Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 11 March, 2011

मतदानासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडा - डॉ. मोंतेरो

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी)
पणजीच्या सुनियोजित विकासासाठी ‘पणजी फर्स्ट’ पॅनलची सत्ता पणजी महापालिकेवर येण्याची गरज असून पणजी शहराच्या हितासाठी पणजीच्या सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन फ्रेंडस् ऑफ गुड गव्हर्नन्सचे डॉ. रुफीन मोंतेरो यांनी केले आहे.
पणजी महापालिकेची निवडणूक दि.१३ मार्च रोजी होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या तीसही प्रभागात जोरदार प्रचार सुरू आहे. एकमेकावर कुरघोडी करत चालू असलेला हा प्रचार पाहता यावेळेेची निवडणूक बरीच चुरशीची होणार आहे असे वाटत आहे. त्यातच भ्रष्टाचाराचे भरपूर आरोप झालेल्या मंत्री बाबूश समर्थक सत्ताधारी मंडळाला पराभूत करण्यासाठी व नव्या दमाच्या सुशिक्षित उमेदवारांचा भरणा असलेल्या ‘पणजी फर्स्ट ’पॅनलला निवडून आणण्यासाठी पणजीतील अनेक मान्यवर व सुशिक्षित ज्यांचा पणजी बरोबरच परिसरात बराच दबदबा व नाव आहे अशी मंडळी एकत्र आली आहेत. त्यातील जादातर लोकांनी ‘पणजी फर्स्ट‘ या पॅनलला निवडून देण्याचे आवाहन विविध माध्यमातून सुरू केले आहे. त्यामुळे विद्यमान सत्ताधारी गटाचे धाबे दणाणले आहेत.
समाजात मोठा मान असलेल्या या डॉक्टर, वकील, इंजिनिअर्स, समाजसेवक व माजी अधिकारी वर्गाने लोकांना केलेले आवाहन योग्य कारणी लागण्यासाठी पणजीतील सुशिक्षित तथा उच्चभ्रु मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडून मतदान करण्याची गरज ‘फ्रेन्ड्स ऑफ गुड गव्हर्नन्स’चे डॉ. रुफीन मोंतेरो यांनी व्यक्त केली आहे.
अनेक वेळा विविध स्तरावरील निवडणुकांत असे दिसून आले आहे की सर्वसामान्य लोक मतदानासाठी रांगा लावतात व मतदान करतात. मात्र उच्चभ्रु लोक मतदानासाठी रांगेत उभे राहावे लागते म्हणून मतदानास येण्यास टाळतात. मात्र पणजीतील सध्या स्थिती बदलून पणजीला भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्यासाठी व पणजीच्या विकासासाठी सर्व पणजीकरांनी घराबाहेर पडावे व ‘पणजी फर्स्ट’ पॅनलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या संख्येेने मतदान करावे असे आवाहन ‘फे्रन्डस् ऑफ गुड ग्वहर्नन्स’ इतर अनेक मान्यवरांतर्फे करण्यात आले आहे.

No comments: