Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 8 March, 2011

वास्को खारीवाडा घरांवरील कारवाई तूर्तास टळली

न्यायालयाचा स्थगितीचा आदेश

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)
खारीवाडा वास्को येथील ३६२ घरांपैकी २१७ घरांवर कारवाई करण्यास आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्थगिती दिली. त्यामुळे खारीवाड्यावरील या लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्यात मुरगाव पालिकेने ही सर्व घरे पाडण्यासाठी नोटिस बजावली होती. त्यावर न्यायालयाने स्थगिती दिल्याने तूर्तास ही कारवाई टळली आहे. तसेच, या घरांची काय परिस्थिती आहे, याची माहिती आज पालिकेने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला दिली. या ठिकाणी ३६२ घरे आहे असून ३६३ जणांना या नोटिसा बजावलेल्या होत्या. एकाच घरावर दोघांनी आपला हक्क सांगितल्याने ३६३ नोटिसा बजावलेल्या आहेत, अशीही माहिती त्यांनी खंडपीठाला दिली. यातील १४७ जणांनी पालिकेच्या या नोटिशीला कोणतेही आव्हान दिलेले नाही.
या सर्व घरांवर आज दि. ७ मार्च रोजी कारवाई होणार होती. त्यापूर्वी काहींनी प्रशासकीय लवादासमोर धाव घेऊन स्थगिती मिळवली होती. मुरगाव बंदराच्या विस्तारीकरणामुळे व इतर काही कारणांसाठी खारीवाडा येथील या शेकडो घरांना पाडण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
मुरगाव बंदर न्यायालयात गेल्याने ही घरे पाठवण्याचा आदेश त्यावेळी खंडपीठाने दिला होता. तसेच, यावर कारवाई करून त्याचा १५ फेब्रुवारीपर्यंत या घरांवर कोणती कारवाई केली त्याचा अहवाल न्यायालयासमोर ठेवण्याचा आदेश पालिकेला दिला होता. त्यानुसार आज त्याचा अहवाल पालिकेने ठेवला. खारीवाडा येथे ही चाळ असल्याने एक एक घर पाडता येत नाही. तसेच, काही घरांना प्रशासकीय लवादाने स्थगिती दिल्याने स्थगिती न मिळालेल्या आणि स्थगिती मिळालेल्या घराची भिंत एकच असल्याने त्यावर कारवाई करणे कठीण होत असल्याचेही यावेळी न्यायालयाला सांगण्यात आले.
न्यायालयाने यावेळी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून या घरांनी २१७ घरांना स्थगिती दिली. त्यामुळे राहिलेल्या अन्य घरांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे.

No comments: