात येतील असे श्री. पर्रीकर यांनी सांगितले.
सांतइनेज नाल्याची स्वच्छता
महापालिकेवर ‘पणजी फर्स्ट’ची सत्ता येताच सांतइनेज नाल्याची स्वच्छता व त्याचे सौंदर्यीकरण करण्यावर भर देण्यात येईल. ‘फक्त सत्ता द्या, वभागवार समित्या स्थापून व विविध विकास योजना आखूनपणजीकरांच्या सर्व आकांक्षांची पूर्तता करू’ असे आश्‍वासन श्री. पर्रीकर यांनी यावेळी बोलताना दिले.


सेमीफायनल नव्हे
पणजी महापालिका निवडणूक ही येत्या विधानसभेची सेमीफायनल आहे का? असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारताच श्री. पर्रीकर म्हणाले की, पणजी महापालिकेत पणजी विधानसभा क्षेत्राचे तब्बल २१ तर ताळगाव मतदारसंघात फक्त ९ विभाग येतात. त्यामुळे महापालिका निवडणूक ही विधानसभेची सेमीफायनल ठरू शकत नाही. मात्र, लोकांना ‘भ्रष्टाचार हवा की विकास हवा’ हे यावेळी स्पष्ट होणार असल्याने ही निवडणूक संपूर्ण गोव्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे असे ते म्हणाले.
युवा उमेदवार रिंगणात
‘पणजी फर्स्ट’ पॅनलचे अशोेक नाईक सोडले तर सर्व उमेदवार हे तिशीतील म्हणजेच तरुण आहेत. म्हणूनच पणजीच्या मतदारांनी तरुणांच्या हातात महापालिकेची सत्ता द्यावी, असे आवाहन श्री. पर्रीकर यांनी केले.
मते द्या, विकास देतो : अशोक नाईक
पणजीतील अनेक नामवंत मंडळींनी आग्रह केल्यामुळेच आपण निवडणूक रिंगणात उतरलो आहे. पणजीच्या मतदारांनी ‘पणजी फर्स्ट’ पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे, आपण मतदारांना सर्वांगीण विकास म्हणजे काय हे दाखवून देऊ, असे ‘पणजी फर्स्ट’ पॅनलचे नेते माजी महापौर अशोक नाईक यांनी यावेळी सांगितले.

No comments: