Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 7 March, 2011

‘पोर्तुगीज छळाचा खरा इतिहास शिकवा’

पणजीत भारतीय स्त्री शक्ती कार्यकर्ता संमेलन
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)
गोव्यावर ४५० वर्षे राज्य केलेल्या पोर्तुगीजांनी येथील लोकांवर अमानुष अन्याय व अत्याचार केलेले आहेत. मात्र विद्यमान शिक्षण प्रणालीत या छळाचा खरा इतिहास मुलांना शिकवला जात नाही. त्यामुळे आत्ताची पिढी असंस्कृत बनत चालली आहे. मातांनी स्वाभिमानाचे तेज अबाधित ठेवून आपल्या मुलांना खरा इतिहास शिकवून त्यांच्यात देशभक्तीचे स्फुल्लिंग भरावे. जेणेकरून देशात देशभक्तांची संख्या वाढेल व सुसंस्कृत पिढीद्वारे देशाचे कल्याण होईल, असे प्रतिपादन प्रा. सुभाष वेलींगकर यांनी आज येथे बोलताना केले.
‘भारतीय स्त्री शक्ती’च्या गोवा विभागातर्फे पणजी येथे आयोजित कार्यकर्ता संमेलनात प्रा. वेलींगकर ‘गोव्याचे राष्ट्रजीवन व महिला’ या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते.
या प्रसंगी बोलताना प्रा. वेलींगकर म्हणाले की, गोवा स्वतंत्र झाल्यानंतर जन्मलेल्या पिढीला गोवा मुक्तीचा खरा इतिहास शिकवला गेला नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर छत्रपती शिवाजी वा संभाजी महाराजांचा आदर्श राहिला नाही. काहीजण अजूनही अत्याचारी तथा दुष्ट पोर्तुगीजांचे पोवाडे गात आहेत. हे योग्य नसून प्रत्येक महिलेने गोव्याच्या खर्‍या इतिहासाचा व पोर्तुगीजांच्या अत्याचारी छळाचा इतिहास वाचायला हवा व त्यावरून आपल्या कार्याची दिशा ठरवायला हवी. यावेळी प्रा. वेलींगकर यांनी उपस्थित महिलांना गोवा मुक्तीचा व पोर्तगीजांच्या छळाचा इतिहास कथन केला. या वेळी प्रा. वेलींगकर यांनी आजही पोर्तुगिजांंची भाटशाही करणार्‍यांवर जोरदार ताशेरे ओढले व देशभक्तांच्या कार्यांचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्यामल कामत यांनी प्रा. वेलींगकर यांचे स्वागत केले.
स्वतःवर विश्वास ठेवून कार्याचे योग्य प्रकारे नियोजन केल्यास समाजकारण व राजकारण यात निश्‍चित यश मिळते. असे प्रतिपादन श्रीमती मनस्विनी प्रभुणे यांनी येथे बोलताना केले. भारतीय स्त्री शक्तीच्या कार्यकर्ता संमेलनात ‘३३ टक्के आरक्षण व कुटुंबव्यवस्थेवर परिणाम’ या विषयावर बोलताना श्रीमती प्रभुणे यांनी वरील प्रतिपादन केले. त्या पुढे म्हणाल्या की, योग्य नियोजन व आत्मविश्वास याद्वारे कुठल्याही क्षेत्रात कार्यतत्पर राहता येते व त्याबरोबरच कुटुंबसुद्धा चालवता येते.
या सत्रा पूर्वीच्या सत्रात डॉ. राजेश धुमे यांनी ‘महिलांची मानसिकता व कुटुंब’ या विषयावर मार्गदर्शन केले. भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या अध्यक्षा ऍड. स्वाती केरकर, सचिव सुनिता दांडे, खजिनदार दीपाली बाणस्तारकर व श्यामल कामत यांच्या उपस्थितीत दिवसभर आयोजित या कार्यकर्ता संमेलनाचा समारोप झाला.

No comments: